कर्नाटक : काँग्रेसचे 2 आमदार गायब, रेसॉर्टची सुरक्षा काढली

भाजपचे नेते बी.एस. येडियुरप्पा यांनी अखेर बेंगळुरूमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

त्यानंतर आता कर्नाटकी नाटकाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. काँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना इगल्टन रेसॉर्टमध्ये ठेवलं आहे. या रेसॉर्टची सुरक्षा हटवण्यात आली आहे.

तसंच काँग्रेसचे 2 आमदार गायब असल्याची चर्चा आहे.

पाहा क्षणाक्षणाचे अपडेट्स

संध्याकाळी 5.30 वाजता : रेसॉर्टची सुरक्षा हटवली

इगल्टन रेसॉर्टबाहेरची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. पोलिसांनी आधी या ठिकाणी सुरक्षा दिली होती. ती आता हटवण्यात आली आहे.

संध्याकाळी 5 वाजता : काँग्रेसचे आंदोलन

कर्नाटकमध्ये उद्या राज्यभर आंदोलन करण्याचा कार्यकर्त्यांना आदेश देणारं एक पत्रक काँग्रेसनं जारी केलं आहे. कर्नाटकात उद्या ठिकठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

दुपारी 3 वाजता : काँग्रेसचे 2 आमदार गायब?

प्रताप गौडा पाटील आणि आनंद सिंग हे काँग्रेसचे आमदार गायब असल्याची चर्चा आहे. "पण ते कुठेही गेलेले नाहीत. ते परत येतील," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते रामलिंग रेड्डी यांनी दिली आहे.

दुपारी 2 वाजता : काँग्रेस आमदार रेसॉर्टमध्ये दाखल

बंगळुरूच्या इगल्टन रेसॉर्टमध्ये काँग्रेसचे आमदार दाखल.

दुपारी 1.00 : भाजप आमदार म्हणतात - 'काम हो जायेगा'

येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आता बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान भाजपपुढे आहे. राजभवनासमोर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या आंदोलन करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व 118 आमदार आमच्यासोबत आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना बी. एस. येडियुरप्पा यांनी 'उद्या किंवा परवापर्यंत थांबा, तुम्हाला दिसेल', असं सांगितलं.

भाजप बहुमत कसं सिद्ध करणार या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार बी. श्रीरामुलू म्हणाले, "काम हो जाएगा. अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत. "

दुपारी 12.30 वाजता : हा तर लोकशाहीवर हल्ला - मायावती

भाजप नेते येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण मिळालं आणि रातोरात काँग्रेसच्या अपीलावर सुनावणी होऊन येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झालेदेखील यावर प्रतिक्रिया देताना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी हा लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी प्रकार असल्याचं म्हटलं आहे.

'हा प्रकार बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या घटनेच्या विरोधात आहे. भाजप केंद्रात आल्यापासूनच सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीवर हल्ला करत आहे', अशी प्रतिक्रिया मायावती यांनी दिली आहे.

सकाळी 11.00 वाजता : 'केंद्राकडून आमदारांना धमक्या येताहेत'

केंद्र सरकारच्या अधिकारांचा गैरवापर केला जात असून ते आमदारांना धमक्या देत आहेत, असा आरोप जनता दलाचे (JD-S) एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. केंद्र सरकार सक्तवसुली संचलनालयाचा गैरवापर करून घेत आहेत, असं ते म्हणाले.

कुमारस्वामी म्हणाले, "काँग्रेस आमदार आनंद सिंग म्हणालेत की, ते ED चा वापर करून घेत आहेत. माझ्याविरोधात ED कडे एक केस आहे. ते माझी वाट लावतील, असं आणखी एक काँग्रेस आमदार सिंग यांना म्हणाल्याचं त्यांनी मला सांगितलं आहे."

सकाळी 10.30 वाजता : 'देशाच्या भल्यासाठी भाजपविरोधात एकत्र यायला हवं'

'भाजप अशा पद्धतीनं लोकशाहीची विल्हेवाट लावत आहे. याबाबत विचार करण्यासाठी सर्व स्थानिक पक्षांनी एकत्र यायला हवं आणि त्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती मी माझ्या वडिलांना (एच. डी. देवेगौडा) करणार आहे', अशी प्रतिक्रिया जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून अखेर भाजपच्या येडियुरप्पा यांनी शपथ घेतल्यानंतर आता यापुढची योजना काय याविषयी कुमारस्वामी पत्रकारांशी बोलत होते. देशाच्या भल्यासाठी एकत्र यायला हवं, असं ते म्हणाले.

सकाळी 9.30 वाजता : काँग्रेसची निदर्शनं

इगलटन रिझॉर्टहून काँग्रेस आणि JDSचे आमदार कर्नाटकची विधानसभा विधान सौदाबाहेर पोहोचले.

काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, अशोक गहलोत आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आदींनी कर्नाटक विधानसभेसमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी शपथविधीच्या विरोधात निदर्शनं केली.

दरम्यान, सिद्धरामय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, "प्रकरण अजूनही कोर्टासमोर प्रलंबित आहे. आम्ही जनतेसमोर जाऊन सांगू की कसं भाजप घटनेविरुद्ध काम करत आहे."

सकाळी 9.03 वाजता : येडियुरप्पा झाले मुख्यमंत्री

मी बुक्कनाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा शपथ घेतो की...

सकाळी 8.44 वाजता : 'भारताच्या लोकशाहीचा पराभव'

"पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपचा सत्तास्थापनासाठीचा अट्टाहास म्हणजे राज्यघटनेची थट्टाच आहे. आज एकीकडे भाजप आपला पोकळ विजय साजरा करतोय, आणि दुसरीकडे अख्खा भारत लोकशाहीच्या पराभवाचा शोक व्यक्त करतोय," असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ट्वीटमधून म्हणाले.

सकाळी 8.30 वाजता : येडियुरप्पांचं आगमन

येडियुरप्पा पोहोचले राजभवनात. प्रकाश जावडेकर, अनंत कुमार आणि जे. पी. नड्डांसारखे मोठे भाजप नेतेही उपस्थित.

गुरुवार सकाळी 8 वाजता : बेंगळुरूत शपथविधीसाठी तयारी जोरात

बेंगळुरूत कर्नाटकच्या राजभवनाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी, जल्लोष आणि उत्साह. सोबतच "वंदे मातरम्" आणि "मोदी मोदी"ची नारेबाजी.

पहाटे 4.30 : कोर्टाचा शपथविधी थांबवण्यास नकार

सुप्रीम कोर्टात हजर असलेले वकील एहतेशाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टानं काँग्रेस-JDSची याचिका फेटाळली नाही.

या प्रकरणाशी संबंधित येडियुरप्पा यांच्यासह सगळ्यांना नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगितलं आहे. तसंच, सरकार स्थापनेचा दावा करताना येडियुरप्पा यांनी सादर केलेली आमदारांची यादी कोर्टासमोर सादर करण्यास सांगितलं आहे.

जवळजवळ साडेतीन तास सुनावणी चालली.

रात्री 2.00 : सुनावणीस सुरुवात

सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू. काँग्रेसकडून अभिषेक मनू सिंघवी आणि भाजपकडून मुकुल रोहतगी बाजू मांडत आहेत. न्यायमूर्ती ए. के. सिरी, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे.

रात्री 1.13 : मध्यरात्री सुप्रीम कोर्ट उघडणार

मध्यरात्री 1.45ला तत्काळ सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी मंजुरी दिली, आणि तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण दिले. 1.45 ला सुनावणी होईल, असं सांगण्यात आलं.

अभिषेक मनू सिंघवी यांनी ही माहिती दिली आणि कोर्टाचे आभार मानले.

रात्री 11.27 : प्रकरण सुप्रीम कोर्टात

भाजपला सरकार स्थापनेचं आमंत्रण मिळताच काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव. अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात रजिस्ट्रारकडे तत्काळ सुनावणी घेण्यासाठी अर्ज केला.

रात्री 10.30 : JDS-काँग्रेसचा आक्षेप

राज्यपालांच्या या निर्णयावर काँग्रेस-JDSने आक्षेप घेतला आहे.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी गोवा आणि मणिपूरमधल्या घटना मांडत भाजपच्या या हालचालींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपालांनी त्यांच्या पदाची प्रतिष्ठा राखली नाही, असं ते म्हणाले.

याबाबत सर्वं कायदेशीर मार्गांचा विचार केला जाईल असंही काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस-JDSने युती करून पुढे केलेले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार H.D. कुमारस्वामी यांनीही आक्षेप घेतला.

भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देऊन राज्यपाल घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला.

बुधवारी रात्री 9.25 : येडियुरप्पा मुख्यमंत्री होणार

राज्यपाल वजुभाई वाला यांनी बी. एस. येडियुरप्पा यांना सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण दिलं. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी येडीयुरप्पा यांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे.

येडियुरप्पा गुरुवारी सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं भाजप कर्नाटकचे सचिव मुरलीधर राव यांनी सांगितलं.

या निकालात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याचं स्पष्ट झालं. नंतर सत्तास्थापनेसाठी काँग्रेसनं जनता दल सेक्युलर (JDS) बरोबर आघाडी करण्याचा निर्णय जाहीर केला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्याची संधी दिली.

एकीकडे काँग्रेस-JDS आणि दुसरीकडे भाजप यांच्यात सत्तेसाठी अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. दिवसभरात दोन्हीकडील नेत्यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी संख्येच्या आधारवर भाजपच्या येडियुरप्पांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)