'तुरुंगातील कैदी माणूस नसतो का?' सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं #5मोठ्याबातम्या

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1. 'कैदी माणूस नसतो का?'

तुरुंगाची दुरावस्था आणि कैद्यांच्या दुर्दशेवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. कैद्यांना हक्क नसतात का, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने केंद्र सरकारला विचारला आहे.

"तुरुंगांची अवस्था पाहा. कित्येक वर्षांपासून रंगसफेदी झालेली नाही, नळ नादुरुस्त आहेत, स्वच्छतागृह नीट नाहीत. तुरुंगातला कैदी माणूस नसतो का? तुरुंगातील अधिकारी त्यांना काय समजतात?" असा प्रश्न न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सरकारला विचारला. एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान त्यांनी आपलं निरीक्षण मांडल्याचं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

"फोरेन्सिक डिपार्टमेंटमधील 48 टक्के जागांची भरती झाली नाहीये. मग प्रलंबित खटले मार्गी कसे लागतील? लोकांना फक्त चौकशीसाठी तुरुंगात कधीपर्यंत अडकवून ठेवणार?" असं कोर्टानं सरकारचे प्रतिनिधी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अमन लेखी यांना सुनावलं.

2. आदिवासी आंदोलन मागे

विविध मागण्यांसाठी आदिवासी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'उलगुलान मोर्चा'ची महाराष्ट्र सरकारनं दखल घेतल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला. सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांना लेखी आश्वासन दिल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे. दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला होता.

मोर्चात आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकरीही सहभागी झाले होते. वनाधिकार कायदा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी आदी मागण्यांसाठी हा मोर्चा आज दुपारी आझाद मैदानात धडकला होता.

3. पाकिस्तानातील गुरुद्वारासाठी विशेष कॉरिडोर

पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात असलेल्या करतारपूर येथील डेरा बाबा नानक गुरुद्वाराला जाता येण्यासाठी करतारपूर कॉरिडोर बनवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, असं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय भाविकांना गुरू नानक देव यांच्या 550व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानला जाणं सुलभ व्हावं, यासाठी भारतातील पंजाब प्रांतातील गुरुदासपूर आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत हा कॉरिडोर बनवण्यात येणार आहे. पाकिस्तानमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी देखील भारत सरकार पाकिस्तान सरकारला विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

4. 'धनगर आरक्षणाबाबतच्या अहवालावर अभ्यास सुरू'

राज्यातील धनगरांना कोणत्या मुद्द्यांवर आरक्षण द्यावे, याबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) ने दिलेल्या अहवालावर अभ्यास सुरू असल्याची माहिती राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.

एबीपी माझानं दिलेल्या वृत्तात, धनगड आणि धनगर एकच असून धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेवरील सुनावणीवेळी राज्य सरकारनं ही माहिती दिली.

5. आलोक नाथवर गुन्हा दाखल

अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराची FIR नोंदवण्यात आली आहे. पटकथा लेखक आणि दिग्दर्शक विंता नंदा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर FIR नोंदवण्यात आली. हे वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

आलोक नाथ यांनी माझ्यावर बलात्कार केला होता, असं आरोप विंता यांनी केला होता. आलोक नाथ यांनी हे आरोप फेटाळले होते.

आपण आलोकनाथ यांना माफ करायला तयार आहोत, पण त्यांनी प्रायश्चित्त करावं. "निदान आपल्याला पश्चाताप झालाय असं तरी सांगावं. म्हणजे भविष्यात ते अशी चूक पुन्हा करणार नाही, हे तरी सिद्ध होईल," असं त्या म्हणाल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)