You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#5मोठ्याबातम्या - मोदी विदर्भातही समुद्र आणतील : उद्धव ठाकरेंचा टोला
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मोदी विदर्भातही समुद्र आणतील, उद्धव ठाकरे यांचा टोला
नाणार प्रकल्पावरून वाद पेटलेला असताना उद्धव ठाकरेंनी हा प्रकल्प नाणारमध्ये होऊ देणार नसल्याचा पुनरोच्चार केला.
"विदर्भ विकासाच्या केवळ गप्पा मारण्याऐवजी भाजपने हा प्रकल्प विदर्भात आणावा," असं शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हटल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.
"या प्रकल्पाला समुद्राची गरज आहे, असं वाटत असेल तर भाजपनं पंतप्रधान मोदींच्या कानावर ही बाब घालावी. ते विदर्भातही समुद्र आणतील," असा टोला त्यांनी नागपुरात झालेल्या एका पत्रकार परिषदेत लगावला.
"आजकाल रजनीकांतही मोदींना घाबरतो", अशी कोपरखळी त्यांनी मारल्याचं लोकसत्तानं म्हटलं आहे.
2. लग्न न करता सज्ञान जोडपं एकत्र राहू शकतं - सुप्रीम कोर्ट
"सज्ञान जोडप्यानं लग्न न करता एकत्र राहण्यात काही गैर नाही," असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युगुलांना दिलासा मिळाला आहे, असं वृत्त आउटलुकनं दिलं आहे.
लिव्ह-इन रिलेशनशिपला कायद्याच्या दृष्टीने मान्यता आहे, असं सूतोवाच सुप्रीम कोर्टानं केलं. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार संरक्षण देखील आहे, असं कोर्टानं यावेळी नमूद केलं.
एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं हे निरीक्षण मांडलं आहे.
3. 'मुधोळ' कुत्र्यांकडून काँग्रेसनं राष्ट्रभक्ती शिकावी - मोदी
"राष्ट्रवादाचं नाव काढलं की शिसारी येणाऱ्या काँग्रेसनं मुधोळ कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी," असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये प्रचारसभेत केलं, असल्याचं वृत्त टेलिग्राफनं दिलं आहे.
बागलकोटच्या जमखंडीमध्ये एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
"ज्या लोकांना देशभक्ती आवडत नाही, त्यांनी ती आपल्या पूर्वजांकडून शिकली नाही तरी चालेल किंवा महात्मा गांधींकडून शिकली नाही, तरी चालेल पण मुधोळच्या कुत्र्यांकडून शिकावी," असं ते म्हणाले.
'मुधोळ हाऊंड' नावाची कुत्र्यांची एक प्रजात आहे. मुधोळ हाउंड लष्करात आणि पोलीस दलात सेवेसाठी घेतले जातात. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ या गावावरून कुत्र्यांना मुधोळ हाऊंड असं नाव पडलं आहे.
4. 'कठुआ बलात्कार प्रकरणात CBI चौकशीची काय आवश्यकता?'
कठुआ बलात्कार प्रकरणाची चौकशी CBI कडून व्हावी, अशी मागणी आरोपींच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यावर या प्रकरणात CBI चौकशीची आवश्यकता नाही, असं जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.
"गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांचा धर्म वेगळा आहे म्हणून त्यांच्यावर संशय घेणं, हे घृणास्पद आहे," असं मुफ्ती यांनी म्हटल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.
"जर तुम्ही पोलिसांवर विश्वास ठेवणार नाही तर मग कुणावर ठेवणार?" असा सवाल त्यांनी केला आहे.
5. जम्मू काश्मीरमध्ये पाच हिजबुलचे पाच सदस्य ठार
भारतीय लष्कर आणि हिजबुलच्या जहालवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकूण पाच जहालवादी ठार झाले आहेत. त्यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सद्दाम पद्दार ठार झाला आहे.
हिजबुलमध्ये सामील झालेला काश्मीर विद्यापीठाचा माजी प्राध्यापक मोहम्मद रफी भट देखील या हल्ल्यात ठार झाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
"शोपियानच्या जैनापुरा भागात बुडीगाम गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. सूचना मिळाल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला घेरलं आणि शोध मोहीम सुरू करून कारवाई केली," असं सैन्याधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)