रेल्वेनं पाणीपुरवठा केलेल्या लातूरमध्ये यंदा उसाचं बंपर पीक

    • Author, निरंजन छानवाल
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

2016 साली मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळात ज्या लातूर शहराला रेल्वेनं पाणी आणून पुरवण्यात आलं, त्याच लातूर जिल्ह्यात यंदा उसाचं बंपर पीक लागलं आहे.

दोन वर्षापूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत लातूरसह नजीकच्याच उस्मानाबाद जिल्ह्यात उसाचं क्षेत्र तब्बल सात पटीनं वाढलं आहे.

कळंबकडून लातूरकडे जाताना लातूर जिल्ह्याच्या सीमेवरच्या रांजणी शिवारातच आम्हाला उस्मान सय्यद भेटले.

याच भागात एक खाजगी साखर कारखाना आहे. 2016मध्ये लातूर जिल्ह्यातल्या पाणीटंचाईची धग या भागातही जाणवली होती.

त्यांच्या शेतात विहीर खोलीकरणाचं काम सुरू होतं. आम्हाला पाहून विहिरीत उतरलेले उस्मानभाई वर आले.

सुरूवातीला ते फार काही बोलण्यास तयार नव्हते. नंतर मात्र या भागातल्या पिकांविषयी त्यांनी माहिती दिली.

2016च्या दुष्काळानंतर दोन वर्षं चांगला पाऊस झाल्यानं लोकांनी ऊस घेतल्याचं ते म्हणाले. "दुष्काळात शेतकऱ्यांनी सोयाबीन लावलं. दुसरा पर्याय नव्हता. ज्यांचं काळं रान होतं त्यांनी हरभरा घेतला. आता दोन वर्षांपासून पाणी चांगलं असल्यानं तुम्हाला ऊस दिसतो," ते म्हणाले.

मांजरा नदीचं खोरं इथून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. या भागात अनेकांनी बोअर घेतल्या आहेत. पाचशे-सहाशे फूटावर काहींना पाणी लागलं. काही कोरड्याच गेल्या.

"गेल्यावर्षीपर्यंत सोयाबीन घेत होतो. यंदा ऊस लावला आहे. या भागात ऊस लागवडीचं क्षेत्र वाढलं आहे. आता कुणाला पाणी पुरतं, कुणाला नाही."

"भाव चांगला मिळाला तर ऊस परवडतो. नाही तर नाही परवडत," उसाच्या शेतीचं गणितही त्यांनी मांडलं.

औरंगाबाद-जालना रोडवर करमाड ओलांडल्यानंतर गोलटगावच्या रस्त्याला लागलं की, मोसंबीच्या आणि डाळिंबाच्या बागा लागतात. 2016आधी या भागात जिकडे नजर जाईल तिकडे मोसंबीच्या बागा दृष्टीस पडायच्या.

पण सलग चार वर्षांचा दुष्काळात तग धरून राहिल्यानं यातल्या बहुतांश बागा 2016च्या दुष्काळात शेतकऱ्यांनी तोडल्या. त्यानंतर आता या भागात डाळिंब लावले जाऊ लागले आहेत.

जिथं टँकर धावत होते, तिथं आता ऊस दिसतो

दोन वर्षांपूर्वी अंबड तालुक्यातल्या ज्या भागात रस्त्यांवर मोठ्यासंख्येनं टँकर धावतांना दिसायचे, जिथं विहिरी आणि बोअर घेण्याची जणू चढाओढच लागली होती, त्या भागातला शेतकरी आता उसासारख्या नगदी पिकाकडे वळाला आहे.

त्याला कारणही कपाशीसारखं बेभरवशाचं पीक ठरलं आहे. 2016 नंतर शेतकरी कपाशीकडे वळाले. पण त्यातून हाती काहीच उत्पन्न लागलं नाही.

