You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मंदसौर बलात्कार : पीडितेच्या तब्येतीत सुधारणा, आरोपी जाळ्यात
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी, मंदसौर, मध्य प्रदेशहून
मंदसौर येथे सात वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे फक्त शहरच नाही तर संपूर्ण देश हादरला आहे.
या मुलीवर मंदसौर येथून चार तासांवर असलेल्या इंदूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बलात्कारानंतर त्या मुलीबरोबर निर्घृणपणे अत्याचार करण्यात आले. आधी या मुलीचा जीव वाचणार नाही, असंच वाटलं होतं. पण आता डॉक्टरांना तिचा जीव वाचेल अशी आशा आहे.
या कृत्यानंतर संशयितांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया आणि डिजिटल इंटेलिजन्सची मदत घेतली जात आहे.
नेमकं झालं काय?
मंदसौर शहरातल्या एका शाळेतून सात वर्षांची एक मुलगी 26 जूनच्या दुपारी घराकडे निघाली. तिच्याकडे कोणाचं लक्षच गेलं नाही.
शाळेतला सीसीटीव्हीचा कॅमेरा बिघडला होताच. शिवाय गेटवर असलेल्या सीसीटीव्हीचा कॅमेरा खराबही होता आणि त्याची दिशाही चुकीची होती.
शाळा सुटल्यानंतर तीन तास उलटले तरीही जेव्हा ती मुलगी घरी पोहोचली नाही तेव्हा तिच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली.
40 किमी दूर असलेल्या सीतामऊ भागातल्या नातेवाईकांकडे गेली असेल अशी शंकाही मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली.
तोपर्यंत पोलिसांच्या 15 टीम्स वेगवेगळ्या दिशांना पाठवण्यात आल्या होत्या. पण हाती काही लागलं नाही.
मग कळलं की मुलीच्या कुटुंबीयांनी जमिनीचा एक व्यवहार केला होता. त्याची किंमत 1 कोटीपेक्षा जास्त होती.
आता चौकशीची चक्र खंडणी आणि अपहरणांच्या बाजूनं फिरली होती. पण इथेही फारसं काही हाती लागलं नाही.
बुधवारी दुपारी पोलिसांच्या चार्ली मोबाईल पथकाला शहरात लक्ष्मण गेटजवळ एक मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत दिसली.
दिनेश या परिसरात शेंगदाणे, फरसाण विकतात.
त्यांनी सांगितलं, " मी रस्त्याच्या पलीकडे उभा होतो. क्षणभर विचार केला की एखाद्या लहान मुलीबरोबर असं कोण करू शकतं?"
तिला प्रचंड धक्का बसला होता आणि असह्य वेदना होत होत्या. ती काहीही बोलू शकत नव्हती आणि हालचालही करू शकत नव्हती. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या आणि कपडे रक्ताने माखले होते.
मुलीला लगेच उपचारांसाठी नेण्यात आलं आणि दुसऱ्या बाजूनं तपासाची सुई बलात्कार आणि हत्येच्या प्रयत्नांकडे वळली.
सीसीटीव्हीत संशयिताचा शोध
तिची अशी अवस्था का झाली याचा मात्र शोध लागला नाही. शेवटी बुधवारी रात्री एका गुप्त 'प्रशासकीय बैठकीत' असं ठरलं शाळेच्या आसपासच्या संपूर्ण परिसरातल्या सीसीटीव्हीचं फुटेज मिळवावं.
अनेक दुकानदारांशी संपर्क साधला गेला, त्यांची मदत घेतली. शहरात आमची भेट अशा अनेक लोकांशी झाली ज्यांनी त्यांच्याकडचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जाऊन दिलं.
कुमार (नाव बदललं आहे) यांनी सांगितलं, "माझ्या दुकानात गेल्या वर्षीच सीसीटीव्ही लागले. मी लगेच फुटेज पोलिसांना दिलं."
अनेक तासांचं फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना तीन व्हीडिओ मिळाले. त्यात शाळेचा युनिफॉर्म घातलेली एक मुलगी एका युवकाच्या मागे जाताना दिसली.
हे या प्रकरणातलं पहिलं यश होतं. पण या युवकाची ओळख पटली नाही. कारण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र या युवकाने घातलेल्या बुटांचा ब्रँड स्पष्ट दिसत होता.
आणखी एक योजना तयार झाली आणि त्यात सोशल मीडियाची मदत घेतली गेली.
या तिन्ही सीसीटीव्ही क्लिप्सला मंदसौर शहरात व्हायरल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या युवकाची ओळख पटावी हा यामागचा मुख्य उद्देश होता.
यात धोका एकच होता. शहरातले लोक म्हणतात की सोशल मीडियावर या घटनेमुळे दुष्प्रचार आणि भडकावणाऱ्या मेसेजचा सुळसुळाट सुरू झाला होता.
एका मुलीबरोबर काहीतरी दुष्कृत्य झालंय आणि तिची स्थिती नाजूक आहे असं सगळीकडे पसरायला सुरुवात झाली होती.
पर्याय आणि वेळेची कमतरता
या प्रकरणावर राजकीय वक्तव्यांनाही उत आला होता आणि शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यावरचा दबाव वाढत होता. या सगळ्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी सीसीटीव्ही फुटेजवर सार्वजनिक मदत घेण्याचा विचार केला.
पोलीस प्रमुख मनोज कुमार सिंह आणि शहरातील सामाजिक नेत्यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "सीसीटीव्ही फुटेजमुळे संशयिताची ओळख पटवण्याच्या बाबतीत अनपेक्षित प्रतिसाद मिळाला."
फुटेजमध्ये दिसणाऱ्या युवकाच्या ओळखीबाबत एक डझन लोकांची नावं समोर आली.
पुन्हा एकदा सोशल मीडियाचा आधार घेतला गेला. चौकशी अधिकाऱ्यांना डिजिटल तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. ज्यांच्याबाबत सामान्य लोकांना माहिती मिळत होती त्या सगळ्या लोकांचा फेसबुक अकांऊटवरून शोध घेण्यात आला.
ज्या मुख्य आरोपीला दुसऱ्या दिवशी अटक झाली, त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याच ब्रँडचे स्पोर्टस शूज घातलेले दोन फोटो होते.
पोलीस प्रमुख मनोज सिंह यांच्यामते, "अटक केल्यावर युवकाने या कृत्यातल्या सहभागाची कबुली दिली."
ज्या दोन संशयितांना अटक झाली, त्यांच्यापैकी एका कुटुंबाने आपला मुलगा निर्दोष असल्याचं म्हटलं आहे आणि संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत आणि मुलगी शुद्धीवर आली की या दोघांची ओळख पटण्याची शक्यता आहे. या घटनेतला तो कदाचित निर्णायक टप्पा असेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)