केरळ पूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली हवाई पाहणी

केरळमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे थैमान कायम असून गेल्या दहा दिवसांत 171 जणांचा मृत्यू झाल्याचं केरळच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितलं आहे. तर, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 1 जूनपासून मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 324 झाली आहे. पूरस्थिती गंभीर झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री उशिरा केरळमध्ये दाखल झाले.

केरळमध्ये धुवांधार पावसामुळे पूरस्थिती दहा दिवसानंतरही कायम आहे. पावसामुळे मदतकार्यात देखील अडथळा निर्माण होत आहे.

या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे अंत्यसंस्कार झाल्यावर पंतप्रधान मोदी रात्री 11 वाजता केरळमध्ये पोहोचले.

तर शनिवारी सकाळी भारतीय नौदलाच्या विमानानं पंतप्रधान कोची इथे पोहोचले. यावेळी विमानतळावर राज्यपाल सथाशिवम आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री विजयन यांच्यासह ते पूरग्रस्त परिसराचा आढावा घेतील.

"गेल्या शंभर वर्षातला हा सगळ्यांत भयंकर पूर आहे. पाण्याचं प्रमाण वाढल्याने 80 धरणांचे दरवाजे उघडण्यात आले होते. बेघर झालेल्या लोकांसाठी 1,500 हून अधिक आश्रयस्थळं उभारण्यात आली आहेत," अशी माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी ट्वीटद्वारे दिली.

दोन लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भूस्खलनामुळे मातीखाली दबून अनेकांचा मृत्यू झाल्याचं केरळ सरकारने म्हटलं आहे.

दरम्यान, केरळमधल्या पूरपरिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी दक्षिण रेल्वे पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी तामिळनाडू इथल्या इरोडे इथून मालगाडीच्या 7 डब्यांमधून 2.8 लाख लिटर पाणी सिंटेक्स टाक्यांमध्ये भरून पाठवण्यात आलं. अजून मालगाडीचे 15 डबे भरुन सिंटेक्स टाक्यांतून पाणी केरळ सरकारच्या ताब्यात दिलं जाणार आहे.

केरळमध्ये बचावकार्यानेही वेग घेतला आहे. तसंच, बाधितांसाठी तयार करण्यात आलेल्या कँपची संख्याही वाढवण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत एकूण जवळपास 82,442 नागरिकांना वाचवण्यात आलं आहे. तर, राज्य भरातील 2094 कँपमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यापासून आतापर्यंत 70,085 कुटुंबांपैकी 3,14,391 लोक आता सुरक्षित झाले आहेत. अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी दिली.

मुख्यमंत्री विजयन यांनी सगळ्यांनाच मदतीचं आवाहन केलं आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली.

वेधशाळेने आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. सरकारने संपूर्ण राज्यात रेड अलर्ट लागू केला असून, 26 ऑगस्टपर्यंत कोची विमानतळ बंद ठेवण्यात आलं आहे.

हॉस्पिटलना ऑक्सिजन पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. पेट्रोल पंपावरील इंधन अनेक ठिकाणी संपल्याने अडचणीत वाढल्या आहेत.

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असून मदतीची मागणी केली आहे.

अलंपुळा, एर्नाकुलम, त्रिसुर, पतनामिता या ठिकाणी पुराने रस्त्यांना वेढलं आहे. पुरामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर प्रचंड परिणाम झाला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)