गर्भावर होतो प्रदूषणाचा गंभीर परिणाम, साध्या उपायांनी होऊ शकतो बचाव

    • Author, कमलेश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मुलं घराबाहेर खेळतील, वाढतील, मोकळ्या हवेत श्वास घेतील तर त्यांची शारीरिक वाढ उत्तम होते, असा समज आहे. मात्र हल्ली मोकळ्या हवेतला हाच श्वास लहान मुलांसाठी घातक ठरू लागला आहे. 

हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत. ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीत मोठे अडथळे निर्माण होऊ लागलेत.

प्रदूषणाचा लहान मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नुकत्याच सादर झालेल्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालानुसार 2016 साली जगभरात प्रदूषणामुळे पाच वर्षांखालच्या लाखभराहून जास्त (101788.2) मुलांचा मृत्यू झाला आहे. 

'Air Pollution and Child Health : Prescribing Clean Air', नावाने प्रसिद्ध करण्यात आलेला हा अहवाल वाढत्या प्रदूषणामुळे वाढत्या आजारांबद्दल सावध करतो. 

भारतात पाच वर्षांखालच्या मुलांच्या मृत्यूंमधले जास्त मृत्यू हे हवेतल्या PM 2.5 या पार्टिक्युलेट मॅटरमुळे झाले आहेत. पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे हवेतले धूळ आणि घाणीचे अतिसूक्ष्म कण जे श्वासोच्छासाद्वारे शरीरात जातात. 

मुलांसाठी घातक प्रदूषण

या प्रदूषणामुळे भारतात 60,987, नायजेरियात 47,674, पाकिस्तानात 21,136 तर कांगोमध्ये 12,890 मुलांचा मृत्यू झाला आहे. 

यात लहान मुलींचं प्रमाण जास्त आहे. एकूण आकडेवारीच्या 32,889 मुली आणि 28.097 मुलं या प्रदूषणामुळे दगावली आहेत. 

जन्माला आलेलीच मुलं नाही तर गर्भातल्या बाळांवरही या प्रदूषणाचा मोठा परिणाम होताना दिसतोय. या अहवालानुसार प्रदूषणामुळे वेळेआधीच प्रसुती (premature delivery), बाळामध्ये शारीरिक किंवा मानसिक व्यंग, कमी वजन आणि मृत्यूसुद्धा ओढावू शकतो.

प्रदूषण सर्वांसाठीच वाईट आहे. मात्र अहवालातली आकडेवारी बघितली तर लहान मुलं प्रदूषणाला सर्वाधिक बळी पडताना दिसतात. त्यामुळे प्रदूषण मुलांसाठी का घातक आहे आणि गर्भातल्या बाळावर त्याचा कसा परिणाम होतो, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. 

नवजात बाळ आणि मोठी मुलं

प्रदूषणाचा नवजात बालकं आणि मोठी मुलं (बाहेर खेळू शकणारी) यांच्यावर वेगवेगळा परिणाम होतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. नवजात बालकं आजारांचा सामना करण्यासाठी फार सक्षम नसतात. ती जसजशी मोठी होतात त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढू लागते.

प्रिम्स हॉस्पिटलचे फुफ्फुसतज्ज्ञ डॉ. एस. के. छाब्रा सांगतात, "नवजात बालकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. त्यांची फुफ्फुसं पूर्णपणे विकसित झालेली नसतात. अशा परिस्थितीत प्रदूषणाचा त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. हा परिणाम सर्दी-पडशासारख्या अलर्जीच्या स्वरुपात असू शकतो किंवा त्यामुळे दमा आणि श्वासाच्या समस्यांसारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या आजारांमुळे मृत्यूदेखील ओढावू शकतो. हा काळ बाळाच्या मानसिक वाढीसाठी महत्त्वाचा काळ असतो आणि प्रदूषित घटकांमुळे त्यात अडथळे निर्माण होतात."

