You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इथले विध्यार्थी शिकणार हॅरी पॉटरचा जादुई कायदा
हॅरी पॉटरच्या काल्पनिक जगातील काही धडे आता कोलकात्यातल्या एका लॉ युनिव्हर्सिटीत शिकवले जाणार आहेत.
काल्पनिक आणि वास्तविक जगात कायद्याचा वापर कसा केला जातो याविषयीचा कोर्स कोलकात्यातील नॅशलन युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशिअल सायन्स (NUJS) येथे शिकवला जाणार आहे.
"सर्जनशील विचार रुजवण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे," असं प्रा. शौविक कुमार गुहा यांनी बीबीसीला सांगितलं.
अमेरिकेतल्या काही युनिव्हर्सिटींमध्ये तसंच इंग्लडमधल्या एक युनिव्हर्सिटीमध्ये हा विषय शिकवला जात आहे.
'काल्पनिक साहित्य आणि कायदा यातील संवाद : रॉलिंग यांच्या पॉटर विश्वाचा विशेष अभ्यास' ('An interface between Fantasy Fiction Literature and Law: Special focus on Rowling's Potterverse') असं या कोर्सचं नाव आहे. हा 45 तासांचा अभ्यासक्रम आहे.
या कोर्समधल्या काही मुद्द्यांतून भारतातील सामाजिक आणि वर्ग हक्कांच्या स्थितीची तुलना या काल्पनिक सीरिजमधल्या काही पात्रांशी केली आहे. उदाहरणार्थ, हॅरीचा तो छोटा नोकर दॉबी, जो गुलामगिरीचं प्रतीक बनतो किंवा ते भयावह वाटणारे वेअरवुल्फ, ज्यांना समाजात योग्य वागणूक दिली जात नाही.
डिसेंबरमध्ये हा कोर्स सुरू होणार आहे. 40 जणांना त्यात प्रवेश असून तो वर्ग फुल्ल झाला आहे. काही विद्यार्थ्यांनी मात्र प्रत्यक्ष भेटून या कोर्सची क्षमता वाढवण्याची विनंती केली आहे, असं गुहा सांगतात.
Game of Thrones किंवा StarTrek या सीरिजपेक्षा हॅरी पॉटरची भारतातील लोकप्रियता लक्षात घेऊन हा कोर्स तयार केला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
NUJSमधल्या चौथ्या आणि पाचव्या वर्षांतील B.A L.L.B (H)च्या विद्यार्थ्यांना हा कोर्स वैकल्पिक विषय म्हणून घेता येणार आहे.
गुहा यांच्या मते, आपल्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थांना केवळ चाकोरीबद्ध कायद्याच्या बाबींचा अभ्यास करायला प्रवृत्त केलं जातं. मग याआधी कधी न उद्भवलेल्या प्रसंगावर सध्याचे कायदे विद्यार्थ्यांना वापरता येतील का?
देशात सध्या प्रचंड बदल घडत आहेत. त्यामुळे एखाद्या नवख्या परिस्थितीकडे कसं बघावं, याचा अभ्यास काल्पनिक उदाहरणं देऊन केला जात आहे.
"विद्यार्थ्यांनी त्यांच्या कंफर्ट झोनमधून बाहेर येऊन" काल्पनिक कथांतून धडे घ्यावेत. हॅरी पॉटरच्या कथा वाचत किंवा बघत आताचे विद्यार्थी लहानाचे मोठे झाले आहेत."
राजकीय हितासाठी मीडियाचा कसा वापर केला जातो, याची हॅरी पॉटरच्या कथेत अनेक उदाहरणं आहेत. त्याचा आताच्या वास्तविक जगाशीही संबंध लागतो. काही परिस्थितीत वैधानिक संस्था कशा अपयशी ठरल्या आहेत हे जे. के रॉलिंग यांच्या लिखाणात दिसतं.
हॅरी पॉटर कथेतील खालील दोन वाक्यांनी या कोर्सची सुरूवात होते.
"ग्रँजर, तुला जादूई कायद्यामध्ये करिअर करायचं आहे का?" स्क्रिम्जर विचारतात.
"नाही मला नाही करायचं, असं हार्मनी ताडकन उत्तर देते. मला जगासाठी काही तरी चांगलं करायचं आहे!"
("Are you planning to follow a career in Magical Law, Miss Granger?" asked Scrimgeour.
"No, I'm not," retorted Hermione. "I'm hoping to do some good in the world!")
जगभरात हॅरी पॉटर मालिकेतल्या 7 पुस्तकांच्या 5 कोटींहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. तर 79 भाषेत या काल्पनिक कथा अनुवादित झाल्या आहेत.
UKमधल्या डरहम युनिव्हर्सिटीत पहिल्यांदा अशाच प्रकारचा कोर्स शिकवण्यात आला. यामध्ये त्यांनी पूर्वग्रह, नागरिकत्व आणि दादागिरी या विषयाचा अभ्यास केला.
अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांनी हॅरी पॉटरच्या कथांवर कोर्स तयार केला होता. पण त्यांच्यापैकी कोणीच कायद्यावर आधारित कोर्स तयार केलेला नव्हता, असं गुहा यांचं म्हणणं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)