You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सांगली : इथे सोन्याच्या वस्तऱ्यानं दाढी केली जाते
- Author, संजय रमाकांत तिवारी
- Role, बीबीसीसाठी सांगलीहून
सांगली शहरातली एक अरुंद गल्ली. याच गल्लीमध्ये एक मेन्स पार्लर आहे. वस्तरा मेन्स स्टुडिओ. शहरातील इतर मेन्स पार्लरच्या तुलनेत इथे बरीच गर्दी दिसेल.
एवढंच नव्हे, इथे हजामत करण्यासाठी चक्क वेटिंग लिस्ट असते. गेल्या महिन्यापासून हे सगळं घडायला लागल्याचं परिसरातल्या लोकांशी बोलल्यावर तुम्हाला कळतं. याचं कारण मोठं रोचक आहे.
याचे मालक रामचंद्र दत्तात्रेय काशीद यांनी आपल्या आई-वडिलांच्या 33व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सलूनमध्ये एक नवीन प्रयोग ग्राहकांसाठी सादर केला.
त्यांनी चक्क एक सोन्याचा वस्तरा बनवून घेतला. 18 कॅरेट आणि साडे दहा तोळ्यांचा हा सोन्याचा वस्तरा पुण्यातल्या एका कारागिरीने 20 दिवसांच्या मेहनतीनंतर तयार केला. यावर जवळपास साडेतीन लाख रुपये खर्च झालेत.
वेगळं काही करण्याची इच्छा
इथे सोन्याच्या वस्तऱ्यानं दाढी केली जाते, हे लोकांना हळूहळू कळायला लागलं तेव्हा ही चर्चा साऱ्या शहरामध्ये झाली. तिथूनच हे पार्लर चर्चेत आलं.
या नवीन प्रयोगाविषयी रामचंद्र काशीद सांगतात, "मला काहीतरी वेगळं करायचं होतं. असं काही तरी ज्यामुळे लोक माझं नाव घेतील. माझ्या वडिलांचं नाव घेतील."
"मग मी विचार केला आपल्या ग्राहकांसाठी असं काहीतरी हटके आपण का देऊ नये. सोन्याच्या वस्तऱ्याची कल्पना मला सुचली. मला एवढं माहितीये की महाराष्ट्रात असं कुणाकडे सध्या तरी नाही."
दाढी जर सोन्याच्या वस्तऱ्यानं केली जाणार असेल तर त्याबद्दल उत्सुकता तर वाढणारच.ग्राहकच नव्हे तर त्यांचे नातेवाईकही हा सोन्याचा वस्तरा बघण्यासाठी दुकानात येतात.
वस्तरा झाला स्टेटस सिम्बॉल
हा सोन्याचा वस्तरा आणि त्यानं केलेली दाढी ही गोष्ट आता हजामतीपुरती मर्यादित राहिलेली नाही. तो आता स्टेटस सिंबॉल बनतो आहे.
चांगली दाढी होते, यापेक्षा भारी वाटतं, हे हा अनुभव मोठा ठरतोय. एक ग्राहक गौतम कांबळे आपल्या या अनुभवाविषयीचा किस्सा सांगता..
ते म्हणतात, "सोन्यानं हजामत करतोय... चांगलं वाटतं. सांगलीमध्ये काहीतरी चांगलं घडतं आहे. राम हे आमचे नेहमीचेच सलूनवाले आहेत. तरीही दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज माझा नंबर लागला."
"राजे महाराजे सोन्या-चांदीच्या ताटांमध्ये जेवायचे अशा कथा ऐकल्या होत्या. आता सोन्याच्या वस्तऱ्यानं आमची शेविंग होतंय. भारी वाटतं."
एक दुसरे ग्राहक आनंद म्हणतात, "एखाद्या सलूनवाल्यानं आपल्या ग्राहकांसाठी कदाचित पहिल्यांदाच असा प्रयोग राबवला असावा. त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता असणं स्वाभाविक आहे."
रामचंद्र काशीद यांचे वडील स्मितहास्य करत फक्त एवढंच सांगतात, "माझ्या मुलाने याची सुरुवात माझ्यापासून केली. माझं एक स्वप्न साकार झालं."
पाचपट दर आकारणी
रामचंद्र काशीद जरी हे फक्त त्यांच्या ग्राहकांसाठी काहीतरी वेगळं केल्याच्या भावनेतून आपण हे पाऊल उचलल्याचं म्हणत असले तरी यामागे त्यांचं व्यापारी उद्दीष्ट असावं हे लक्षात येतं.
मंदीत चालणारा व्यवसाय या त्यांच्या प्रयोगामुळे वाऱ्याच्या वेगानं धाऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आलं असावं.
आता लोक इथं रोजच्या दाढीसाठी 200 रुपये मोजू लागलेत. आधीच्या 40 रुपयांच्या तुलनेत ही वाढ पाचपट आहे. एवढंच नव्हे तर लोक प्रतीक्षा यादीतही आपलं नाव नोंदवू लागले आहेत.
लोकांची ही उत्सुकता आणि गर्दी किती दिवस टिकेल हे सांगणं सध्यातरी कठीण आहे.
रामचंद्र काशीद यांनी त्यांचा सोन्याचा वस्तरा किती फायदा करून देईल, हे कळेलही, पण तोपर्यतं तरी सध्या हा अभिनव प्रयोग यशस्वी झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)