नोटबंदीचा अहवाल कृषी मंत्रालयाकडून मागे : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. नोटबंदीचा अहवाल कृषी मंत्रालयाकडून मागे

नोटबंदीमुळे देशभरातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अशा आशयाचा अहवाल कृषी मंत्रालयानं जारी केला होता. हा अहवाल मागे घेण्यात आला आहे. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.

नोटबंदीसंबंधी कृषी मंत्रालयानं आता नवीन अहवाल सादर केला आहे. ज्याअंतर्गत नोटबंदीमुळे शेतकऱ्यांवर विपरित परिणाम झाला नाही, असं म्हटलं आहे.

आधीचा अहवाल तयार करणाऱ्या 3 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, असं कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी संसदीय समितीला सांगितलं आहे.

नोटबंदीमुळे बाजारातली रोकड कमी झाली आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. मोठ्या शेतकऱ्यांनाही खरीपाचं धान्य विकण्यात अडचणी आल्या.

रब्बीची पेरण्या बियाणे आणि खतांच्या खरेदीअभावी रखडल्या. शेतीचे बहुतांश व्यवहार रोखीनं होतात, पण रोकड उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, असं मागे घेण्यात आलेल्या अहवालात म्हटलं होतं.

Compilation error (संकलनातील चूक) असल्यामुळे आधीचा अहवाल मागे घेण्यात येत आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

2. मिताली राजचा रमेश पोवार यांच्यावर आरोप

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजनं संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि कमिटी ऑफ अडमिनिस्ट्रेटर्सच्या सदस्य डायना एडल्जी यांच्याविरोधात आरोप केले आहेत. NDTVनं ही बातमी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या महिला क्रिकेट टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये मिताली राजला वगळण्यात आलं होतं. यानंतर मितालीनं बीसीसीआयला पत्र लिहित पोवार आणि एडल्जी यांच्यावर आरोप केले आहेत.

पोवार आणि एडल्जी यांनी भेदभावाची वागणूक दिली आणि अपमानित केलं. माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न पोवार यांनी केला, असं मितालीनं या पत्रात लिहिलं आहे. यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू आहे.

3. राम मंदिरासाठी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू - अमित शहा

राम मंदिर बांधण्यासाठी आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहू, सरकार सध्यातरी त्यावर कोणताही कायदा आणणार नाही, असं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे. अयोध्या प्रकरणाचा निकाल मंदिर बांधण्याच्या बाजूनेच लागेल असंही शहा यांनी म्हटलं आहे.

सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे आणि यावरील सुनावणीसाठी जानेवारीपर्यंत वाट पाहायला हवी, असं शहा यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना आणि भाजप यांचं कोणत्याही मुद्द्यावर भांडण नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

4. सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार - ACB

सिंचन घोटाळ्यासाठी अजित पवार जबाबदार आहेत, असं प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखलं केलं आहे. News18 Lokmatनं ही बातमी दिली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 27 पानांचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यातल्या पान क्रमांक 5 वर अजित पवारांचा स्पष्ट उल्लेख आहे.

महाराष्ट्र गव्हर्नमेन्ट रुल्स ऑफ बिझनेस अँड इन्स्ट्रक्शनमधल्या नियम 10 नुसार संबंधित मंत्री त्यांच्या विभागातील सर्व बाबींसाठी जबाबदार असतात.

पवार हे जलसंपदा मंत्री असताना विदर्भ व कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गतच्या विविध सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचं चौकशीत आढळून आलं आहे.

5. देशभरातील शेतकरी शुक्रवारी संसदेवर धडकणार

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे 30 नोव्हेंबरला देशभरातील शेतकरी दिल्लीत संसदेवर धडक मारणार आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

संपूर्ण कर्जमुक्ती आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत मोर्चा काढणार आहे.

शेतकऱ्यांच्या या दोन्ही मागण्या मान्य करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी आयोजकांची मागणी आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)