"घरातील प्रदूषणाचा नवजात बालकांवर जास्त परिणाम होत असतो. हे प्रदूषण स्वयंपाक करण्यामुळे, एसीमुळे, परफ्युम, सिगारेटचा धूर आणि उदबत्त्यांमुळे होऊ शकतं. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी लाकूड किंवा कोळशाचा वापर होता. त्याचा बाळांच्या फुफ्फुसांवर मोठा परिणाम होतो."

अहवालातसुद्धा घरातील आणि बाहेरील प्रदूषणावर स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे. घरातील प्रदूषणसुद्धा तेवढंच घातक असतं जेवढं बाहेरचं असतं. 2016मध्ये घरातील प्रदूषणामुळे पाच वर्षांखालच्या 66,890.5 बालकांचा मृत्यू झाला आहे. 

याची कारणं सांगताना डॉ. छाब्रा म्हणतात, "नवजात बालकं सहसा घरातच राहतात. त्यांचा फरशीशी जास्त संपर्क येतो. ते चालणं सुरू करतात, तेव्हा बहुतेकवेळा आपल्या आईबरोबर असतात. त्यामुळे त्यांचा जास्त वेळ स्वयंपाक घरात जातो. त्यामुळे ही मुलं घरातल्या प्रदूषणामुळे अधिक बाधित होतात आणि हे प्रदूषण त्यांच्यासाठी बाहेरच्या प्रदूषणापेक्षा जास्त घातक ठरतं."

मोठ्या मुलांवर परिणाम

मोठ्या मुलांसंबंधी गंगाराम हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. धिरेन गुप्ता सांगतात की मुलं थोडी मोठी झाली की ती घराबाहेर खेळू लागतात. घरी ते कमी वेळ घालवतात.

सकाळी प्रदूषणाचं प्रमाण अधिक असतं आणि याच वेळी मुलं शाळेत जातात. त्यामुळे या वयात त्यांच्यावर बाहेरच्या प्रदूषणाचा जास्त परिणाम होतो. हल्ली खूप लहान वयात मुलांना चश्मा लागतो. यामागे प्रदूषण हेदेखील एक कारण आहे.

डॉ. धीरेन गुप्ता सांगतात वय वाढतं तसं रोगप्रतिकारक क्षमतादेखील वाढते. मात्र कुठल्याही वयात प्रदूषणाचा परिणाम होऊ शकतो. श्वसनाचा त्रास असणाऱ्या मुलांसाठी परिस्थिती जास्त वाईट होते. प्रदूषणाचे कण हवेतल्या खालच्या भागात साचतात. त्यामुळेच लहान मुलांवर त्याचा जास्त परिणाम होतो. कारण त्यांची उंची कमी असते. 

ते सांगतात, "सध्याची प्रदूषणाची पातळी धोकादायक आहे आणि भविष्यात ती अधिक धोकादायक बनणार आहे. माझ्याकडे येणाऱ्या मुलांची संख्या तीस टक्क्यांनी वाढली आहे. मुलांच्या औषधीचं प्रमाणही वाढवावं लागलं आहे. त्यांच्यात संसर्गही वाढला आहे."

गर्भातल्या बाळावर परिणाम

प्रदूषणापासून गर्भातलं बाळही सुटू शकलेलं नाही, असं अहवाल सांगतो. प्रदूषणामुळे दिवस पूर्ण भरण्याआधीच प्रसुती होणं म्हणजेच प्रिमॅच्युअर प्रसुती आणि जन्मजात व्यंग होण्याची शक्यता असते. 

मॅक्स हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिता चंदना यासुद्धा याला दुजोरा देतात. प्रदूषण आईपासून बाळापर्यंत कसं पोचतं, याबद्दल त्या माहिती देतात. 

डॉ. अनिता सांगतात, "गर्भ राहण्याआधी किंवा गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यातच बाळावर हवेतील प्रदूषणाचा सर्वांत जास्त परिणाम होत असतो. आईने श्वास घेतल्यावर हवेत असलेले पार्टिक्युलेट मॅटर तिच्या शरिरात पोचतात. ते इतके सूक्ष्म असतात की त्यातले काही आईच्या फुफ्फुसांना चिकटतात, काही रक्तात विरघळतात तर काही गर्भाशयाच्या आत असलेल्या वेष्टनापर्यंत म्हणजे प्लॅसेंटापर्यंत पोहोचतात. प्लॅसेंटा गर्भपिशवीच्या अगदी जवळ असतं त्यातून बाळाला पोषण मिळत असतं."

