You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंदमान : प्रतिबंधित बेटावर गेलेल्या अमेरिकन नागरिकाची 'बाण मारून' हत्या
अंदमान-निकोबार बेट समुहाच्या नॉर्थ सेंटिनेल नावाच्या एका बेटावर एका अमेरिकन नागरिकाची हत्या झाल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे.
27 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव जॉन अॅलन चाऊ असून ते मूळ अमेरिकेच्या अॅलाबामाचे रहिवासी होते. ते ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी अनेकदा अंदमानला जायचे.
18 नोव्हेंबरची ही घटना असल्याचं सांगितलं जातंय. संरक्षित आणि मूळनिवासी सेंटिनेली जमातीची माणसं राहतात, त्या भागात ही हत्या झाली आहे.
अंदमान-निकोबारमध्ये प्रदीर्घ काळ काम केलेले बीबीसीचे फ्रिलान्स पत्रकार सुबीर भौमिक यांनी या प्रकरणाविषयी अधिक माहिती दिली.
या हत्येप्रकरणी सात मच्छिमारांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांनीच जॉन यांना बेकायदेशीरपणे बेटापर्यंत पोहोचवलं होतं.
स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने जॉन चार ते पाच वेळा नॉर्थ सेंटिनेल बेटावर गेल्याचं सुबीर भौमिक यांनी सांगितलं.
सेंटिनेली लोकं कोण आहेत?
अंदमानच्या नॉर्थ सेंटिनेल बेटावर राहणारी सेंटिनेली ही एक प्राचीन जमात आहे. सध्या या जमातीची लोकसंख्या फक्त 50 ते 150 माणसं एवढीच आहे.
जॉन कुठल्यातरी मिशनरी संस्थेसाठी काम करायचे आणि या जमातीच्या लोकांमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारावा यासाठी अनेकदा तिथे जायचे अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
सुबीर भौमिक यांच्या मते, "आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांमध्ये या जमातीचं कुणीही नाही. कारण या लोकांशी संपर्क करायलासुद्धा मनाई आहे. त्यामुळे या जमातीच्या कुणालाही अटक होऊ शकत नाही. हे लोक कुठल्याच प्रकारचं चलनही वापरत नाही."
केंद्र सरकारने 2017 साली अंदमानमधल्या प्राचीन जमातीच्या माणसांचे फोटो किंवा व्हिडियो काढणं बेकायदेशीर घोषित केलं होतं. तसं करणाऱ्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
नॉर्थ सेंटिनेल बेट प्रतिबंधित क्षेत्र आहे. कुठलीही सामान्य व्यक्ती सहजासहजी तिथे जाऊ शकत नाही. इतकंच काय भारतीय नागरिकही तिथे जाऊ शकत नाही.
एएफपी या वृत्तसंस्थेनुसार जॉन यांनी 14 नोव्हेंबरला या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते जाऊ शकले नाही. दोन दिवसांनंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला.
एएफपीच्या वृत्तानुसार, 'जॉनवर बाणांनी हल्ला करण्यात आला. मात्र तरीही ते बेटावर गेले. सेंटिनेली जमातीची माणसं जॉन यांच्या गळ्यात दोर टाकून त्यांना ओढून घेऊन जात असल्याचं मच्छिमारांनी बघितलं. हे बघून मच्छिमार घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला.'
20 नोव्हेंबरला जॉन यांचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर पोलिसांनी प्रकरण दाखल करून घेतलं.
सुबीर यांच्या मते सेंटिनेली लोकांनी जॉन यांना ठार का केलं, याचं कारण सांगता येणं कठीण आहे. कारण जॉन याआधीही तिथे गेले होते. त्यामुळे जॉन त्यांच्यासाठी अनोळखी नव्हते, हे तर स्पष्टच आहे.
मात्र त्यांच्यात संवादाची अडचण असू शकते, असा संशय सुबीर व्यक्त करतात. सेंटिनेली लोकांची भाषा इतकी कठीण आहे की खूपच कमी लोकांना ती कळते.
भारतीय उपखंडात राहणाऱ्या या अतिशय छोट्या छोट्या आदिवासी जमातींना भारत सरकारने प्राचीन आणि संरक्षित घोषित केलं आहे.
बीबीसी प्रतिनिधी गीता पांडे यांनीदेखील सेंटिनेली लोकांबद्दलचा आपला अनुभव कथन केला. 2004 साली हिंदी महासागरात आलेल्या त्सुनामीतही या जमातीचे लोक बचावले होते, अशी माहिती प्रशासनाने त्यावेळी माध्यम प्रतिनिधींना दिल्याचं गीता यांनी सांगितलं.
त्यावेळी नौदलाचं एक हेलिकॉप्टर नॉर्थ सेंटिनेल भागात गस्त घालत होतं. हेलिकॉप्टर थोडं खाली उतरताच या जमातीच्या लोकांनी हेलिकॉप्टरवर बाण सोडायला सुरुवात केली.
या हल्ल्यानंतर पायलटने सांगितलं, " त्यांनी आमच्यावर बाण सोडले म्हणून आम्हाला कळलं की तिथे राहणारी माणसं सुरक्षित आहेत."
वैज्ञानिकांच्या मते सेंटिनेली जमातीची माणसं 60 हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून पलायन करून अंदमानात स्थायिक झाली. भारत सरकारव्यतिरिक्त अनेक आंतरराष्ट्रीय संघटना या जमातीला वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)