कर्नाटक : कुमारस्वामी होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, बुधवारी शपथविधी

बंगळुरूमध्ये वेगवान घडामोडी घडल्यानंतर अखेर कानडी नाट्याचा तिसरा अंक संपला आहे. आता नव्या कानडी नटकाची पहिली घंटा झाली आहे.

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी HD कुमारस्वामी यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. बुधवारी त्यांचा शपथविधी होणार आहे.

BS येडियुरप्पा यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ते फक्त अडीच दिवसांचे मुख्यमंत्री होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर BS येडियुरप्पा यांना शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करायचं होतं.

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली. नरेंद्र मोदी म्हणजेच भ्रष्टाचार, असा आरोप राहुल यांनी केला आहे.

भाजपचं सरकार पडल्यानंतर देशातल्या वेगवगेळ्या नेत्यांनी हा लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

संध्या. 7.45 - कुमारस्वामी सरकार स्थापन करणार

जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांना राज्यपाल वजुभाई वाला यांनी सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. बुधवारी दुपारीत्यांचा शपथविधी होणार आहे. कांतीरावा स्टेडियममध्ये हा शपथविधी होणार आहे. खुद्द कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली आहे.

संध्या. 6.02 - 'राज्यपालांविषयी असं बोलता?'

संजय निरुपम यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची तुलना कुत्र्याशी केल्यामुळे भाजप नाराज आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय की काँग्रेस घटनात्मक संस्थांचा आदर करत नाही आणि संजय निरुपम यांचं वक्तव्य त्याचं उदाहरण आहे.

राहुल गांधींची वक्तव्यं हास्यास्पद आहेत, असंही ते म्हणाले.

संध्या. 5.30 - वजुभाईंची कुत्र्याशी तुलना

मुंबई काँग्रेसचे प्रमुख संजय निरुपम यांनी म्हटलं आहे की कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला हे इतके प्रामाणिक आहेत की लोक आता त्यांच्या कुत्र्याचं नाव वजुभाई ठेवतील.

संध्या. 5.15 - मायावतींना हवा वजुभाईंचा राजीनामा

भाजपला देशातल्या सर्वं राज्यांच्या विधानसभेत कब्जा करायचा आहे असा आरोप मायावती यांनी केला आहे. त्यांनी कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयांचे मायावती यांनी स्वागत केलं आहे.

संध्या. 5.00 - 'राहुल गांधीचे डोकं ठिकाणावर नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधी यांनी केलेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मोदींवरील टिकेबाबत बोलताना लोक म्हणतील राहुल गांधी यांचं डोकं ठिकाणावर नाही," असं अनंत कुमार म्हणाले आहेत.

दुपारी 4.50 - 'मोदी म्हणजे भ्रष्टाचार'

नवी दिेल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकार परिषद.

  • भाजप आमदारांनी राष्ट्रगीताच्या वेळी गडबड करून राष्ट्रगीताचा अनादर केला.
  • भाजपनं उघडपणे काँग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न केला.
  • आमदारांची विक्री करण्याच्या प्रयत्न मोदींच्या सांगण्यावरून झाला. मोदी हेच भ्रष्टाचार आहेत.
  • आम्ही भाजपला हरवण्यासाठी इतर विरोधी पक्षांबरोबर काम करू.

दुपारी 4.37 - 'आमंत्रणाची वाट पाहतोय'

आम्ही राज्यपालांच्या आमंत्रणाची वाट पाहत आहेत, अशी प्रतिक्रिया जेडीएसच्या कुमारस्वामी यांनी दिली आहे.

दुपारी 4. 29 - कायद्याचा विजय झाला - सिद्धरामय्या

हा कायद्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार सुद्धा मानले आहेत.

दुपारी 4.09 - कुमारस्वामी नवे मुख्यमंत्री?

येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर आता नजरा काँग्रेस आणि जेडीएसच्या रणनीतीकडे लागल्या आहेत. कुमारस्वामी नवे मुख्यमंत्री होणार?

दुपारी 4. 04 - येडियुरप्पा यांचा राजीनामा

येडियुरप्पा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. थेट राज्यपालांना भेटून राजीनामा देणार. भाजपच्या आमदारांचा वॉकॉऊट.

