You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईकरांनो, हे आहेत तुमच्या डोक्यावरचे 6 सर्वांत धोकादायक पूल
- Author, रोहन टिल्लू
- Role, बीबीसी मराठी
अंधेरीतल्या गोखले पुलाचा काही भाग गेल्या आठवड्यात कोसळल्यानंतर मुंबईतल्या इतर पुलांच्या स्थितीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आता मुंबईतल्या सुमारे साडेचारशे पुलांचं सेफ्टी ऑडिट होणार असल्याची घोषणाही रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि महापालिका अधिकाऱ्यांनी केली.
या दुर्घटनेनंतर बीबीसी मराठीनं मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावरील काही पादचारी आणि उड्डाणपुलांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या पुलांची स्थिती तुम्हीच बघा...
1) दादर - पादचारी पूल
दादरचा हा पूल मुंबईकरांच्या नेहमीच्या वापरातला आहे. दादर स्थानकातून पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी अक्षरश: लाखभर लोक रोज हा पूल वापरतात. कैलाश लस्सीजवळचा पूल या नावानं हा पूल प्रसिद्ध आहे.
या पुलाची स्थिती फारशी चांगली नाही. पुलाचा भाग खचला आहे. मध्यंतरी मध्य रेल्वेनं या पुलासह पूर्वेकडे पुलावर असलेल्या तिकीट खिडकीचीही डागडुजी करून घेतली होती. तरी नीट बघितलं, तर लक्षात येईल की या पुलाच्या खालच्या भागाचं प्लॅस्टर निखळलं आहे.
पुलाच्या खालचा भाग लोखंडी तुळयांना जोडला आहे. पण या भागाला आधार देणारे लोखंडी हात गंजले आहेत. या हातांवर पुलाच्या दोन्ही बाजूंना लावलेल्या जाळ्यांचाही भार आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनते.
2) करीरोडचा उड्डाणपूल
लालबाग-हिंदमाता भागातून लोअर परळच्या दिशेनं जाणारा हा पूल मुंबईतला एक महत्त्वाचा पूल आहे. या पुलाच्या बाजूलाच मोनोरेलचा मार्ग आहे. या पुलावर पादचाऱ्यांसाठी असलेल्या मार्गाखालचा भाग हा असा खचला आहे.
अंधेरीच्या अपघातात पुलाचा पादचाऱ्यांसाठीचाच भाग कोसळला होता. करी रोडच्या पुलाच्या याच भागाला तडे गेले आहेत. खाली लोखंडी तुळयांचा आधार असला, तरी दर दिवशी हजारो लोक या पुलावरून ये-जा करतात. हा ब्रिटिशकालीन पूल असल्यानं या पुलाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
3) मशीद बंदरचा पादचारी पूल
व्यापारी आणि बाजारपेठांचा भाग म्हणून मशीद बंदर प्रसिद्ध आहे. दर दिवशी या स्टेशनवर उतरणाऱ्यांची संख्या हजारांच्या घरात आहे. त्यात सणासुदीच्या दिवसांमध्ये मशीद बंदरच्या विविध बाजारपेठांमध्ये खरेदीला येणाऱ्यांची संख्याही मोठी असते.
या स्टेशनवरचा सीएसटीच्या दिशेकडला पादचारी पूल अत्यंत डळमळीत अवस्थेत आहे.
या पुलाच्या खालचा भाग हळूहळू निखळत चालल्याचं या छायाचित्रात स्पष्ट दिसतं. या पुलाखाली लोखंडी गर्डर नसल्यानं हे अधिकच धोकादायक आहे. त्यातच मुंबईत दरवर्षी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुलाची आणखीनच हानी होते.
4) चर्चगेट-मरीन लाईन्स पादचारी पूल
मेट्रो सिनेमागृहावरून सरळ मरीन लाईन्सकडे गेल्यावर हा पूल लागतो. हा पादचारी पूल दिसताना भक्कम दिसत असला, तरी नुकतीच या पुलाची डागडुजी केल्याचं दिसतं. तसंच रेल्वेमार्ग ओलांडताना या पुलावर सिमेंटच्या भरावाऐवजी पत्रा टाकला आहे.
5) मरीन लाईन्सचा पादचारी पूल
पश्चिम रेल्वेमार्गावरच्या चर्निरोड स्टेशनबाहेर पूर्वेकडे असलेला एक पादचारी पूल नुकताच धोकादायक म्हणून पाडण्यात आला. मरीन लाईन्स स्टेशनबाहेरचा हा पूलही काही कमी धोकादायक नाही. चंदनवाडी स्मशानभूमीच्या दिशेनं बाहेर पडणाऱ्या या पुलाची जबाबदारी महापालिकेकडे आहे.
या पुलाचा खालचा भाग ढासळण्याच्या परिस्थितीत आहे. एवढंच नाही, तर एकाच वेळी 30-35 माणसं चालायला लागली की, हा पूल हलतो. त्यामुळे हा पूल अधिकच धोकादायक ठरतो.
हा पूल रहदारीच्या रस्त्यावर आणि रेल्वेमार्गाला लागूनच आहे. त्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूंना जाहिराती लावायला जागा ठेवली आहे. हे लोखंडी कुंपण किंवा पॅनलही गंजलेलं आहे. त्यामुळे पूल कोसळला नाही, तरी हे कुंपण कोसळून अपघात होऊ शकतो.
6) फ्रेंच ब्रिज
ब्रिटिशकालीन पुलांपैकी आणखी एक पूल म्हणजे चर्निरोड आणि ग्रँट रोड या दोन स्टेशनांमध्ये असलेला फ्रेंच ब्रिज. काही वर्षांपूर्वी या ब्रिजच्या खाली सिमेंटचा भराव टाकून या पुलाचं मजबुतीकरण करण्यात आलं होतं. त्यामुळे रेल्वेच्या ओव्हरहेड वायरची उंची खाली घ्यावी लागली.
या पुलाच्या पुढेच असलेला केनेडी ब्रिज मात्र बऱ्यापैकी सुरक्षित असल्याचं दिसतं. फ्रेंच ब्रिजला मात्र खालून तडे गेले आहेत.
या पुलांबरोबरच घाटकोपर पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल, कुर्ला येथील पूल, ठाण्याचा कोपरी पूल, तसंच ठाणे स्थानकातील सॅटीस प्रकल्पाला जोडला गेलेला मुंबईच्या दिशेकडील पादचारी पूल, डोंबिवली येथील पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल आदी पूल धोकादायक आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)