You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अविश्वास प्रस्ताव फेटाळला : नरेंद्र मोदी सरकारवर लोकसभेचा विश्वास कायम
देशातलं राजकारण ढवळून काढणाऱ्या अविश्वास प्रस्तावाचा कौल लोकसभेत नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने लागला आहे.
तेलुगू देसम पक्षानं नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेत असंमत झाला. सरकारच्या बाजूने 325 तर विरोधकांना फक्त 126 मतं मिळाली आहेत. या मतदानाच्या वेळी लोकसभेत 451 खासदार उपस्थित होते.
या प्रस्तावावर सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने संपूर्ण कामकाजावर बहिष्कार घातला. मतदानाची वेळ आल्यास शिवसेना तटस्थ राहील, असं पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आधीच सांगितलं होतं. पण शिवसेनेचे खासदार लोकसभेत चर्चेसाठीही गेले नाहीत.
मोदींनी मानले आभार
मतदान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मित्र पक्षांचे आभार मानले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत आहोत असं खासदारांनी माध्यमांना सांगितलं.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेली मिठी दिवसभर चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जवळपास तासभर भाषण करत आपल्या सरकारचा बचाव केला नि विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार टीका केली.
त्यानंतर अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या TDPच्या उत्तरानंतर लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी आवाजी मतदान घेतलं. पण त्यानंतर मतदान यंत्राद्वारे मतविभाजन घेण्यात आलं.
त्यातून लोकसभेचा विश्वास मोदी सरकारवर कायम आहे, असं स्पष्ट बहुमत पुढे आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)