दुपारी 4 - येडियुरप्पांचे भावनिक भाषण

"ही अग्निपरीक्षा आहे, याआधा सुद्धा अशा प्रकारच्या अग्नी परिक्षा दिल्या" असं त्यांनी म्हटलं आहे.

दुपारी 3.45 वाजता - येडियुरप्पा यांचे भाषण सुरू

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे भाषण सुरू झाले आहे. विश्वासमत प्रस्ताव केला सादर.

दुपारी 3. 42 वाजता - महत्त्वाचे नेते गॅलरीत

भाजप नेत्या शोभा करंदलाजे काँग्रेसच्या नेत्यांबरोबर बसल्या. काँग्रेसचे अशोक गेहलोत, मल्लिकार्जून खर्गे, गुलाम नबी आझाद उपस्थित.

दुपारी 3.30 वाजता - विधानसभेचे कामकाज सुरू

गायब आमदारांचा शपथविधी सुरू. गायब असलेले आनंद सिंग आणि डी. के. शिवकुमार विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांसोबतच बसले.

दुपारी 3. 20 वाजता - शोभा करंदलाजे यांचे सूचक वक्तव्य

भाजप आमदार शोभा करंदलाजे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. "राजकारणात प्रत्येक निर्णय हा आंनददायी आणि चांगला असतो," असं त्यांन म्हटलं आहे. येडीयुरप्पा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे वक्तव्य सूचक मानलं जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

दुपारी 2.40 वाजता - विधानसभेत पोहोचले काँग्रेस आमदार

कथितरित्या गायब असलेले काँग्रेस आमदार प्रताप गौडा पाटील विधानसभेत पोहोचले आहेत, त्यांनी तिथं दुपारचं जेवण घेतल्याचे फोटो एएनआय या वृत्त संस्थेनं ट्वीट केले आहेत. यावेळी काँग्रेसचे नेते त्यांच्या आजूबाजूला उभे असल्याचं दिसत आहे.

दुपारी 2.15 - 'ते' 2 आमदार हॉटेलमधून बाहेर पडले?

बंगळुरूमधल्या गोल्डफिंच हॉटेलमधून काँग्रेसचे दोन आमदार बाहेर पडल्याचं वृत्त येत आहे. या आमदारांना भाजपनं या हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केला असल्याची माहिती बीबीसीचे प्रतिनिधी नितिन श्रीवास्तव यांनी बंगळुरूमधून दिली होती.

दुपारी 2 वाजता - गोल्डफिंच हॉटेल बाहेरून लाईव्ह

ज्या गोल्डफिंच हॉटेलमध्ये काँग्रेसचे 2 गायब आमदार असल्याची चर्चा आहे तिथून थेट लाईव्ह माहिती देत आहेत बीबीसी प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव.

दुपारी 12.19 - ... यामुळं सोडली काँग्रेसनं दुसऱ्या सभापतीची मागणी

"जर तुम्हाला दुसरा स्पीकर हवा असेल तर सध्याच्या स्पीकरला नोटीस द्यावी लागेल, त्यामुळे बहुमताची चाचणी उद्या घ्यावी लागेल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याचा मान ठेऊन आम्ही दुसऱ्या स्पीकरची मागणी सोडली", असं काँग्रेस नेते आणि वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं.

सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायाधीशांच्या पीठाने काँग्रेसच्या याचिकेवर आज सुनावणी घेतली. सुप्रीम कोर्टाने या वेळी काँग्रेसची हंगामी सभापतींच्या नियुक्तीसंदर्भातली मागणी फेटाळून लावली.

या निकालाबद्दल बोलताना काँग्रेस नेते कपिल सिबल यांनी मात्र काँग्रेसनेच सभापती बदलण्याची मागणी सोडली असं सांगितलं.

दुपारी 12.09 - मतविभाजनाची JD(S)ची मागणी

जेडीएसचे महासचिव दानिश अली यांनी म्हटलं आहे की, "सभागृहात मतविभाजनाच्या पद्धतीने बहुमताची चाचणी घ्या अशी विनंती आम्ही करू."

