ICC महिला T20 विश्वचषक : भारताची विजयी घोडदौड रोखत इंग्लंड फायनलमध्ये

    • Author, आदेश कुमार गुप्त
    • Role, क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

UPDATE - वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या महिला क्रिकेट T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. यासोबतच भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

नताली स्किवर हिने 40 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 52 धावांची खेळी करत इंग्लंडकडे विजय खेचून नेला. भारताकडून दीप्ती शर्मा आणि राधा यादाव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवल्या. पण 113 धावांचं आव्हान इंग्लंडने 17.1 षटकातच पूर्ण केलं.

सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात आधी भारतीय संघ 19.3 षटकात 112 धावांवर गारद झाला. पहिल्या चार फलंदाज - तान्या भाटिया (11), स्मृती मंधाना (34), जेमिमा रॉड्रिग्स (26) आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर (16) यांच्याशिवाय कुणीच दुहेरी धावसंख्या गाठू शकलं नाही.

इंग्लंडच्या हेथर नाईट तीन तर क्रिस्टी लुईस गॉर्डन आणि सोफी एक्लेस्टोन यांनी दोन-दोन बळी घेतले.

पहिल्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजला 71 धावांनी पराभूत करून ऑस्ट्रेलियानं आधीच फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. त्यामुळे आता इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा पारंपरिक प्रतिस्पर्धींचा अंतिम सामना रविवारी होईल.

भारतीय महिला क्रिकेट संघांची ही सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याची तिसरी वेळ होती. टाकूया एक नजर भारतीय संघाच्या या स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या प्रवासावर -

भारतीय संघाची दमदार कामगिरी

पूल B मधील सर्व चार सामने जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. संघानं गतविश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केलं आहे.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाकडून अशा प्रकारच्या खेळीची अपेक्षा कदाचित कुणीच केली नसेल.

शनिवारी पूल Bच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघानं 2010, 2012 आणि 2014मध्ये विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला 48 धावांनी पराभूत केलं होतं. यासोबतच 2010नंतर पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं सोमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

ICC महिला क्रिकेट विश्व चषक 2009मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये आयोजित केला होता. तेव्हाही भारतीय महिला क्रिकेट संघाने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर 2012, 2014 आणि 2016 मध्ये संघाला मात्र गट सामन्यांच्या फेरीतून पुढेच जाता आलं नाही.

भारताचा पॉवर पंच

यंदाही भारताच्या पूलमध्ये न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे संघ होते. पाकिस्तानशिवाय बाकी तिन्ही संघ T20 सामन्यांमध्ये बलाढ्य मानले जातात.

पण कॅप्टन हरमनप्रीत कौर, माजी कॅप्टन मिताली राज, युवा खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रोड्रिग्स आणि गोलंदाज पूनम यादव यांच्या खेळीमुळे भारतीय संघानं 8 वर्षांनंतर सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला होता.

भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यापूर्वी न्यूझीलंडला 42 धावांनी, पाकिस्तानला 7 विकेट्सनी तर आयर्लंडला 52 धावांनी हरवलं होतं.

आता बोलूया या स्पर्धेत चमकलेल्या खेळाडूंविषयी.

कॅप्टनची जादू

पूल B मधील भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर झाला. यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं 51 चेडूंचा सामना करत 7 चौकार आणि 8 षटकार लगावत 103 धावा काढल्या. T20 क्रिकेट सामन्यांतील एका भारतीय महिला खेळाडूचं हे पहिलंच शतक होतं.

याबाबत तिने नंतर सांगितलं की, कमरेला दुखापत झाल्यामुळे एक-एक धाव घेण्यापेक्षा मी चेंडूला सीमोपार पाठवणं पसंत केलं.

यानंतर ऑस्ट्रलियाबरोबरच्या सामन्यातही त्यांनी 43 धावा काढत संघाचा डाव सांभाळण्याचं काम केलं. आतापर्यंत या स्पर्धेत त्यांनी 12 षटकार ठोकले आहेत, हाही एक विक्रम आहे.

मिताली राजचं योगदान

सेमीफायनलमध्ये माजी कर्णधार मिताली राजला जागा मिळाली नाही. पण आतापर्यंतच्या भारतीय संघाच्या कामगिरीबाबत चर्चा करायची झाल्यास तिच्या योगदानाबद्दल बोलावंच लागेल.

खरं तर पाकिस्तानबरोबरच्या सामन्यात कॅप्टन हरमनप्रीत कौरनं प्रशिक्षक आणि अन्य खेळाडूंशी चर्चा करत मिताली राजला मधल्या फळीत खेळायला पाठवलं. याला कारण मिताली राज स्पिन चेंडूंवर चांगलं खेळते.

मितालीनंही या सामन्यात 56 धावा केल्या. भारतीय संघापुढं 134 धावांचं टार्गेट होतं, जे संघानं 19व्या षटकात 7 गडी राखून पूर्ण केलं. यामुळे हरमीनप्रीत कौरचा निर्णय किती योग्य होता, हे समजलं.

यानंतर आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातही मितालीनं 51 धावा काढल्या. सलग दोन अर्धशकत झळकावत तिने आपल्या टीकाकारांनाही उत्तर दिलं, जे मितालीला आतापर्यंत फक्त कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची खेळाडू मानत होते.

आतापर्यंत एकूण 85 T20 सामन्यांमध्ये मितालीनं 17 अर्धशतकांच्या जोरावर 2,283 धावा केल्या आहेत.

स्मृतीची बॅटिंग

स्मृती मंधाना भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्मृतीनं 83 धावा केल्या. हा सामना भारतानं 48 धावांनी जिंकला.

आयर्लंडविरुद्ध स्मृतीनं 33 तर पाकिस्तानविरुद्ध 26 धावा केल्या.

जेमिमा आणि पूनम

जेमिमा रॉड्रिग्सनं न्यूझीलंडविरुद्ध 59 धावा करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानविरुद्ध तिनं 16 तर आयर्लंडविरुद्ध 18 धावा केल्या.

गोलंदाज पूनम यादवनं चार सामन्यांत 8 विकेट घेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. न्यूझीलंडविरुद्ध 33 धावा देत तिनं तीन विकेट घेतल्या.

या पाच खेळाडूंच्या जोरावर भारताने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती आजही यापैकीच बऱ्याच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, पण इंग्लंडच्या खेळापुढे ते निष्प्रभ ठरले.

आता इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे 5.30ला सुरू होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)