नोटाबंदी आणि संघटित लूट यावरून काँग्रेस-भाजप आमने-सामने

गुजरात निवडणूक आणि नोटांबदीच्या वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर नोटाबंदी आणि संघटीत लूट यावरून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने एकमेकांवर आरोपांची राळ उडवली आहे.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, छोटे उद्योजक आणि व्यावसायिकांच्या अहमदाबाद इथं झालेल्या मेळाव्यात डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

"नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन निर्णय हा देशाच्या अर्थकारणावर आघात असून नोटाबंदी ही तर संघटित लूटच आहे", अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली.

"नोटाबंदी आणि जीएसटी हे देशाच्या अर्थव्यवस्थेला पार धुळीस मिळवणारे दोन निर्णय आहेत. नोटाबंदीवर संसदेत मी जी टीका केली त्यातून मोदी यांनी काहीच बोध घेतला नाही." असं ते म्हणाले.

त्यानंतर या टीकेचा प्रतिवाद करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र, "संघटित लूट सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारनंच केली होती," असा आरोप केला आहे.

मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्येच टूजी घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा सामन्यांच्या आयोजनातला घोटाळा

आणि कोळसा खाणघोटाळा अशी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे गाजली, याकडे जेटली यांनी पुन्हा लक्ष वेधले.

पवार-ठाकरे भेटीचा गौप्यस्फोट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दहा दिवसांपूर्वी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत आणि लोकसत्ताच्या वृत्तानुसार, "शिवसेना सत्तेत समाधानी दिसत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दहा दिवसांपूर्वी भेटीला आले होते", असा गौप्यस्फोट खा. पवार यांनी आज कर्जत इथं केला.

"परवाच्या भेटीत आमच्यात बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. पण मला ते सत्तेत राहून समाधानी वाटले नाहीत.

अर्थात, सरकारचा लगेच ते पाठिंबा काढतील असे नाही. पण जर कुणी सत्तेतून बाहेर पडले तर कुणालाही मदत करण्याची आमची भूमिका नाही", असंही पवार यावेळी म्हणाले.

शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार, की नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करू नये, यासाठी आणलेला हा दबाव आहे, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.

आगामी युग हे हिंदू समाजाचं- मोह भागवत

"आगामी युग हे हिंदू समाजाचं राहणार, हा केवळ आशावाद नव्हे तर ती आजच्या समाजाची गरज आहे." असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी जालना इथं केलं.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, संघातर्फे जालना इथं 'समरसता संगम' आयोजित करण्यात आलं होते. यावेळी मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

"जगाने अनेक विचारांवर आधारित प्रयोग राबवून पाहिले. पण प्रयोगांच्या फलितांचा विचार केला तर एकही प्रयोग सिद्धीस गेलेला नाही. म्हणूनच आजही जगाला मार्ग दाखविण्याची ताकद, समृद्ध परंपरा भारताकडे आहे", असंही ते म्हणाले.

"समतायुक्त, शोषणमुक्त, परमवैभवसंपन्न आणि सामर्थ्यसंपन्न देश बनवून जगाला मार्ग दाखविणारा विश्वगुरु भारत उभा करण्याच्या महाअभियानात सर्वांनी सहभागी व्हावं", असे आवाहन त्यांनी केले.

आठ षटकांच्या सामन्यात भारताचा विजय

भारतानं तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर सहा धावांनी मात केली. पावसामुळे टी-२० सामना आठ-आठ षटकांचा खेळवण्यात आला.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, भारतानं न्यूझीलंडला ६८ धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळे न्यूझीलंडला केवळ ६१ धावा करता आल्या.

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडनं भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारताची सुरुवात अडखळती झाली. विराट कोहली, मनिष पांडे यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारतानं ८ षटकात ६७ धावा केल्या. आव्हान स्वीकारुन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारनं धक्का दिला.

अखेरच्या षटकात किवींना विजयासाठी १९ धावा करायच्या होत्या. अखेर रंगतदार झालेल्या सामन्यात भारतानं किवींवर मात सहा धावांनी मात केली.

आयएसआयनं रचला कट- कॅप्टन अमरिंदर सिंग

पंजाबमधील धार्मिक नेत्यांच्या हत्या या फक्त घटना नसून त्यामागं पाकिस्तानस्थित 'इंटर सर्विसेज इंटेलिजन्स'चा (आयएसआय) हात आहे.

त्यांनी रचलेल्या षडयंत्राचा तो एक भाग आहे. असे गंभीर आरोप पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले आहेत.

हिंदुस्थान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी जालंधरमध्ये आरएसएस नेता ब्रिगेडियर जगदीश गगनेजा (सेवानिवृत्त) यांच्या हत्येसह आठ हत्याकांडापैकी सात प्रकरणांचा छडा लावण्यात आला असल्याचं सिंग म्हणाले.

राज्यात सामाजिक अशांती निर्माण करून राज्याला अस्थिर करण्याचा हा आयएसआयचा एक प्रमुख कट होता. असा आरोपही त्यांनी केला.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)