#Metoo: आलोक नाथ बलात्काराच्या आरोपांवर म्हणाले 'कुछ तो लोग कहेंगे'

    • Author, टीम बीबीसी हिंदी
    • Role, नवी दिल्ली

2017 साली अमेरिकेत सुरू झालेल्या #MeToo चळवळ वर्षभरातच भारतात धडकली आहे. आधी बॉलिवुडमध्ये आणि नंतर प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या महिलांनी ही मोहीम रेटून धरली आहे.

अभिनेता नाना पाटेकर, दिग्दर्शक विकास बहल, कॉमेडियन उत्सव चक्रवर्ती यांच्या पंक्तीत आणखी एका नाव समोर आलं आहे.

पडद्यावर 'संस्कारी' अशी प्रतिमा असलेल्या एका अभिनेत्यावर 'तारा' मालिकेच्या दिग्दर्शिका आणि निर्माती विनिता नंदा यांनी बलात्काराचा आरोप लावला आहे. एका फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी असा आरोप लावला आहे.

विनिता नंदा यांनी थेट कुणाचंही नाव घेतलं नाही आहे. 'तारा' या मालिकेत आलोक नाथ हे दीपक सेठ या पात्राच्या भूमिकेत होते.

या फेसबुक पोस्टवर प्रतिक्रिया देताना आलोक नाथ यांनी "कुछ तो लोग कहेंगे. ना मी हे स्वीकारतोय, ना नाकारतोय," असं म्हटलं आहे.

त्या लिहितात, "टीव्हीवर तेव्हा अगदी पहिल्या क्रमांकावर असलेल्या तारा या मालिकेची मी निर्माती होते. मला त्या व्यक्तीत काडीचाही रस नव्हता. तो दारुडा आणि अतिशय वाईट माणूस होता. मात्र टीव्ही क्षेत्रातला मोठा अभिनेता असल्यामुळे त्याच्या चुका माफ होत्या. मालिकेतल्या अभिनेत्रीने तक्रार केली तेव्हा आम्ही त्याला काढून टाकण्याचाही विचार केला होता."

"मला आठवतंय की आम्हाला शेवटचा शॉट घ्यायचा होता. आम्ही त्याला काढणारच होतो. शूटिंग झाल्यानंतर ही माहिती आम्ही त्याला देणार होतो. तो दारू पिऊन टेक द्यायला आला. कॅमेरा रोल होताच त्याने या अभिनेत्रीबरोबर गैरवर्तणूक केली. अभिनेत्रीने त्याच्या श्रीमुखात भडकावली. त्याला सेटवरून जायला सांगितलं आणि अशा पद्धतीने तो मालिकेतून निघून गेला."

त्यानंतर त्यांच्याबरोबर घडलेल्या प्रसंगाचं वर्णन करताना त्या लिहितात, "त्याने मला पार्टीसाठी घरी बोलावलं. आम्ही ग्रुपमध्ये पार्टी करायचो, त्यामुळे काही वेगळं वाटलं नाही. पार्टीत मी जे प्यायले त्यात काहीतरी मिसळलं होतं. रात्री दोन वाजता मला अस्वस्थ वाटू लागलं आणि मी घरी जायला लागले. कुणीही मला घरी सोडायला आलं नाही, त्यामुळे मी एकटेच पायी निघाले. तर रस्त्यात मला हा माणूस भेटला. तो त्याच्या कारमध्ये होता आणि त्याने मला कारमध्ये बसायला सांगितलं. मला घरी सोडेल, असं त्याने मला सांगितलं. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि कारमध्ये बसले. त्यानंतर जे झालं ते मला फारसं आठवत नाही."

"शेवटचं आठवतं त्याप्रमाणे मला बळजबरीने दारू पाजण्यात आली. मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मला फार वेदना होत होत्या. माझ्या घरीच माझ्यावर बलात्कार झाला होता. माझ्या मित्रमैत्रिणींना सांगितलं तेव्हा त्यांनी मला हे सगळं विसरण्याचा सल्ला दिला."