सकाळी 11.52 - सुप्रीम कोर्टानं नेमकं काय सांगितलं?

  • कर्नाटक विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून के. जी. बोपय्या यांची नियुक्ती वैध
  • हंगामी सभापती म्हणून नेमताना ज्येष्ठता गृहित धरली जाते. पण त्यासाठी आमदाराचं वय नव्हे तर कार्यकाल ज्येष्ठता ठरवतो.
  • कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीचं लाईव्ह टेलिकास्ट व्हावं.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुतम नसल्याने सर्वांत जास्त आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यपालांनी सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं. येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला पण आता बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान त्यांच्यापुढे आहे. दुसरीकडे काँग्रेसनं निकालानंतर जनता दलाशी (धर्मनिरपेक्ष) हातमिळवणी करत एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आणि दोन्ही पक्ष मिळून सरकार स्थापनेचा दावा करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

बहुमतासाठी भाजप आमदारांना धमकावत आहे आणि घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप काँग्रेस आणि JD(S)नं केला आहे. भाजपनं 2 आमदार पळवल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी केला आहे.

सकाळी 11.50 - काँग्रेसचे 2 आमदार अनुपस्थित

ANIच्या ट्वीटनुसार कर्नाटक विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम झाला. सर्व आमदारांना शपथ देण्यात आली. आनंद सिंग आणि प्रताप गौडा पाटील विधानसभेत अद्याप आलेले नाहीत. शपथविधीच्या कार्यक्रमाला हे 2 आमदार अनुपस्थित आहेत.

सकाळी 11.45 - आम्हाला पारदर्शी कारभार आणि लोकशाहीचा विजय अपेक्षित - काँग्रेस

काँग्रेसच्या वतीने कपिल सिबल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी त्यांची बाजू प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केली.

सकाळी 11.40 - विधानसभेत शपथविधीला सुरुवात

तिकडे बंगळुरूमध्ये विधानसभेचं कामकाज सुरू झालं आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि इतर आमदारांनी विधान सौधमध्ये शपथ घेतली.

सकाळी 11.30 - लाईव्ह टेलिकास्टचा निर्णय महत्त्वाचा - अभिषेक मनू सिंघवी

सुप्रीम कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, "कोर्टाने पारदर्शी कारभारावर भर दिला हा महत्त्वाचा निर्णय आहे. आता बहुमत चाचणीचं लाईव्ह टेलिकास्ट होणार असल्यामुळे ही प्रक्रिया न्याय्य आणि विश्वासार्ह पद्धतीने होईल अशी आम्हाला आशा आहे. आम्हाला खात्री आहे की, या चाचणीत काँग्रेस आणि JD(S)चा विजय होईल."

सकाळी 11.20 - काँग्रेसलाच फ्लोअर टेस्टची भीती - रोहतगी

भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टाबाहेर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "काँग्रेसच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्या आहेत. सभापतींना पदावरून हटवण्याचे काँग्रेसचे सगळे प्रयत्न वाया गेले आहेत. मला वाटतं, काँग्रेसला फ्लोअर टेस्टची भीती वाटते आहे. बहुमत चाचणी होऊच नये असं त्यांना वाटतंय."

सकाळी 11.15 - हंगामी सभापती भाजपचेच - कोर्टाचं बोपय्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब

सकाळी 11.10 - कर्नाटकाच्या बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण व्हावं - कोर्ट

सकाळी 11 .00 - बोपय्या यांचा इतिहास वादग्रस्त - कपिल सिबल

हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेल्या बोपय्या यांचा इतिहास स्वच्छ नाही, असं कपिल सिब्बल यांनी सुनावणी दरम्यान कोर्टाला सांगितलं आणि आक्षेप नोंदवला.

सकाळी 10. 45 - बोपय्यांच्या नियुक्तीविरोधातल्या केसवर विरोधातली सुनावणी सुरू

हंगामी सभापती म्हणून भाजपच्या के. जी. बोपय्या यांची नियुक्ती राज्यपालांनी केली. या नियुक्तीविरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात गेली असून त्यासंदर्भातली सुनावणी सुरू आहे.

