अयोध्या, धर्मसभा आणि मुस्लीम मोहल्ल्यांतील रात्र : 'बाहेरच्यांची गर्दी भीतीदायक असते'

    • Author, निरंजन छानवाल
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"यहाँ हम लोगो में भाईचारा है. मै खुद मंदिरों में जाकर वायरिंग का काम करता हूँ. 1992ची घटना आम्ही पाहिली आहे. मी त्या वेळेस १८ वर्षांचा होतो. मी ते सगळं अनुभवलं आहे. गर्दी जमल्यानेच भीती वाटायला लागली. पुन्हा तिच परिस्थिती ओढवू नये."

अयोध्येतील इलेक्ट्रिशियन अखिल अहमद सांगत होते.

गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांमुळे अयोध्येत तणावाचं वातावरण होतं. शहराच्या विविध भागांतील मुस्लीम मोहल्ल्यांना रविवारी छावणीचं स्वरूप आलं होतं. या मोहल्ल्यांकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले होते. कुणालाच आत शिरकाव नव्हता.

संध्याकाळनंतर जसजशी अयोध्येतली गर्दी ओसरत गेली, तसतसा इथला बंदोबस्तही हटवण्यात आला आणि रविवारी दिवसभर मोहल्ल्यातील घरांमधून डोकावणारे चेहरे रात्री इथल्या गल्ल्यांमध्ये नेहमीप्रमाणे वावरताना दिसत होते.

पण 1992ची घटना ज्यांनी अनुभवली आहे, असे लोक या काळात अयोध्येत थांबत नसल्याचं काहींनी सांगितलं. "काही लोक बाहेरगावी निघून गेले. आमच्या भागात गोंधळाचं वातावरण होतं. पण पोलीस बंदोबस्त लागल्याने अनेकांनी निःश्वास सोडला," असं अखिल सांगतात.

अयोध्येच्या कुटीया, टेडी बाजार, पाणी टोला, गोला घाट, कटरा, आलमगंज या भागांत मुस्लीम वस्ती आहे, जिथे वीस-पंचवीस मुस्लिमांची घरं हिंदूंच्या घरांना लागूनच आहेत. मोहल्ला कुटीयाच्या भागात दिवसभर पोलिसांना नाकाबंदी केलेली होती. सांयकाळी बंदोबस्त हटल्यानंतर आम्हाला एका गल्लीच्या तोंडावर काही तरुण रस्त्यावर उभे राहून गप्पा मारताना दिसले.

रात्री साधारण आठची वेळ होती. याच गल्लीत बाबरी मशीद प्रकरणातील एक पक्षकार इकबाल अन्सारी यांचं घर आहे. त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात आलेली आहे. या परिसरातील पोलिस बंदोबस्त गेल्या तीन दिवसांत वाढवण्यात आला होता.

घरोघरी जाऊन इलेक्ट्रिकची कामं करणारे अखिल अहमद इथेच राहतात. ते पुढे सांगतात, "हे अयोध्येतले लोक नसतात. हे आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून आलेले असतात. काही बाहेरून येतात, त्यांच्यापासूनच भीती वाटते. यात काही उपद्रवी असतात, ते उपद्रव करतात. त्यातूनच धोका निर्माण होतो."

इथेच उभे असलेले एक मोहम्मद वसीम यांना मौलाना म्हणून ओळखलं जातं. त्यांनी त्यांचं वेल्डिंगचं दुकान तीन दिवस बंद ठेवलं होतं. कलम 144 लागू असल्यानं तसंच शहरातील रस्ते बंद असल्यामुळे शहरात सामान आणण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मोहम्मद वसीम सांगतात, "माझे नव्वद टक्के ग्राहक हिंदूच आहेत. अयोध्येत हिंदू-मुस्लीम संस्कृती ही मिलापाची आहे. बाहेरचे लोक येऊन इथं गडबड करतात. काही संघटना इथं वातावरण बिघडवतात."

"गर्दी जमली म्हणजे शंकेचं वातावरण निर्माण होतं. मनं कलुषित होऊ लागतात. गर्दी जमली नाही तर कशाला शंकेचं वातावरण होईल. सामान्य दिवसांमध्ये इथं दर तीन महिन्यांनी यात्रा भरत असते. भाविक येतात, दर्शन करून जातात. आम्ही भाविकांना मार्ग दाखवतो. कुणाला पाणी हवं तर विचारतो," असं ते सांगतात.

"कोर्टाचे सुनावणी प्रलंबित आहे. हे लोक कोर्टाचे आदेश का मानत नाहीत ? गेली चार वर्षं झाली वातावरण थंड होतं. आता दोन महिन्यांपासून या मुद्द्याला हवा दिली जात आहे. कारण त्यांना मतांचा ध्रुवीकरण करायचं आहे," वसीम सांगतात.

25 वर्षांचा जहिरुद्दीन अन्सारी मित्रांबरोबर गप्पा मारत उभा होता. अन्सारीचं शिक्षण मध्येच सुटलं आहे. तो टॅक्सी चालवतो आणि पर्यटकांना सेवा देतो.

जहिरुद्दीन म्हणतो, "6 डिसेंबरची घटना ज्यांनी अनुभवली त्यांच्यातले अनेक जण आता जिवंत नाहीत. त्यांच्याकडून तरुण पिढीने त्याविषयी फक्त ऐकलं आहे. त्यामुळेच त्यांच्या मनात भीती आहे."

"दरवर्षी 6 डिसेंबर ही तारीख आली की आमच्यावर दडपण येऊ लागतं. अयोध्येतील हिंदू मुस्लीम कुणीही असू द्या, त्याला भीती वाटतेच. त्यांनी ते अनुभवलंय, म्हणून त्यांच्या मनात भीतीचं वातावरण असतं. आम्ही जो भूतकाळ बघितला आहे, त्या तुलनेत या सरकारच्या काळात फारशी भीती वाटत नाही. सुरक्षेचा अनुभव आला आहे. आम्हाला फक्त बाहेरच्या लोकांची भीती वाटते," हे सांगायलाही तो विसरला नाही.

अल्ताफ अन्सारी हा तरुणही इथंच भेटला. "माझा तर जन्म 1992च्या नंतरचा आहे. त्या घटनांबद्दल मी फक्त ऐकलं आहे."

अन्सारीने माहिती दिली, "अयोध्येत आज सगळीकडे नाकाबंदी करण्यात आली होती. लोकांना ठिकठिकाणी अडवण्यात येत होते. आम्हीही चौकापर्यंत जाऊन बघून येत होतो. फक्त कुठं बाहेर पडू शकत नव्हतो. बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आत येऊ दिलं जात नव्हतं."

"अयोध्येतले लोक शांततेत राहतात. सगळे उत्सव एकत्र साजरे करतात. माझे निम्म्याहून अधिक मित्र हिंदू आहेत. मी होळी खेळतो, मित्रांना रंग लावतो. ते (हिंदू) ईद साजरी करतात. प्रत्येक सणाला हिंदू मुस्लिमांमध्ये भेटीगाठी होतात," असं तो सांगतो.

"बाहेरचे लोक जेव्हा इथं गर्दी करतात, तेव्हा भीतीदायक परिस्थिती निर्माण होते," असं अल्ताफने सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)