"आता वीस वर्षांनंतर मी बरी आहे. कोणत्याही मुलीला सत्य सांगताना भीती वाटू नये, म्हणून मी हे सगळं सांगितलं," असं त्या लिहितात.

या प्रकरणी ABP न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आलोक नाथ म्हणाले, "मी ना हे झाल्याचं नाकारतो, ना त्याला दुजोरा देतो. जर तसं काही झालं होतं, तर कुणीतरी दुसऱ्याने ते केलं असेल. मला यावर जास्त बोलायचं नाहीये, कारण आता हे प्रकरण बाहेर आलं आहे, तर ते ताणलं जाणारच."

ट्विटर, फेसबुकवर शेअर होत असलेल्या #MeToo चळवळीत एखाद्या व्यक्तीची सहमती आणि त्याची गुंतागुंत, यावरून एक नवीन वाद उद्भवला आहे.

मागच्या आठवड्यात जोर पकडलेल्या या मोहिमेनं सगळ्यांत मोठा झटका भारतीय प्रसारमाध्यमांना दिला आहे. प्रसारमाध्यमातल्या अनेक महिलांनी त्यांच्याबरोबर झालेल्या छळवणुकीचे किस्से शेअर केले आहेत. इतकंच नाही तर अनेक महिलांनी ज्यांच्यावर छळवणुकीचे आरोप आहेत, त्यांची नावंसुद्धा जगजाहीर केली आहेत.

यावरही आलोक नाथ म्हणाले, "या चळवळीमुळे आता लोक फक्त महिलांची बाजूच ऐकत आहोत, कारण त्यांना दुबळं समजलं जातं. म्हणून या आरोपांवर मी काहीही प्रतिक्रिया दिली तरी ती चूकच असेल. त्यापेक्षा मी न बोललेलं बरं."

नाव घेण्याची ही पहिलीच वेळ नाही

4 ऑक्टोबरला कॉमेडिअन उत्सव चक्रवर्तीवर अनेक महिलांनी लैंगिक छळवणुकीचा आरोप लावला. 33 वर्षांच्या उत्सववर स्वतःचे अश्लील फोटो पाठवण्याची आणि अनेक महिलांकडून तसेच न्यूड्स मागण्याचा आरोप अनेक महिलांनी केला.

उत्सवने सर्व आरोप स्वीकारले आणि माफीनामा सादर केला. त्यानंतर या मोहिमेनं भारतात जोर पकडला. एका मागोमाग एक छळवणुकीच्या घटना समोर आल्या आणि महिलांनी या घटना फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून शेअर करायला सुरुवात केली.

पुढल्या तीन दिवसांत अनेक संपादक, पत्रकार, लेखक, अभिनेता आणि चित्रपट क्षेत्रातल्या व्यक्तींची नावं समोर आली. महिलांची छळवणूक केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले.

लैंगिक छळवणूक करणाऱ्यांची नावं पहिल्यांदा समोर आल्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017मध्ये कायद्याच्या एका विद्यार्थिनीने क्राऊड सोर्स केलेली एक यादी फेसबुकवर जाहीर केली. त्यात देशभरातील 50 प्राध्यापकांवर छळवणुकीचा आरोप लावला होता. या यादीत अनेक प्राध्यापकांच्या नावाचा थेट उल्लेख होता.

प्रसारमाध्यमातील #MeToo

महिला पत्रकार अगदी खुलेपणानं त्यांच्यावर उद्भवलेल्या परिस्थितीवर बोलत आहेत. हे आधी कधीही झालं नव्हतं. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात या चळवळीचा सगळ्यांत जास्त परिणाम दिसून येत आहे.

