You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#5मोठ्याबातम्या : महिला पैशांसाठी करतात लैंगिक छळाचे आरोप- भाजप खासदार
विविध वृत्तपत्रांमध्ये आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत :
1. 'महिला पैशांसाठी करतात लैंगिक अत्याचाराचे आरोप'
भाजपाचे खासदार उदित राज यांनी #Metto मोहिमेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. महिला पैशांसाठी लैंगिक अत्याचाराचे आरोप करतात, असं ते म्हणाले आहेत. याविषयीची बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे.
वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत उदित राज म्हणाले, काही महिला जाणूनबुजून पुरुषांवर असे आरोप करतात.
आरोप केल्यानंतर पुरूषाकडून या महिला 2-4 लाख रुपये घेतात आणि नंतर दुसऱ्या पुरूषाला लक्ष्य करतात असं उदित राज म्हणाले.
कदाचित पुरूषांचा हा प्राकृतिक स्वभाव असेल, असंही मी मान्य करतो. पण महिलाही सभ्य आहेत काय? या गोष्टीचा त्या दुरूपयोग करत नाहीत का, अशाप्रकारच्या महिलांमुळे पुरूषांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, असंही ते पुढे म्हणाले.
2. नाना पाटेकर यांना महिला आयोगाची नोटीस
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर महिला आयोगानं अभिनेते नाना पाटेकर यांना नोटीस बजावली आहे.
गणेश आचार्य, समीर सिद्दीकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे आणि या चौघांवर केलेल्या कारवाईचा अहवाल देण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत. यासंबंधिची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.
तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप करतानाच त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपानंतर महिला आयोगानं आज अखेर या प्रकरणाची दखल घेतली आहे.
तनुश्री- नाना प्रकरणाची 'सिंटा'द्वारे (सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे.
3.'सहा आठवड्यात शिर्डी संस्थानावर नवे विश्वस्त नेमा'
येत्या सहा आठवड्यात शिर्डी संस्थानावर नवे विश्वस्त नेमा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. याविषयीची बातमी एबीपी माझाच्या वेबसाईटनं दिली आहे.
त्यामुळे साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाला चांगलाच धक्का बसला आहे. या प्रकरणात शिर्डी संस्थानवर विश्वस्त म्हणून नेमण्याच्या व्यक्तीची पात्रता वा अपात्रता कशी ठरवावी, हा वादाचा मुद्दा होता.
ही नेमणूक करताना स्वच्छ चारित्र्याचे, कोणतेही गुन्हे दाखल नसलेले सदस्य नेमणं आवश्यक होतं, पण माहितीच्या अधिकारात समोर आलं की विश्वस्त मंडळात नेमणूक झालेल्या अनेक सदस्यांवर गुन्हे दाखल होते.
4. भारतातली पहिली कवटीबदलाची शस्त्रक्रिया पुण्यात
भारतातली पहिलीवहिली कवटी बदलाची शस्त्रक्रिया पुण्यात पार पडली. ही शस्त्रक्रिया चार वर्षांच्या मुलीवर करण्यात आली. ही मुलगी मागच्या वर्षी एका अपघातात जखमी झाली होती. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे.
या शस्त्रक्रियेनंतर तिची कवटी 60 टक्के बदलण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. त्यांचा दावा आहे की या आधी अशा शस्त्रक्रिया इतर देशात व्हायच्या पण आता त्या भारतात करणं शक्य झालं आहे.
एका विशिष्ट प्रकारच्या पॉलिथिलीनचं हाड तिच्या डोक्यात बसवलं आहे.
युवा ऑलिंपिक-मनू भाकेरचा सुवर्णवेध
भारताची १६ वर्षीय नेमबाज मनू भाकेरनं युवा ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. मनूने २३६.५ अंकांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
भारताला युवा ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत मिळालेलं हे पहिलंवहिलं सुवर्णपदक आहे. मनू भाकेरनं याआधी वर्ल्ड कप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
त्यानंतर आता युवा ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकून तिने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. यंदाच्या वर्षी विविध स्पर्धांमध्ये मिळून चार सुवर्णपदकांवर तिनं नाव कोरलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)