You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपनं 2 आमदार पळवल्याचा JDSचा आरोप
(ही बातमी सकाळी 6 नंतर पुन्हा अपडेट होत राहील.)
कर्नाटकातल्या येडियुरप्पा सरकारला सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. कारण सुप्रीम कोर्टाने उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करून दाखवण्याचे आदेश दिले आहेत. आम्हाला अधिक वेळ मिळावा, ही भाजपची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे.
इथे पाहा काल रात्रीपासून आतापर्यंतचे क्षणाक्षणाचे अपडेट्स.
रात्री 10 वाजता - काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव
हंगामी सभापती के. जी. बोपय्या यांच्या नियुक्तीला आक्षेप घेत काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. काँग्रेसच्या या याचिकेवर शनिवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे.
रात्री 9.10 वाजता - जेडीएसचा आरोप
भाजपनं 2 आमदार पळवल्याचा जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांचा आरोप.
संध्याकाळी 7.30 वाजता - काँग्रेस आमदार रावाना
काँग्रेसचे आमदार हैदराबादमधून बंगळुरूकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांना हैदराबादच्या ताज कृष्णा हॉटेलात ठेवण्यात आलं होतं. ते उद्या बंगळुरूमध्ये पोहोचणार आहेत.
संध्याकाळी 7 वाजता - काँग्रेसकडून ऑडिओ क्लिप रिलीज
एक ऑडिओ क्लिप काँग्रेसकडून रिलीज करण्यात आली आहे. यात भाजपचे नेते जनार्दन रेड्डी काँग्रेसच्या रायचूरच्या आमदारांना पैशांचं आमिष दाखवत आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
संध्याकाळी 6 वाजता - भाजप आमदारांची बैठक
उद्याची रणनिती ठरवण्यासाठी रात्री 9 वाजता शांग्रीला रेसॉर्टमध्ये भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.
दुपारी 3.30 वाजता - काँग्रेसकडून आक्षेप
के. जी. बोपय्या यांच्या नियुक्तीला काँग्रेसनं घेतला आक्षेप, सर्वांत वरिष्ठ सदस्याची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्याची केली मागणी.
दुपारी 3 वाजता - बोपय्या यांची नियुक्ती
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपचे आमदार के. जी. बोपय्या यांची विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून नियुक्ती केली आहे.
दुपारी 1 - 'आम्ही एकत्र आहोत'
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बीबीसी प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांच्याशी बंगळुरूमध्ये बोलताना दावा केलाय की सर्व काँग्रेस आणि जेडीएस आमदार एकत्र आहेत आणि त्यांच्यात फूट पडल्याचा आरोप खोटा आहे. (पाहा व्हीडिओ)
दुपारी 12.55 - 'काँग्रेस-JDSमध्ये असंतोष'
काँग्रेस आणि JDSमध्ये असंतोष आहे आणि तो उद्या जगासोमर येईल, असा दावा भाजपने केला आहे. उद्या आम्हीच जिंकू, असं ट्वीटही त्यांनी केलं आहे.
दुपारी 12.30 - 'आता भाजप करेल बळाचा वापर'
राहुल गांधींनी ट्वीटमध्ये प्रतिक्रिया दिली आहे - "आजच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने राज्यपाल वजुभाई वाला यांचा निर्णय असंवैधानिक होता यावर शिक्कामोर्तब झालंय. संख्याबळ नसताना 'आम्ही सरकार स्थापन करू' या भाजपच्या वल्गनांना कोर्टाच्या आदेशामुळे खीळ बसली आहे. कायद्यानेच थांबवल्यामुळे आता बहुमतासाठी पैसा आणि बळाचा वापर करतील."
दुपारी 12.12 - येडियुरप्पा म्हणतात...
"मी बहुमत सिद्ध करेन. कोर्टाच्या आदेशाचं पालन करेन. मी मुख्य सचिवांशी चर्चा करून उद्या अधिवेशन सुरू करेन."
दुपारी 12.07 - 'एक दिवसाचे मुख्यमंत्री'
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की येडियुरप्पा एका दिवसाचे मुख्यमंत्री ठरतील.
