...म्हणून नागालँडमध्ये होती शिर छाटण्याची प्रथा

    • Author, नीलिमा वलांगी
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

सत्ताबदल अनुभवणाऱ्या नागालँडच्या दूरवरच्या गावात जीवनमान तसं बरंच बदलेलं आहे. आधुनिकतेच्या वाटेवर चालणाऱ्या इथल्या आदिवासी समाजाची पाळंमुळं आजही त्यांच्या प्राचीन संस्कृतीच्या मातीत घट्ट रुजलेली आहेत. आधुनिकता आणि प्राचीन संस्कृती यांच्यातला हाच अचूक मेळ टिपला आहे, बीबीसी ट्रॅव्हलच्या नीलिमा वलांगी यांनी.

म्यानमारच्या सीमेला लागून असलेलं लोंगवा हे भारताचं शेवटचं गाव आहे. भारताच्या पूर्वेकडील या राज्यात 16 जमातींचे लोक राहतात. यातल्या कोनयाक आदिवासींना सर्वाधिक भयंकर मानलं जातं. नागालँडमध्ये त्यांचे सर्वाधिक पाडे आहेत.

पाड्यांची सत्ता आणि जमीन यासाठी त्यांचे एकमेकांसोबत नेहमीच संघर्ष होतात.

कोनयाक आदिवासी उंच डोंगरावर राहात असल्यानं त्यांना शत्रूवर सहजतेनं नजर ठेवता येते.

लोंगवा या गावाचा अर्धा भाग भारतात येतो आणि अर्धा म्यानमारमध्ये. पूर्वीपासून या लोकांमध्ये शत्रूचं शिर कापण्याची प्रथा होती. 1940 मध्ये या प्रथेवर बंदी घालण्यात आली.

शत्रूची हत्या करणं अथवा त्याचं डोकं शरीरापासून वेगळं करणं याला ऐतिहासिक महत्त्व होतं आणि असं काम केल्यानंतर विजयाच्या खुशीत चेहऱ्यावर टॅटू काढलं जात असे.

सरकारी माहितीनुसार, नागालँडमध्ये शिर कापल्याची शेवटची घटना 1969मध्ये घडली होती.

म्हैस, हरीण, डुक्कर आणि इतर प्राण्यांची हाडं कोनयाक पाड्यांवरल्या घरांच्या भिंतींवर सजवलेली दिसून येतात.

पूर्वीच्या कोनयाक शत्रूच्या झोपडीवर कब्जा मिळवत आणि तिला प्राण्यांच्या हाडांनी सजवत. पण ही प्रथा बंद झाल्यानंतर या झोपड्यांना नष्ट करण्यात आलं.

कोनयाक आदिवासींच्या झोपड्या प्रामुख्यानं बांबूपासून बनलेल्या असतात. या झोपड्या आकारानं मोठ्या असतात आणि त्यात स्वयंपाक, जेवण, झोपण्यासाठी आणि सोनं-नाणं ठेवण्यासाठी वेगवेगळे भाग केलेले असतात.

घराच्या बरोबर मध्यभागी चूल बनवलेली असते आणि तिच्यावर बांबूच्या टोपल्यांमध्ये भाजीपाला आणि मांस ठेवलं जातं.

तांदळाला (भाताला) लाकडाच्या दांड्यानं झोडपत पारंपरिक 'चिपचिपा चावल' बनवला जातो.

1970मध्ये भारत आणि म्यानमार या देशांमध्ये सीमारेषा निश्चित करण्यात आली. पण त्यापूर्वीपासूनच लोंगवाचं अस्तित्व होतं.

या गावाला दोन भागांत कशाप्रकारे विभागलं जावं या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे तत्कालीन अधिकाऱ्यांनी गावाच्या मधोमध सीमारेषा निश्चित केली. पण कोनयाक जमातीवर याचा काही परिणाम झाला नाही.

बॉर्डरवरल्या दगडावर एका बाजूनं बर्मीज तर दुसऱ्या बाजूनं हिंदीत संदेश लिहिण्यात आला आहे.

ही सीमारेषा गावप्रमुखच्या घरातून जाते. त्यामुळे इथले लोक म्हणतात की, गावाचे प्रमुख रात्रीचं जेवण भारतात करतात तर झोपायला मात्र म्यानमारमध्ये जातात.

कोनयाक आदिवासी आजही गावाच्या प्रमुखाच्या.. मुखियाच्या नेतृत्वाखाली एकत्र येतात. गावाला इथं 'अंग' असं संबोधलं जातं. मुखियाच्या अधिकारात एक किंवा अनेक गावं येऊ शकतात.

अंगांमध्ये बहुविवाहांची प्रथा आहे. त्यामुळे इथल्या मुखियांनी दोनचार लग्न केलेली असतात आणि त्यांना अनेक अपत्यं असतात.

19व्या शतकाच्या शेवटापर्यंत म्हणजेच ख्रिश्चन मिशनरी इथे येईपर्यंत कोनयाक निसर्गपूजक होते.

20वं शतक संपतासंपता राज्यातल्या 90 टक्क्यापेंक्षा अधिक लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आजच्या घडीला नागालँडच्या प्रत्येक गावात कमीत कमी एक चर्च बघायला मिळतं.

कोनयाक महिला दर रविवारी चर्चमध्ये जातात. यावेळी त्यांनी पारंपरिक नागा स्कर्ट परिधान केलेला असतो.

पेटत्या चुलीजवळ एकत्र येऊन गप्पा मारणं आणि भाजलेलं मक्याचं कणीस खाणं इथल्या ज्येष्ठांचा आवडता उद्योग आहे.

पण, आता ही परंपरा गायब होण्याच्या मार्गावर आहे.

रंगीबेरंगी घरांचं आणि दागिने घालण्याचं प्रमाणसुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी महिला आणि पुरुष दोघेही हार आणि बांगडी अथवा कडं घालत.

पुरुषांच्या हारामध्ये असलेले पितळ्याचे चेहरे त्यांनी किती शत्रूंची शिरं कापली हे सांगत.

आधुनिकीकरणापासून लोंगवा अद्यापही खूप दूर आहे. त्यांची घरं लाकडांपासून बनलेली असतात. पण काही ठिकाणी सिमेंटची घरं आणि काँक्रीटचे रस्ते दिसून येत असल्यानं बदलाचे संकेत मिळत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)