You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानचे गृहमंत्री गोळीबारात जखमी - कुणी केला हल्ला?
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी झालेल्या गोळीबारात पाकिस्तानचे गृहमंत्री अहसन इक्बाल जखमी झाले आहेत. देशाच्या ईशान्य भागातील नरोवाल शहरांत इक्बाल गेले असता, हा हल्ला झाल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.
पक्षाच्या एका सभेसाठी इक्बाल नरोवाल शहरात आले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरानं त्यांच्या खांद्यावर गोळी झाडली. या हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
त्यांचा जिवाला आता कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलं.
त्यांच्यावर हल्ला करणारा हा विशीतला एक तरुण असून त्याला अटक करण्यात आली आहे. या हल्लेखोराची सध्या चौकशी सुरू आहे.
इक्बाल हे सध्या पाकिस्तानात सत्तेत असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या पक्षाचे सदस्य आहेत. पाकिस्तानात येत्या जुलै-ऑगस्टमध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे.
अहसन इक्बाल यांच्यावर एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आलं आणि नंतर त्यांना एअर अँब्युलंसमधून लाहोरच्या सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट रुग्णालयात हलवण्यात आलं.
त्यांनी रविवारी रात्री ट्विटरवर प्रार्थनांसाठी आपल्या समर्थकांचे आभार मानले.
हल्ल्याचा निषेध
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसंच, या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी पंजाब प्रांताच्या पोलिसांना दिले आहेत.
काही ख्रिश्चन गटांसोबत बैठक आटोपून इक्बाल परत येत असताना हा हल्ला झाल्याचं एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.
इक्बाल यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागली असल्याचं पंजाब सरकारचे प्रवक्ते मलिक अहमद खान यांनी AFP या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
"हल्लेखोर दुसरी गोळी झाडणारच होता, तितक्यात पोलीस आणि सभेतल्या लोकांनी त्याला अडवलं," असं खान यांनी स्पष्ट केलं.
हल्लेखोर कोण?
संशयित हल्लेखोराचं नाव अबिद हुसेन असून तो 21 वर्षांचा असल्याचं पाकिस्तानी मीडियाने सांगितलं आहे. तो कट्टरतावादी तेहरीक-ए-लबायक या रसूल अल्लाह पक्षाशी संबंधित आहे, असं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं एका पोलीस रिपोर्टचा दाखला देत म्हटलंय.
पाकिस्तानच्या वादग्रस्त इश्वरनिंदेसाठीच्या कायद्याची धार कमी केली जात आहे, असा आरोप या धार्मिक कट्टरतावादी पक्षाने केला आहे.
पक्षाचे नेते खादिम हुसेन रिझवी यांनी एका प्रसिद्धीपत्रकात या हल्ल्याचा निषेध करत आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं, कुठल्याही शस्त्रांचा वापर न करण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)