दुपारी 12.05 - भाजपला विश्वास
कोर्टाच्या आदेशानंतर भाजपने दावा केला आहे की ते उद्या बहुमत सिद्ध करू शकतील. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केलेलं हे ट्वीट -
सकाळी 11.50 - अभिषेक मनू सिंघवी म्हणतात...
काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी सुप्रीम कोर्टाबाहेर बोलत आहेत -
- कोर्टाचा अंतरिम आदेश ऐतिहासिक आहे.
- उद्या 4 वाजेच्या आधी सर्वांना शपथ देण्यात येईल.
- भाजपने अधिक वेळ मागितला, तो कोर्टाने नाकारला.
- ज्यांना बहुमत नाही, अशा पक्षाला राज्यपालांनी बोलवावं का, या विषयावर 10 आठवड्यांनंतर कोर्ट सुनावणी सुरू करेल.
- विश्वासदर्शक ठरावाच्या आधी राज्यपालांनी नेमलेला अँग्लो-इंडियन समाजातल्या आमदारावर कोर्टाने स्थगिती आणली आहे.
सकाळी 11.40 - उद्या बहुमत सिद्ध करा
सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे की येडियुरप्पा यांनी उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं. आम्हाला जास्त वेळ मिळावा, ही भाजपची मागणी कोर्टाने फेटाळून लावला.
राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला होता. आता कोर्टाच्या आदेशामुळे हा अवधी 13 दिवसांनी कमी झाला आहे. आता सुमारे 28 तासांत त्यांना विश्वासदर्शक ठराव मांडावा लागेल.
सकाळी 11.20 - हैदराबादमध्ये आमदार
काँग्रेसचे 70 आमदार आमदार हैदराबादमधल्या हॉटेल ताज कृष्णाबाहेर पडताना. तेलंगणातले काँग्रेस नेते मधू यशोदा गौड यांनी म्हटलं आहे की काँग्रेसकडे 116 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रं आहेत आणि ती सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली आहेत.
सकाळी 11.05 - 'ज्याच्याकडे बहुमत, त्याला बोलवा'
कोर्टाने म्हटलं आहे - 'हा आकड्यांचा खेळ आहे. ज्याच्याकडे बहुमत आहे, त्याला सरकार स्थापन करायला बोलवायला पाहिजे.'
सकाळी 10.45 - 'आमदारांना धमक्या'
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद हैदराबादमध्ये म्हणाले, "बंगळुरूच्या रेसॉर्टमध्ये असलेल्या आमदारांना धमक्या देण्यात आल्या. आम्ही त्यांना विमानानं केरळला घेऊन जाण्याचा विचार करत होतो. पण आम्हाला परवानगी नाकारण्यात आली आणि शेवटी आम्हाला रस्त्याने प्रवास करावा लागला. ही लोकशाही आहे का? आता घटनेवर कुणी विश्वास ठेवत नाही. आता लोकांचा विश्वास केवळ न्यायसंस्थेवर आहे."
सकाळी 10.35 - सुनावणीला सुरुवात
सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात. काँग्रेसने याआधीच कोर्टात म्हटलं होतं की ते आमदारांच्या सह्यांची पत्रं देऊ शकतात. आज भाजपला पत्रं सादर करायची आहेत.
सकाळी 10.00 - 'घोडेबाजाराचा प्रश्नच नाही'
काँग्रेस आणि जनता दलाच्या आमदारांना त्यांच्या पक्षानं हैदराबादला नेलं आहे. संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी असं केल्याचं कुमारस्वामी यांचं म्हणणं आहे. यावर 'आमदारांचा घोडेबाजार भाजपनं करण्याचा प्रश्नच नाही', असं भाजपचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले.
तुमच्याकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ आहे का, या प्रश्नावर रोहतगी 'हो' असं म्हणाले.
आमच्याकडे आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांचं हे पत्र कोर्टाला सादर करणात आहोत, असंही रोहतगी म्हणाले.
सकाळी 9.55 - हे न्यायमूर्ती ठरवणार भवितव्य
कर्नाटकचे राज्यपाल वाजूभाई वाला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. एक याचिका काँग्रेसनं दाखल केली आहे तर दुसरी याचिका जनता दलाने दाखल केली आहे.