याच भागात भायगाव शिवारात दीपक खाडे हे तरुण शेतकरी आम्हाला भेटले. त्यांच्याकडे सहा एकर शेती आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या एक ते दीड एकरच्या पट्ट्यात त्यांनी यंदा ऊस लावला आहे.

"काय सांगणार! गेल्यावर्षी इथं कपाशी लावली होती. एक लाख 20 हजार रुपये खर्च आला. बोंडअळीनं घात केला. दीड लाख रुपयांचा कापूस झाला. तीस हजारात कसं भागवणार?" दीपक यांनी प्रश्न केला.

"पहिल्यांदाच एक एकर ऊस लावला. चार वर्षं सलग दुष्काळ होता. मोसंबीची बाग तोडावी लागली. त्या तीन-चार वर्षांत मोसंबी लावणं, तोडणं असंच सुरू होतं.

"गेल्यावर्षी सहा एकरावर कपाशी लाऊनही हातात काहीच नाही आलं. आता उसातून तरी काही हाती लागंल," दीपक यांनी आशा व्यक्त केली.

एक विहीर आणि बोअरच्या पाण्याच्या भरवशावर सहा एकर शेतीचा डाव ते खेळतात.

बागायती आहे, पण नोकरीच करणार

अंबडहून बीडकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा उसाची शेती नजरेस पडते. शहर सोडल्यानंतर काही अंतरावर नुकताच बारावी पास झालेला अशोक राठोड हा तरुण आम्हाला भेटला.

रस्त्याच्या कडेला उसाच्या रसाचा स्टॉल लावलेला. घरी दहा एकर शेती. सगळी पाण्याखालची. यंदा दोन एकर ऊस लावला आहे. दुष्काळानंतर तीन वेळेस उसाची लागवड त्याच्या कुटुंबीयांनी केली. दुष्काळात मोसंबीची 150 झाडं जाळली.

यंदा या भागात ऊस फार लागला असल्याचं निरीक्षण अशोक नोंदवतो. शेती परवडत नाही म्हणून सरकारी नोकरीच करायची असा निश्चय केल्याचं अशोकनं आवर्जून सांगितलं.

तीन भाऊ. मोठा भाऊ पोलीस भरतीची तयारी करतोय. अशोक म्हणाला मलाही पोलिसात भरती व्हायचंय.

गेवराईजवळच मण्यारवाडी नावाच गाव आहे. संपूर्ण गेवराई शहराला या गावातून दूध पुरवठा केला जातो. इथल्या शेतकऱ्यांचा दुधाचा जोडधंदा हा आता मुख्य व्यवसाय झाला आहे.

2016च्या दुष्काळात या भागात तीन चारा छावण्या लागलेल्या होत्या. परिसरातली सगळी जनावरं या छावण्यांमध्ये होती.

यंदा चाऱ्याचा प्रश्न फारसा भेडसावत नसल्याचं मण्यारवाडीच्या शरद जगताप यांनी सांगितलं. पण यंदा 2,500 रुपये प्रती टनानुसार उसाचे कांडे विकत घ्यावं लागत असल्याचं ते म्हणाले.

यंदा ऊस लागवडीचं क्षेत्र वाढल्यानं जनावरांना उसाच्या कांड्यांचा आधार मिळाला असल्याचं चित्र या भागात पहायला मिळालं.

पिकांची वर्णव्यवस्था कुणी ठरवली?

पर्यावरणतज्ज्ञ आणि जलअभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी बीबीसीशी बोलताना पिकांमधली वर्णव्यवस्था ही शेतकऱ्यांना ऊस लागवडीकडे वळवत असल्याचं सांगितलं.

सरकार आणि राजकारण्यांनी ही वर्णव्यवस्था निर्माण केल्याचं सांगताना शेतकरी यात त्याचा फायदा बघणारच असं ते म्हणाले.

"शेवटी शेतकऱ्यांनाही वाटू शकते ना, मी ऊस लावला नाही तर जगू कसा? ऊस लावण्याशिवाय त्याला पर्याय दिसत नाही."