"हे पार्टिक्युलेट मॅटर किंवा प्रदूषित कण प्लॅसेंटावर गोळा होतात. तिथं थोडी सूज येते. हे अनैसर्गिक घटक प्लॅसेंटावर पोहोचतात तेव्हा तिथं पांढऱ्या पेशींची वाढ होते. त्यावर गाठ येते. त्यामुळे बाळापर्यंत सुरळित रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. गर्भाला रक्तातूनच पोषण मिळत असतं. कमी रक्तपुरवठ्यामुळे गर्भाचा विकास थांबतो. त्यामुळे बाळामध्ये शारीरिक किंवा मानसिक व्यंग उत्पन्न होऊ शकतं. त्याचा मेंदू पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही. जेव्हा प्लॅसेंटा सुरळित रक्तपुरवठा करू शकत नाही आणि लवकर परिवक्व होतो तेव्हा प्रिमॅच्युअर डिलिव्हरी होते."

डॉ. अनिता यांच्या म्हणण्यानुसार अशा परिस्थितीत बाळाचं वजन कमी होऊ शकतं. त्याला एखादा मानसिक आजार, दमा किंवा फुफ्फुसाशी संबंधित एखादा आजार जडू शकतो. हे इतकं गंभीर असू शकतं की बाळाचा मृत्यू होण्याचीही भीती असते.

असं असलं तरी डॉ. छाब्रा सांगातात की हे सर्वं आजार केवळ प्रदूषणामुळे होतात असं नाही. प्रदूषण हे अनेक कारणांपैकी एक कारण असू शकतं.

मात्र ते एकमेव कारण नाही. उदाहरणार्थ बाळाचं वजन कमी असेल तर ते आईकडून योग्य पोषण न मिळाल्यामुळे देखील असू शकतं. अनेक कारणांमुळेसुद्धा एखादा आजार होऊ शकतो. आजाराच्या कारणांमध्ये प्रदूषण भरच घालत असतो. 

अहवालातील इतर मुद्दे

  • पाच वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठीदेखील प्रदूषणापासून बचाव खूप महत्त्वाचा आहे. 2016मध्ये प्रदूषणामुळे 5 ते 14 वयोगटातली 4,360 मुलं दगावल्याचं अहवाल सांगतो. 
  • अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये पाच वर्षांपर्यंतची तब्बल 98% मुलं PM 2.5ने बाधित आहेत. उच्च उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये हा दर 52% इतका आहे.
  • हवेचं प्रदूषण हे वातावरणासाठीही मोठा धोका आहे. बाहेरच्या आणि घरातील हवेत असलेल्या प्रदूषणाच्या सूक्ष्म कणांमुळे दरवर्षी जगात 70 लाख बालकं जन्मापूर्वीच दगावतात. 

यावर उपाय काय?

  • सर्वांत पहिलं म्हणजे मातेला प्रदूषणापासून वाचवा म्हणजे गर्भातलं बाळ सुरक्षित राहिल.
  • घराच्या आतील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • नवजात बालकाला आईचं दूधच द्या. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. 
  • मुलांची रोगप्रतिकार यंत्रणा सुदृढ करण्यासाठी त्यांना संत्र, पेरू आणि लिंबू यासारखे विटामीन-सीने मुबलक प्रमाणात असलेले अन्नपदार्थ द्या.
  • दिवाळीसारख्या सणांमध्ये लोक रात्रभर लाईट सुरू ठेवतात, हे टाळा.
  • फटाक्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. त्यामुळे त्यांचा वापर कमी करा आणि प्रदूषण कमी करण्यात तुमचा खारीचा वाटा उचला. 

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)