या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या तीन न्यायमूर्तींविषयी या गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?
न्या. ए. के. सीकरी
जस्टीस सीकरी यांचा जन्म 7 मार्च 1954ला झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. पदवीनंतर त्यांनी प्रॅक्टीस सुरू केली. 1999मध्ये ते दिल्ली हाय कोर्टचे न्यायमूर्ती झाले.
2011मध्ये ते दिल्ली हाय कोर्टाचे चीफ जस्टीस बनले. 2012मध्ये ते पंजाब आणि हरियाणा हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले. सुप्रीम कोर्टातली त्यांची कारकीर्द 12 एप्रिल 2013ला सुरू झाली.
महत्त्वपूर्ण निर्णय: दिल्लीमध्ये फटाक्यांवर बंदी लादली होती. त्याच बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपवर त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
न्या. अशोक भूषण
अशोक भूषण यांचा जन्म 5 जुलै 1956ला झाला. त्यांनी 1979मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. केरळ हाय कोर्टात चीफ जस्टीस म्हणून कामकाज पाहिलेल्या अशोक भूषण यांची सुप्रीम कोर्टातली कारकीर्द 2016मध्ये सुरू झाली. अशोक भूषण आणि जस्टीस सीकरी यांच्या खंडपीठाने मिळून लिव्ह इन रिलेशनशिपवर महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. जर दोन सज्ञान लोकांचं लग्नाचं वय पूर्ण झालं नसेल तरी देखील ते सोबत राहू शकतात असा निर्णय त्यांनी दिला.
जस्टीस अशोक भूषण यांचा कार्यकाळ 4 जुलै 2018 पर्यंत आहे.
न्या. शरद बोबडे
जस्टीस बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956मध्ये नागपूर येथे झाला. त्यांनी नागपूरमधूनच कायद्याचं शिक्षण घेतलं. मुंबई उच्च न्यायालयात अनेक वर्षं काम केल्यानंतर त्यांनी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. 16 ऑक्टोबर 2012 रोजी ते मध्य प्रदेश हाय कोर्टात चीफ जस्टीस बनले.
12 एप्रिल 2013 रोजी ते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बनले. गर्भवती महिलेला 26 महिन्यांचा गर्भ पाडण्याची परवानगी मिळणार नाही असा निर्णय त्यांनी दिला होता.
रात्री 1 - आमदारांना राज्याबाहेर हलवलं
काँग्रेसचे 2 आमदार गायब असल्याची चर्चा काल सुरू होती. त्यानंतर आता काँग्रेस आणि जनता दला (सेक्युलर)च्या सर्व आमदारांना कर्नाटकातून हलवण्यात आलं आहे. हे सगळे आमदार एकाच ठिकाणी राहणार असल्याचं दोन्ही पक्षांनी सांगितलं.
काँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना इगल्टन रेसॉर्टमध्ये ठेवलं होतं. या रेसॉर्टची सुरक्षा हटवण्यात आल्याची काल बातमी आली. आता आमदारांना हैदराबादेत हलवण्यात आलं आहे.
जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) नेते एच. डी. कुमारस्वामी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, 'घोडेबाजार होऊ नये म्हणून आम्हाला थोडी काळजी घ्यावीच लागणार आहे. म्हणूनच काँग्रेस आणि JD(S)चे सर्व आमदार एकाच बसमधून प्रवास करत आहेत. ते एकाच ठिकाणी राहतील.'
आमदारांना इगल्टन रिसॉर्टमधून हलवण्याच्या वृत्ताला काँग्रेसनंही दुजोरा दिला आहे.
रात्री 12.30 : काँग्रेसचं आंदोलन
कर्नाटकमध्ये आज राज्यभर आंदोलन करण्याचा कार्यकर्त्यांना आदेश देणारं एक पत्रक काँग्रेसनं जारी केलं आहे. कर्नाटकात आज ठिकठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.
कर्नाटकात आतापर्यंत नेमकं काय घडलं?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)