"उसासारखी भरवश्याची बाजारपेठ तुम्ही हरभऱ्याला देतात का? गव्हासाठी जे काही करता ते ज्वारीसाठी करतात का? पंजाबमध्ये FCIतर्फे गहू खरेदी केली जाते. महाराष्ट्रात तुरीच्या बाबतीत ते का नाही होत?" असा प्रश्नही ते उपस्थित करतात.

ऊस लागवडीचा शास्त्रीयदृष्ट्या विचार करता उसाला एका वर्षात लागणारं पाणी आणि त्यातून मिळणारं उत्पादन याचा विचार केला जावा असं त्यांना वाटतं.

"उसापासून साखर, इथेनॉल, वीज, खत, मळी ही उत्पादनं मिळतात. त्यामुळे नक्कीच ऊस हे उर्जा कार्यक्षम आढळतं."

"आपण उसाला दोष देता, पण ब्राझीलची अर्थव्यवस्था बदलण्यात इथेनॉलचा मोठा हातभार आहे, हेही आपण बघितलं पाहिजे."

"पाणीटंचाईग्रस्त भागात बोअरवेल आणि विहिरींची संख्या वाढणारच. मला बटन दबाल की पाणी हवं असतं. कारण तुमची सार्वजनिक पाणी वितरण व्यवस्थाच चुकीची असल्यानं शेतकऱ्यांना कुठून तरी पाणी घ्यावच लागणार ना! 2016च्या दुष्काळातून सरकारला नगण्य भान आलेलं आहे,"अतुल देऊळगावकर अगदी रोखठोक सांगतात.

मांजरा धरणातून यंदा सोडलं पाणी

मराठवाड्यातल्या मोठ्या धरणांमध्ये सद्यस्थितीला 17.73 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी जवळपास इतकाच पाणीसाठा शिल्लक होता.

मांजरा धरण कोरडं पडल्यानं लातूर शहरासह यावर अवलंबून असलेल्या इतर तालुक्यांच्या शहरांचा पाणीपुरवठा बंद झाला होता.

त्याच मांजरा धरणात सद्यस्थितीला 8.33 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून गेल्यावर्षी 23.98 टक्के पाणीसाठा होता. विशेष म्हणजे सलग दोन वर्षं चांगल्या पावसामुळे धरण भरलं.

या काळात धरणातून खालच्या बंधाऱ्यांमध्ये आणि कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात आलं. यंदा रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी धरणातून कॅनॉलद्वारे एकूण पाच वेळेला पाणी सोडण्यात आलं. साधारणतः 5 हजार हेक्टर क्षेत्रासाठी हे पाणी होतं.

लातूरसह मराठवाड्यात यंदा बंपर ऊस

मराठवाड्यात 2012 ते 2016 यादरम्यान दुष्काळी परिस्थिती होती. 2016मध्ये तीव्र दुष्काळ पडल्यानं मराठवाड्यात चार हजारपेक्षा जास्त टँकरनं पाणीपुरवठा करावा लागला.

लातूर शहरात चक्क रेल्वेनं पाणी आणावं लागल्यानं या दुष्काळाची चर्चा जगभरात झाली. लातूरला लागून असलेला उस्मानाबाद जिल्हाही दुष्काळाच्या कचाट्यात सापडला होता.

दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यंदा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उसाच्या क्षेत्रात तब्बल सात पटीनं वाढ झाली आहे.

2016-2017: दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यात एकूण 92,867 हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. लातूर जिल्ह्यात 9000 हेक्टर तर उस्मानाबाद जिल्ह्यात 12,000 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली होती.

2018-2019: यंदा मराठवाड्यात अंदाजे ऊस लागवडीचं क्षेत्र सहा वर्षांतलं सर्वाधिक 2,96,258 हेक्टर इतकं आहे. यावेळी लातूर जिल्ह्यात 67,637 तर उस्मानाबाद जिल्ह्यात67,613 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)