ज्येष्ठता डावलून बोपय्यांना नियुक्त केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

सकाळी 9.15 - आनंद सिंग आमच्याच बरोबर - काँग्रेस

काँग्रेस आमदार आनंद सिंग भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यावरून अनेक आरोप- प्रत्यारोप होत असताना काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री रामलिंग रेड्डी आज सकाळी ANIशी बोलताना म्हणाले की, "आनंद सिंग आमच्याबरोबरच आहेत. ते व्यक्तिशः आमच्या सोबत आत्ता नसले तरी आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना आज विधान सभेत यावंच लागेल आणि ते नक्की परत आमच्याबरोबर येतील."

सकाळी 9.05 - बोपय्या विधान सौधकडे

विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून नियुक्त झालेले के. जी. बोपय्या बंगळुरूच्या विधान सौधकडे रवाना झाले आहेत. 4 वाजता होणाऱ्या फ्लोअर टेस्टमध्ये या सभापतींची भूमिका मोठी असेल.

सकाळी 9.00 - विधान सौधबाहेर कडक बंदोबस्त

कर्नाटक विधानसभेत आज भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या बहुमताची परीक्षा होणार आहे. त्यासाठी विधान सौधच्या परिसरात सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त आहे. दुपारी 4 वाजता फ्लोअर टेस्ट होईल.

सकाळी 7.15 - हंगामी सभापतींचा निर्णय आज 10.30 वाजता

हंगामी सभापती के. जी. बोपय्या यांच्या नियुक्तीला आक्षेप घेत काँग्रेसनं काल सुप्रीम कोर्टात धाव घेतली. काँग्रेसच्या या याचिकेवर आज (शनिवारी) सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे.

सकाळी 7.00 - कोण आहेत हंगामी सभापती बोपय्या आणि काय आहेत आक्षेप?

आज दुपारी भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यासाठी प्रक्रियेचा भाग म्हणून राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपच्या के. जी. बोपय्या यांना हंगामी सभापती म्हणून नियुक्त केलं आहे. त्यांच्या निवडीवर काँग्रेसचा आक्षेप आहे. घटनेनुसार अशा वेळी सर्वांत ज्येष्ठ आमदाराची निवड हंगामी सभापती म्हणून केली जाते.

आता हंगामी सभापती झालेले बोपय्या कोण आहेत, याविषयी -

  • के. जी. बोपय्या यांचं पूर्ण नाव 'कोंबारना गणपती बोपय्या' असं आहे. ते विराजपेट विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
  • याआधी तीन वेळा ते याच मतदारसंघातून निवडून आले आहेत.
  • त्यांच्या अगोदर हंगामी सभापती म्हणून भाजपचे उमेश कट्टी आणि काँग्रेसच्या आर. व्ही. देशपांडे यांची नावं पुढे येत होती.
  • 2009 च्या निवडणुकीनंतर बोपय्या यांना हंगामी सभापती करण्यात आलं होतं. त्यावेळी भाजपनं सत्ता स्थापन केली होती.
  • सरकार स्थापन केल्यावर त्यांनाच सभापती करण्यात आलं होतं.
  • लहानपणापासून बोपय्या हे संघाच्या मुशीत वाढले आहेत. कॉलेजमध्ये असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदस्य होते.
  • बी.एससी पदवीनंतर त्यांनी वकिलीचा अभ्यास केला.
  • आणीबाणीच्यावेळी बोपय्या यांनाही तुरुंगात टाकलं होतं.

कर्नाटकसंदर्भात काल दिवसभरात काय झालं?

काँग्रेसचे आमदार हैदराबादमधून बंगळुरूकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांना हैदराबादच्या ताज कृष्णा हॉटेलात ठेवण्यात आलं होतं. ते उद्या बंगळुरूमध्ये पोहोचणार आहेत. काल रात्रीपर्यंत आणखी काय काय झालं हे या बातमीत वाचा - भाजपनं 2 आमदार पळवल्याचा JDSचा आरोप

कर्नाटकी राजकारणाविषयी हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)