पृथ्वी शॉचं पुनरागमन, न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात

भारतीय संघाची दारं पुन्हा उघडावीत यासाठी धावांची टांकसाळ उघडणाऱ्या पृथ्वी शॉ याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी पृथ्वीची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

23वर्षीय पृथ्वीने 5 टेस्ट, 6 वनडे आणि एकमेव ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2021 नंतर त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. गेल्या वर्षभरात पृथ्वीने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळच उघडली आहे.

काही दिवसांपूर्वीच गुवाहाटी इथे रणजी क्रिकेट स्पर्धेच्या आसामविरुद्धच्या लढतीत पृथ्वीने विक्रमी खेळी केली होती. त्यानंतर बोलताना पृथ्वी म्हणाला होता, भारतीय संघनिवडीचा मी विचार करत नाहीये. सध्या माझं ध्येय मुंबईला जिंकून देणं हे आहे.

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील संघ ट्वेन्टी20 मालिकेत खेळणार आहे. अनुभवी विराट कोहली तसंच कर्णधार रोहित शर्मा यांचा या मालिकेसाठी विचार झालेला नाही. सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.

संजू सॅमसन दुखापतग्रस्तच असल्याने विदर्भच्या जितेश शर्माला संघात कायम राखण्यात आलं आहे. वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांच्यावर फिरकी माऱ्याची जबाबदारी असेल तर वेगवान आक्रमण उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग हाताळतील.

ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी या महाराष्ट्राच्या शिलेदारांनी संघातलं स्थान कायम राखलं आहे.

मुंबई आणि आसाम यांच्यातील रणजी करंडक स्पर्धेची लढत गुवाहाटी इथे झाली होती. या लढतीत पृथ्वीने 379 धावांची तडाखेबंद खेळी केली. आसामच्या अनुनभवी आक्रमणाचा आणि फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीचा त्याने पुरेपूर फायदा उठवला. पृथ्वीने 49 चौकार आणि 4 षटकारांसह 379 धावांची खेळी सजवली.

विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली या स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या पृथ्वीने या खेळीसह निवडसमितीसमोर चांगली डोकेदुखीच निर्माण केली आहे. रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम भाऊसाहेब निंबाळकर यांच्या नावावर आहे. 1948-49 मध्ये भाऊसाहेबांनी महाराष्ट्रासाठी खेळताना नाबाद 448 धावांची खेळी केली होती. पृथ्वी या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र रायन परागने त्याला बाद करत ही खेळी संपुष्टात आणली.

या खेळीदरम्यान पृथ्वीने रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकर खेळाडूचा वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही नावावर केला.

19 चेंडूत केलं होतं अर्धशतक

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 चे सामने सुरु आहेत. या सामन्यात पृथ्वी शॉने 19 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. मुंबई संघाकडून खेळताना त्याने आसाम विरूद्ध हे अर्धशतक ठोकलं होतं. या त्याच्या अर्धशतकी खेळीचे खुप कौतुक होत आहे.

दरम्यान टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी पृथ्वी शॉने ठोकलेल्या वेगवान अर्धशतकाची चर्चा सुरू झालीय. त्याचबरोबर पृथ्वी शॉला टी-20 संघात का संधी देण्यात आली असा सवाल आता उपस्थित होऊ लागले आहे.

दरम्यान, क्रिकेटसाठी मोठ्या किटबॅगसह पालघर ते चर्चगेट असा चार तासांचा प्रवास दररोज करणारा पृथ्वी शॉ. त्यानं काही दिवसांपूर्वी भारतीय संघासाठी पदार्पण केलं.

भारतासाठी टेस्ट मॅच खेळणारा तो 293वा खेळाडू ठरला. 2013 नंतर भारताच्या टेस्ट संघात मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा पृथ्वी पहिलाच खेळाडू ठरला.

पृथ्वी शॉ याचं पदार्पण सचिन तेंडुलकरच्या कसोटी पदार्पणाची आठवण करून देणारं ठरलं.

सचिननं 15 नोव्हेंबर 1989 रोजी 16व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. योगायोग म्हणजे पृथ्वीचा खेळ पाहून सचिनची आठवण येत असल्याचं क्रिकेट जाणकार, समालोचक, ज्येष्ठ पत्रकार सांगतात.

पृथ्वीसाठी महत्त्वाचे ठरलेले 10 टप्पे

1.नोव्हेंबर 2013मध्ये पृथ्वी शॉ यानं मुंबई क्रिकेटची ओळख असलेल्या हॅरिस शिल्ड स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफील्ड संघातर्फे खेळताना 546 रन्सची विक्रमी खेळी केली. सहा तास आणि सात मिनिटांच्या या प्रदीर्घ खेळीत 14वर्षीय पृथ्वीनं तब्बल 85 चौकार आणि 5 षटकार लगावले.