वर्तमानपत्रांनीसुद्धा संपादक आणि रिपोर्टरवर लागलेल्या या आरोपांना प्राधान्य दिलं. त्यामुळे मीडिया हाऊसेसला प्रतिक्रिया देणं भाग पडलं. एका मोठ्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी चौकशीचं आश्वासन दिलं आहे. या संपादकांवर त्यांच्याबरोबर काम केलेल्या सात महिलांनी लैंगिक छळवणुकीचे आरोप लावले आहेत. त्याबरोबरच वर्तमानपत्राच्या मुख्य संपादकांनी या संपादकाला पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांचा आवाज ऐकला जातोय...

असभ्य वर्तन, अश्लील मेसेज किंवा अगदी लैंगिक छळ अशा आरोपांसह महिला आता समोर येऊ लागल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महिला या मोहिमेला अत्यंत नाजूकपणे हाताळत आहेत, जेणेकरून या मोहिमेचं गांभीर्य कमी होणार नाही. भारतात लोक महिलांची बाजू ऐकत आहेत. आरोपींवर कडक कारवाईसुद्धा होत आहे. लैंगिक छळवणुकीत सहभागी असणाऱ्या लोकांनी समोर येऊन माफी मागितली आहे. त्यामुळे महिलांना बळ मिळालं आहे.

AIBने उत्सव चक्रवर्तीचे सगळे व्हीडिओ युट्यूबवरून काढून टाकले आहेत. घटनेची माहिती आधीपासूनच असल्यामुळे सहसंस्थापक तन्मय भटला पदावरून हटवण्यात आलं आहे. हॉटस्टारने AIB बरोबर आपला करारही संपुष्टात आणला आहे.

दिग्दर्शक विकास बहल त्यांच्या 'सुपर-30' या आगामी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेता ऋतिक रोशननं विकास यांच्यावर कडक कारवाई करण्याचं समर्थन केलं आहे.

प्रसारमाध्यमामधल्या लोकांविरुद्धही कडक पावलं उचलण्यात येत आहेत.

आतापर्यंत ज्या महिलांनी समस्या मांडल्या तेव्हा त्यांच्यावर प्रश्न उपस्थित झाले. उदा, आतापर्यंत कुठे होतीस? जर इतक्या अडचणी होत्या तर पोलिसांकडे का गेली नाही? आता त्यांना प्रश्न विचारण्याऐवजी माफी मागितली जात आहे. ज्या महिलांनी एक आशेचा किरण म्हणून पाहिलं, ज्या व्यक्तींनी वेळीच कारवाई करणं अपेक्षित होतं, आता तेच लोक माफी मागत आहे.

कॉमेडियन तन्मय भट, कुनाल कामरा, गुरसिमरन खंबा, चेतन भगत अशा अनेक लोकांनी माफी मागितली. त्यामुळे महिलांचा धीर वाढतोय.

आता पुढे काय?

बीबीसी दिल्लीतील पत्रकार गीता पांडे सांगतात, "अशा प्रकरणांचा सध्या पूर आला आहे. अशा छळवणुकीला किती लोक बळी पडले आहेत, हे अद्याप अस्पष्ट आहे. अनेक लोक या मोहिमेला भारताची #MeToo चळवळ म्हणत आहे."

मात्र भारतात सुरू झालेली ही मोहीम हॉलिवुडइतकी प्रबळ आहे का?

"हॉलिवुडमध्ये अनेकांची नावं समोर आली. काही लोकांवर बंदीही आली. ही मोहीम कुठवर जाईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या लोकांची नावं समोर आली आहेत, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या मोहिमेचा भारतात फारसा प्रभाव पडला नव्हता. आता त्याचा प्रभाव पडतो आहे तर तो किती दूरवर जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल."

"ज्या लोकांनी आपल्या कहाण्या सांगितल्या त्यांचं काही नुकसान तर होणार नाही ना, हे पाहावं लागेल. अनेक महिला त्यांना धमकी मिळाल्याचं सांगत आहेत. मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. म्हणूनच अनेक महिला समोर येत नाहीये," असं त्या पुढे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)