#5मोठ्याबातम्या : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुरीच्या जगन्नाथ मंदिरात जाण्यापासून रोखलं

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या अशा :

1. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत भेदभाव

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात भेदभाव झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद 18 मार्च 2018ला पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हा मंदिरातल्या सेवेकऱ्यांच्या एका गटानं मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना रोखलं होतं.

यावेळी सविता यांना धक्काबुक्कीही करण्यात आली, असं या बातमीत म्हटलं आहे. हा मुद्दा 20 मार्चला मंदिर प्रशासनाच्या बैठकीत उपस्थित करण्यात होता.

त्यानंतर 18 मार्चला राष्ट्रपती भवन प्रशासनाकडून पुरीचे जिल्हाधिकारी अरविंद अग्रवाल यांना कडक शब्दांत पत्र लिहिण्यात आलं.

मंदिराचे मुख्य प्रशासक आयएएस अधिकारी प्रदिप्तकुमार मोहापात्रा यांनीही कोविंद आणि त्यांच्या पत्नी यांना मंदिरात चुकीची वागणूक दिल्याचं मान्य केलं आहे.

2. गौरी लंकेश हत्या : अभिनेते प्रकाश राज यांच्याही खूनाच कट

गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांनी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांच्याही हत्येचा कट रचला होता, असं गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करणार्‍या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अहवालातून समोर आलं आहे.

"प्रकाश राज काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्ववादी संघटनांवर सातत्यानं टीका करत आहेत. त्यामुळे गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा त्यांनाही संपवण्याचा कट होता," असं एसआयटीच्या अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान प्रकाश राज यांनी त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, अशी टीका केली आहे.

"अशा प्रकारच्या धमक्यांना मी काही घाबरत नाही. उलट या धमक्यांमुळे माझा आवाज आणखी प्रबळ होईल," अशी प्रतिक्रिया प्रकाश राज यांनी ट्वीटरवर दिली आहे.

3. भारताबरोबरची उच्चस्तरीय बैठक अमेरिकेकडून स्थगित

येत्या 6 जुलैपासून भारत आणि अमेरिकेदरम्यान चर्चा होणार होती. पण ही बैठक अमेरिकेकडून स्थगित करण्यात आली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ आणि संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्यात ही बैठक होणार होती.

"अपरिहार्य कारणांमुळे भारताबरोबरची उच्चस्तरीय बैठक अमेरिकेकडून स्थगित करण्यात आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करून याबद्दल खेद व्यक्त केला आहे," असं ट्वीट परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी केलं आहे.

4. प्लास्टिक बंदीच्या निर्णयात बदल

प्लास्टिक बंदीच्या निर्णयात बदल करण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. त्यानुसार किराणा दुकानदारांना पॅकेजिंगसाठी प्लास्टिकची पिशवी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

मसाला, साखर, तांदूळ, तेल यांसारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी पॅकेजिंगवरची बंदी उठवण्याची घोषणा रामदास कदम यांनी केली आहे.

पण यासाठी उत्पादकांनी आणि दुकानदारांनी प्लास्टिकची विल्हेवाट करणारी यंत्रणा उभारावी, पॅकेजिंगवर उत्पादकाचं नाव, पत्ता आणि प्लास्टिकचा दर्जा छापावा अशी अट घालण्यात आली आहे.

5. खासदारकीचा राजीनामा देईन - नारायण राणे

नाणार प्रकल्पावर नारायण राणे यांनी टीका केली आहे.

''नाणारला एक दगडही रचू देणार नाही. वेळ पडल्यास शिवसेनेप्रमाणे धमकी देणार नाही तर खासदारकीचा राजीनामा फेकून देईन,'' असा इशारा राणे यांनी दिला आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या माध्यमातून ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे.

या प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे. त्यानंतर आता राणे यांनीही आक्रमक झाले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)