शिलाँगः शीख आणि खासी समाजातल्या तणावामुळे मेघालयात हिंसाचार

    • Author, दिलीप कुमार शर्मा
    • Role, बीबीसीसाठी गुवाहाटीहून

मेघालयाची राजधानी शिलाँगमध्ये एका किरकोळ प्रकरणातील वादविवादानंतर हिंसाचार भडकलाय. मागील तीन दिवसांपासून इथली परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.

गुरुवारी सरकारी बसमध्ये क्लिनरचं काम करणाऱ्या खासी समाजातील तरुण आणि एका पंजाबी मुलीमध्ये शाब्दिक चकमक झाली.

या किरकोळ वादविवादानंतर दोन्हीकडच्या गटांमध्ये भांडण सुरू झालं. मारहाण झाली. नंतर स्थानिक पोलिसांसमक्षच हे प्रकरण मिटवण्यातही आलं. पण या घटनेनंतर सोशल मीडियावर कुणीतरी खासी समाजातील तरुणाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली.

बससेवा देणारी संस्था आणि काही स्थानिक संघटनांशी निगडित लोक शिलाँगमधल्या पंजाबी कॉलनीत पोहोचले. तिथेच पुन्हा दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.

7 तास कर्फ्यू

या हिंसक घटनेदरम्यान संतापलेल्या जमावाकडून दगडफेक झाली. याच अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले.

परिसरात आगी लावण्यात आल्या. हिंसा आणि तणावानंतर शुक्रवारी रात्री लष्करानं या भागात फ्लॅग मार्च केलं. शनिवारी रात्री प्रशासनातर्फे 7 तासांकरिता कर्फ्यू लावण्यात आला.

राजकीय रंग

याआधी शहरातील 14 भागांमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला होता. या भागातील हिंसा आणि तणावाची स्थिती बघता प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत या घटनेत 10 लोकांना अटक केली आहे. शिलाँग शहरातील थेम इयू मावलोंग भागात पंजाबी कॉलनी असून इथं जवळपास 500 पंजाबी दलित कुटुंब राहतात.

या लोकांचं म्हणणं आहे की, आम्ही गेल्या 200 वर्षांपासून इथे राहतो आहोत. आता या प्रकरणाला राजकीय स्वरूप देऊन आम्हाला इथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रकरण चिघळलं का?

या प्रकरणाला हवा देण्यामागे राजकीय कारण असल्याचंच म्हटलं जातंय.

पंजाबी कॉलनीमधील रहिवासी सनी सिंग यांनी बीबीसीला सांगितलं की, "प्रकरण खरं तर काही नव्हतं. सरकारी बससेवेच्या क्लिनरने आमच्या समाजातील मुलीला छेडलं होतं."

"या दरम्यान उपस्थितीतांमध्ये थोडीशी हाणामारी झाली. पण पोलिसांसमक्ष हे प्रकरण नंतर मिटवण्यातही आलं."

"पण सांयकाळी अचानक बस ऑपरेटर असोसिएशनचे काही लोक स्थानिक संघटनांच्या लोकांना घेऊन आमच्या कॉलनीत घुसले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

"आम्ही याची माहिती पोलिसांना कळविली. पण दरम्यानच्या काळात लोकांनी दगडफेकीला सुरुवात केली."

घटनेच्या दिवसापासून...

पंजाबी कॉलनीमध्ये सध्या परिस्थिती काय आहे, या प्रश्नावर सनी म्हणाले, "आता परिस्थिती आणखीच बिघडली आहे. आता आम्ही रात्री झोपूही शकत नाही.

"महिला आणि मुलांना आम्ही गुरुद्वारामध्ये ठेवलं असून रात्री आम्ही तिथे पाहरा देत असतो."

पंजाबी कॉलनी अवैध असल्याचं म्हटलं जातं, याविषयी सोनू म्हणतात, "आमचे पूर्वज इथं येऊन शंभरहून अधिक वर्षं झालीत.

"ब्रिटिशांच्या काळात आमच्या आजोबा-पणजोबांना इथे क्लिनर आणि सफाई कर्मचारी म्हणून आणण्यात आलं. त्यावेळी तर मेघालय हे राज्य देखील नव्हतं. काहीही झालं तरी आम्ही आमची जागा सोडणार नाही."

इतरत्र वस्ती वसवण्याचा मुद्दा

या भागात राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत स्थानिकांमध्ये नाराजी आहे. सनी म्हणतात, "हल्ला करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने लोक आलेले असताना पाच-सात पोलीस काय करू शकतील."

पंजाबी कॉलनीतील गुरुद्वारा समितीचे महासचिव गुरजीत सिंग म्हणतात, "मागील काही वर्षांपासून आम्हाला इथून हटवण्यासाठी षडयंत्र रचली जात आहेत. इथले स्थानिक लोक आम्हाला बेकायदेशीर रहिवासी ठरवतात. पण आमचे पूर्वज शेकडो वर्षांपूर्वीच इथं आले आहेत."

"मागील काही वर्षांपासून राजकीय नेते आम्हाला इथून हटवून इतरत्र वसवण्याविषयी सतत बोलत आहेत. पण अजून तसं काही झालेले नाही", असंही गुरजीत सिंग सांगता.

तत्काळ अटक करण्याची मागणी

हिंसक घटनांनंतर नाराज असलेली प्रमुख विद्यार्थी संघटना खासी स्टुडंट्स युनियन (KSU) पंजाबी कॉलनीतील लोकांना बेकायदेशीर रहिवासी ठरवून ही वस्ती रिकामी करण्याची मागणी करत आहे.

KSUचे सरचिटणीस डोनाल्ड थबाह याने मीडियाशी बोलताना सांगितलं की, "या भागात (पंजाबी कॉलनी) अवैधपणे राहणाऱ्या लोकांना तत्काळ तिथून हटवण्यात यावं अशी आम्ही मागणी करतो."

KSUसमवेत शिलाँगमधील अनेक संघटना खासी तरुणावर हल्ला करणाऱ्या लोकांना तत्काळ अटक करण्याची मागणी करत आहेत.

याशिवाय हिंसाचाराचं कलम लावून अटक करण्यात आलेल्या खासी आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात यावी आणि जखमींना मदत जाहीर करण्यात यावी या मागणीवरही ते ठाम आहेत.

परिस्थितीत सुधारणा

शनिवारी मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी आपल्या मंत्र्यांसह कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी खासी समाजातील वरिष्ठ लोकांसह पंजाबी कॉलनीतल्या रहिवाशांशीही चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी दोन्ही गटांना शांतता राखण्याचं आणि शिलाँगचं जनजीवन पूर्वपदावर आणण्याचं आवाहन केलं आहे.

पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डेव्हिस मराक यांच्या म्हणण्यानुसार, सध्या परिस्थिती सुधारत आहे. पण हिंसा पसरवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर पोलीस नजर ठेऊन आहे.

जिल्हा प्रशासनाने परिस्थितीत सुधारणा झाल्याचं म्हटलं आहे. पण अनेक भागांमध्ये पंजाबी कॉलनीला विरोध सुरूच आहे.

दरम्यान रविवारी सकाळी शिलाँगमध्ये पोहोचलेले पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी पंजाबी कॉलनीतल्या लोकांची भेट घेत सुरक्षेचं आश्वासन दिलं.

यानंतर बादल यांनी संगमा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सद्यस्थितीवर चर्चा केली.

याआधी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)