You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोल्हापुरात हाय अॅलर्ट : पंचगंगेला पूर, धोक्याची पातळी गाठली
- Author, स्वाती पाटील राजगोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी कोल्हापूरहून
गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापुरात पंचगंगेच्या पाण्यानं धोक्याची पातळी गाठली आहे. महापालिकेकडून हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
काल संध्याकाळीच पंचगंगा नदीचं पाणी 43 फुटांवर पोहोचलं. तेव्हाच महापालिकेने धोक्याचा इशारा दिला. 2005 च्या पुराच्या आठवणी अनेकांच्या मनात जाग्या झाल्या आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचा धोका असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पथकं तैनात आहे, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.
कुंभी, कासारी ,सरस्वती, तुळशी आणि भोगावती या पाच नद्यांची मिळून पंचगंगा नदी बनते. त्यामुळं पंचगंगा नदीची पाणीपातळी इतर नद्यांचया परिसरात पाऊस पडत असला तरी वाढते. शहरात पावसाने अधून मधून थोडी उघडीप दिली असली तरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गंभीर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या पाणीपातळी 43.1 इंच आहे. राधानगरी धरण 92 टक्के भरलं आहे. जर हे धरण 100 टक्के भरलं तर पाणी नदीत सोडलं जाईल आणि नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढेल. पाणी पातळी 46 फुटांवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
छायाचित्रकार संजय शहापुरे यांनी ड्रोनच्या साहाय्याने टिपलेली पंचगंगेची दृश्य पाहण्यासाठी क्लिक करा.
राधानगरी धरण भरलं
राधानगरी धरण काल संध्याकाळीच 90 टक्के भरलं होतं. हे धरण 100 टक्के भरल्याणनंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात.
असे दरवाजे उघडणारं हे एकमेव धरण आहे. बाकी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो.
दुथडी भरून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची दृश्य पाहा.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली असली तरी धरण क्षेत्रामध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 44 फुटांवर पोहचलीय. हे पाणी शहरातल्या अनेक सखल भागात शिरलय त्यामुळं 50 हून अधिक जणांच स्थलांतर करण्यात आल आहे..कोल्हापूर शहरातल्या सुतारवाडा परिसरातल्या नागरिकांचे शहरातल्या चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)