पृथ्वीची ही संस्मरणीय खेळी पुढील तीन वर्षं कोणत्याही देशातल्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली होती. याच स्पर्धेत 1988 मध्ये सचिन तेंडुलकरने 326 धावांची विक्रमी खेळी साकारली होती. पृथ्वीच्या खेळीने सचिनची आठवण ताजी झाल्याचं मुंबईतल्या असंख्य दर्दी क्रिकेटचाहत्यांनी सांगितलं. 2012 आणि 2013 मध्ये पृथ्वीच्या नेतृत्वाखालील रिझवी स्प्रिंगफिल्डने हॅरिस शिल्ड स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं.

2. स्थानिक क्रिकेटचा गाभा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेत पृथ्वीनं शतकी पदार्पण केलं. विशेष म्हणजे दुलीप ट्रॉफी पदार्पण सामन्यातही पृथ्वीनं शतकी खेळी साकारली होती. 17व्या वर्षी दुलीप ट्रॉफी पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी सगळ्यांत लहान वयाचा खेळाडू ठरला. या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

3. मुंबईचं प्रतिनिधित्व करताना पृथ्वीच्या नावावर सात शतकं आणि 5 अर्धशतकांसह 56.72च्या दमदार सरासरीसह 14 मॅचेसमध्ये 1418 धावा आहेत.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्याबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल काय म्हणाला होता पृथ्वी शॉ, ऐका बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत.

4. यंदाच्या वर्षीच पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा (19 वर्षांखालील) संघाने U19 वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम केला होता. मोहम्मद कैफ (2000), विराट कोहली (2008), उन्मुक्त चंद (2012) या वर्ल्डकपविजेत्या कर्णधारांमध्ये पृथ्वीचा समावेश झाला आहे.

5. स्थानिक क्रिकेटमधल्या सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळेच पृथ्वीला IPL स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्सने आपल्या ताफ्यात सामील केलं.

6. पृथ्वीला 2012 मध्ये इंग्लंडमधल्या मँचेस्टर इथल्या चीडल हुल्म शाळेतर्फे खेळण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं. दोन महिन्यांच्या कालावधीत या संघातर्फे खेळताना त्याने 1446 धावा केल्या. पदार्पणात शतकी खेळीचा विक्रम करण्याबरोबरच त्याने आपल्या फिरकीच्या बळावर 68 विकेट्सही घेतल्या. या दोन महिन्यांदरम्यान पृथ्वीला हाय लेन क्रिकेट क्लबतर्फेही खेळण्याची संधी मिळाली.

7. सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीमुळे पृथ्वीला इंग्लंडमधल्या ज्युलियन वूड क्रिकेट अकादमीतर्फे खेळण्याची संधी मिळाली. 2014 मध्ये इंग्लंडमधल्याच यॉर्कशायर ईसीबी काऊंटी प्रीमिअर लीग स्पर्धेतही पृथ्वी खेळला.

8. नोव्हेंबर 2016 मध्ये भारतीय युवा संघाने युवा आशियाई चषक जिंकला होता. पृथ्वीने त्या संघाचं यशस्वी नेतृत्व केलं होतं.

9. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध खेळताना पृथ्वीने 188 धावांची तडाखेबंद खेळी साकारली होती. त्याआधी वेस्ट इंडिज अ विरुद्ध 102 तर लिस्टर संघाविरुद्ध 132 धावा केल्या होत्या.

10. गेल्या महिन्यात पृथ्वीने बेंगळुरूत दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 136 धावांची सुरेख खेळी केली होती.

नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्याच्या शेवटच्या कसोटीसाठी पृथ्वीला पंधरा सदस्यीय संघात समाविष्ट करण्यात आलं होतं. मात्र पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत संघ व्यवस्थापनाने सलामीवीर शिखर धवनवर विश्वास कायम ठेवला.

त्यामुळे पृथ्वीचं पदार्पण लांबलं. मात्र इंग्लंड दौऱ्यात लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठीच्या मालिकेतून शिखरला डच्चू देण्यात आला. स्थानिक स्पर्धांमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या मयांक अगरवाल यालाही या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं.

अंतिम अकरात येण्यासाठी मयांक आणि पृथ्वी यांच्यात चुरस होती. मात्र कर्णधार कोहली आणि संघव्यवस्थापनाने पृथ्वीवर विश्वास ठेवत त्याला 18व्या वर्षी पदार्पणाची संधी दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)