नवी दिल्ली : 11 मृत्यू, भिंतीवरचे 11 पाईप आणि 11 गूढ प्रश्न

    • Author, मोहम्मद शाहीद
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

दिल्लीतल्या बुराडीतील संतनगरमध्ये रविवारी एकाच कुटुंबातील 11 लोकांचा संशयास्पद मृत्यू झाला, या घटनेमुळे सर्व देशात हळहळ व्यक्त झाली पण त्याबरोबरच या घटनेशी संबंधित काही प्रश्न अनुत्तरित आहेत. विशेष करून घराच्या भितींवर 11 पाईप बसवल्याचे पोलिसांना आढळून आले आहेत. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत.

हा प्रकार हत्या की आत्महत्या या दोन्ही अंगांनी पोलीस तपास करत आहेत.

प्राथमिक तपासावरून पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असू शकतो असं सांगितलं आहे. पण क्राइम ब्रॅंचचे सह-पोलीस आयुक्त आलोक कुमार यांनी सांगितलं आहे की अद्याप कोणताही निष्कर्ष काढता येऊ शकत नाही.

सोमवारी मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये 11 मृतदेहांचं पोस्टमार्टम करण्यात आलं. या कुटुंबातील लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता पण त्यापैकी केवळ 6 जणांचेच डोळे घेता येणार आहेत.

या घटनेनंतर काही प्रश्न अनुत्तरित आहेत. 11 लोकांच्या मृत्यूबाबत असलेले हे 11 प्रश्न कोणते?

1. दरवाजे बंद का नव्हते?

भाटिया कुटुंबात सर्वांत वृद्ध 77 वर्षीय नारायण देवी या होत्या. त्यांचा मृतदेह दुसऱ्या खोलीत फरशीवर आढळला. त्या व्यतिरिक्त त्यांचा मोठा मुलगा भवनेश उर्फ भुप्पी (50), दुसरा मुलगा ललित (45), सविता आणि टीना या दोन जावा आणि ललित यांचा 15 वर्षीय मुलगा लटकलेल्या अवस्थेत आढळले.

ज्या वेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्यांना दरवाजा उघडा दिसला. जर या आत्महत्या होत्या तर दरवाजे आतमधून बंद का नव्हते?

2. रजिस्टरमध्ये लिहिल्याप्रमाणेच आत्महत्या झाल्या का?

या हत्या आहेत का? असा विचार करून पोलिसांनी तपास करण्याचा प्रयत्न केला. त्यांना घरातून दोन रजिस्टर मिळाले. या रजिस्टरमध्ये मोक्षाबाबत काही उल्लेख मिळाले. या रजिस्टरमध्ये आत्महत्येवेळी कसे हात पाय बांधलेले असावेत यासंबंधी उल्लेख आढळले. त्यावरून रजिस्टरमध्ये लिहिल्याप्रमाणेच आत्महत्या झाल्या का, या अंगाने देखील पोलीस तपास करत आहेत.

3. काही जणांचे हात मोकळे का होते?

काही जणांचे हात मोकळे आढळले. ज्यांचे हात मोकळे आहेत त्यांनी आधी इतरांची हत्या केली आणि मग त्यांनी आत्महत्या केली असावी का?

4. घरात कार्य झाल्यावर आत्महत्या का होतील?

जर ही सामूहिक हत्या होती तर कुणीच याला विरोध का केला नाही? कुणाही मृतदेहाच्या शरीरावर झटापटीच्या खुणा किंवा जखम आढळली नाही. 17 जून रोजी नारायण यांची नात प्रियंकाचा साखरपुडा झाला होता. इतकं मोठं कार्य घरात झाल्यावर एखादं कुटुंब सामूहिकरित्या आत्महत्या का करेल?

5. धार्मिक असल्यामुळे आत्महत्या झाल्या का?

भाटिया कुटुंब हे धार्मिक होतं. त्यांच्या किराणा दुकानाच्या बाहेर सुविचार लिहिलेले आहेत. भाटिया यांची शेजारी सीमा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की भाटिया कुटुंब सत्संग आणि देव-धर्माच्या कार्यात सहभागी होत असे.

पूजा केल्याशिवाय कुणीच झोपत नसे. त्यांचं धार्मिक असणं हेच त्यांच्या मृत्यूचं कारण बनलं का?

6. तपास भटकवण्यासाठी षड्यंत्र केलं गेलं आहे का?

घरात मोक्षासंबंधी माहिती असलेले रजिस्टर आढळले. त्या रजिस्टरमध्ये तांत्रिक क्रियासंबंधी माहिती आढळली. पण शेजाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी कधीच कोण्या मांत्रिकाला जाताना किंवा येताना पाहिलं नाही. तेव्हा हा प्रश्न उपस्थित होतो की मोक्षाचं कारण हे तपास भटकवण्यासाठी तर नाही ना.

7. ललित यांचा आवाज कसा परत आला?

एका आजारात ललित यांचा आवाज गेला होता. त्यांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर त्यांचा आवाज परत येत नव्हता. पण त्यांनी काही धार्मिक क्रिया केल्यानंतर त्यांचा आवाज परत आला. त्यानंतर ते कुटुंब धार्मिक झालं. या घटनेपासून प्रेरणा घेऊन हे कुटुंब धार्मिक झालं आणि त्यांनी हे पाऊल उचललं असावं का?

8. भिंतीवर 11 पाईप कशासाठी ?

ललित भाटिया यांच्या सांगण्यावरून कंत्राटदाराने पाईप काढले होते. या पाईपचा काहीच उपयोग नव्हता. कंत्राटदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की ते पाईप त्यांनी ललित यांच्या सांगण्यावरून लावले होते. या पाईपमुळे घरात हवा येईल असं ललितनी सांगितलं होतं.

9. पोलिसांच्या हाती काय आलं?

पोलिसांच्या तपासाची दिशा ही आत्महत्येच्या बाजूचा विचार करून असल्याचे दिसत आहे. जर हे प्रकरण हत्येचं असेल तर त्या संबंधातील पुरावे पोलिसांकडे आहेत का?

10. नातेवाइकांच्या जबाबानुसार तपास व्हावा का?

हे कुटुंब सुखी आणि संपन्न होतं. जर कुणी त्यांच्या दुकानावर वस्तू घेण्यासाठी आलं आणि त्यांच्याकडे पैसे नसतील तर ते म्हणत होते पैसे नंतर द्या. नातेवाइकांचं म्हणणं आहे की या कुटुंबातले लोक हत्या करू शकत नाहीत. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार ही हत्या असू शकते का?

11. भाटिया कुटुंबाची संपत्ती किती?

पूर्ण कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून बुराडीत राहत होतं. नारायण देवी यांची एक मुलगी पानीपतमध्ये तर एक मुलगा राजस्थानमध्ये राहत होता. भाटिया कुटुंबाची या घराव्यतिरिक्त संपत्ती किती आहे. या कुटुंबाच्या मृत्यूचं कारण संपत्ती असू शकतं का ही सुद्धा बाजू पोलिसांनी तपासून पाहणं आवश्यक आहे.

ज्यावेळी पोलीस तपास पूर्ण करतील तेव्हाच या प्रश्नांची उत्तरं मिळतील.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)