श्रीदेवी : मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? बोनी कपूर यांचा प्रथमच खुलासा

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं 24 फेब्रुवारीला दुबईत निधन झालं. त्यानंतर आठवड्याभरानं त्यांचे पती बोनी कपूर यांनी त्या रात्री दुबईतल्या हॉटेलमध्ये नेमकं काय झालं याचा तपशील उघड केला आहे.

सुरुवातीला कार्डिअॅक अरेस्ट असं कारण दिलं जात होतं. पण नंतर बाथटबमध्ये पडून अपघाती मृत्यू असं कारण दुबई पोलिसांनी दिलं आहे. बोनी कपूर त्या रात्री दुबईत श्रीदेवींना सरप्राईज देण्यासाठी आले होते.

बोनी कपूर यांनी 30 वर्षंपासूनचे त्यांचे मित्र आणि ट्रेड विश्लेषक कोमल नाहटा यांना ही माहिती दिली आहे. नाहटा यांनी त्यांच्या ब्लॉगवर हा तपशील लिहिला असून तसं ट्वीटही केलं आहे.

श्रीदेवीला सप्राईज देण्यासाठी ते त्या रात्री अचानक दुबईला कसे गेले, तिथं ते त्यांना कसे भेटले, एकमेकांना कसं किस केलं आणि त्यानंतर 2 तासांनी श्रीदेवी त्यांना बाथटबमध्ये पडलेल्या कशा आढळल्या याची माहिती त्यांनी उघड केली आहे.

बोनी कपूर यांनी नाहटा यांना सांगितलं की, "श्रीदेवी आणि मी परदेशात एकत्र गेलो नाही, असं गेल्या 24 वर्षांत फक्त दोनच वेळा घडलं आहे." सिनेमाच्या कामानिमित्त श्रीदेवी एकदा न्यूजर्सी आणि एकदा व्हॅंक्यूअरला गेल्या होत्या. बोनी कपूर म्हणतात, "या दोन्ही ट्रिपला मी तिच्यासोबत नव्हतो. पण माझ्या मित्राची पत्नी तिच्यासोबत असेल याची दक्षता मी घेतली होती. दुबईचा हा असा एकमेव प्रवास होता, त्यात ती सलग दोन दिवस एकटी होती."

बोनी, श्रीदेवी आणि खुशी नातलगाच्या लग्नासाठी दुबईला गेले होते. हे लग्न 20 फेब्रुवारीला झालं. त्यानंतर लखनऊमध्ये महत्त्वाची मीटिंग असल्याने बोनी कपूर परत भारतात आले. जान्हवीसाठी काही शॉपिंग करायची असल्याने श्रीदेवी दुबईतच थांबल्या होत्या.

नाहटा लिहितात, "जान्हवीची शॉपिंग लिस्ट श्रीदेवींनी मोबाईलमध्ये सेव्ह केली होती. पण त्या 21 फेब्रुवारीला शॉपिंगला जाऊ शकल्या नाहीत. मोबाईल रस अल खेमाहमध्येच राहिला होता. त्यामुळे त्या दिवशी त्या हॉटेल रूमवर विश्रांती घेत होत्या."

बोनी यांनी नाहटांना सांगितलं की, "24 फेब्रुवारीला सकाळी मी तिच्याशी बोललो होतो. त्यावेळी तिनं मला सांगितलं की, पापा मी तुला मिस करतेय." श्रीदेवी बोनी कपूर यांना 'पापा' म्हणायची.

ते सांगतात, "मी तेव्हा तिला दुबईत येणार असल्याचं सांगितलं नाही. आईला एकटीला राहायची सवय नसल्याने जान्हवीचीही इच्छा होती की मी दुबईत जावं आणि ते तिच्यासाठी सरप्राइज होतं."

नाहटा लिहितात, "बोनी त्यांची 'जान' आणि दोन मुलींची आई श्रीदेवीला हॉटेलमध्ये पोहोचून सप्राईज दिलं होतं. डुप्लिकेट किल्लीने त्यांनी हॉटेलची खोली उघडली. एखाद्या नवथर जोडीसारखी त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली."

ते लिहितात, बोनी यांनी रडत रडत ही माहिती त्यांना दिली. ते पुढं लिहितात,"बोनी दुबईला येईल असा अंदाज श्रीदेवीला होताच. त्यांनी एकमेकांना किस केलं आणि अर्धा तास बोलत राहिले."

बोनी यांनी श्रीदेवीला सांगितलं की, रात्री रोमॅंटिक डिनरसाठी जाऊ आणि श्रीदेवी यांनी खरेदी पुढं ढकलावी. त्यामुळे विमानाचं तिकीट रद्द करून ते 25 फेब्रुवारीला करून घ्यायचं ठरलं, जेणेकरून त्यांना खरेदीसाठी चांगला वेळ मिळेल.

श्रीदेवी यावेळीही निवांत मूडमध्ये होत्या. डिनरला जाण्यासाठी तयार होण्यासाठी त्या अंघोळीला गेल्या.

बोनी यांनी नाहटांना सांगितलं की, "मी लिव्हिंग रूममध्ये गेलो आणि श्रीदेवी मास्टर बाथरूममध्ये आवरण्यासाठी गेली. लिव्हिंग रूमच्या टीव्हीवर मी दक्षिण आफ्रिका आणि भारत सामन्याचे अपडेट पाहिले त्यानंतर पाकिस्तान सुपर लीगच्या एका मॅचचे अपडेट्स पाहिले. 15 ते 20 मिनिट मी टीव्ही पाहात होतो. पण मला काळजी वाटत होती की, शनिवारी रात्री सर्व हॉटेलमध्ये गर्दी असेल."

त्यावेळी जवळपास 8 वाजले असतील. बोनी कपूर यांनी लिव्हिंग रूममधूनच श्रीदेवींना हाक मारली. टीव्हीचा आवाज कमी करून त्यांनी पुन्हा एकदा श्रीदेवींना हाक मारली. पण त्यांनी प्रत्युत्तर न दिल्याने ते बेडरूममध्ये गेले आणि बाथरूमचा दरवाजा ठोठवला आणि 'जान, जान' अशी हाक मारली. बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता.

पण श्रीदेवींचा आवाज न आल्याने ते थोडे घाबरले आणि जोरात दरवाजा ढकलला. दरवाजा आतून बंद नव्हता. बोनी थोडे घाबरले होते पण पुढे जे समोर येणार होतं त्यासाठी बोनी कपूर यांची कसलीच तयारी नव्हती. बाथटब पाण्याने पूर्ण भरला होता आणि श्रीदेवी त्यात बुडाल्या होत्या. डोक्यापासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत त्या पाण्यात बुडाल्या होत्या. बोनी वेगाने त्यांच्या दिशेने धावले पण श्रीदेवींची कसलीच हालचाल जाणवली नाही.

नाहटा लिहितात, "जे घडलं त्यासाठी कुणाचीच मानसिक तयारी नव्हती. त्या आधी बुडल्या आणि मग बेशुद्ध झाल्या की बेशुद्ध होऊन नंतर बुडाल्या, हे कदाचित आता कधीच समजणार नाही. बाथटबमधून थोडंही पाणी बाहेर पडलं नव्हतं. त्यामुळे असं वाटतं की श्रीदेवींना या स्थितीत हालचाल करण्यासाठी एक मिनिटसुद्धा वेळ मिळाला नसावा. त्यांनी थोडे जरी हातपाय हालवले असते तर पाणी बाथटबमधून बाहेर आलं असतं. पण फ्लोअरवर जराही पाणी पडलेलं नव्हतं."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)