धुळीच्या वादळानं केली धूळधाण, उत्तर भारतात 100 जणांचा मृत्यू

उत्तर भारतात आलेल्या जोरदार वादळामुळे आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे, असं पीटीआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. आधी धुळीचं वादळ आणि नंतर विजांच्या गडगडाटासह पाऊस पडल्यामुळे घरांचं आणि शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे आणि त्यात शेकडो जण जखमी झाले आहेत.

या वादळामुळे उत्तर प्रदेशात 42 जणांचा मृत्यू झाल्याचं तिथल्या राज्य सरकारने जाहीर केलं आहे. तर 34 जणांचा मृत्यू झाल्याचं राजस्थान सरकारनं म्हटलं आहे.

उत्तराखंड राज्यातल्या चमोली इथे ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या बातम्याही येत आहेत. ज्यामुळे इथली रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या आठवड्यांत केदारनाथ मंदिर दर्शनासाठी खुलं झाल्यानं भाविकांनी उत्तराखंड इथे जाण्यास सुरुवात केली होती.

मुसळधार पाऊस आणि वादळ यामुळे उत्तराखंड राज्यांत झाड आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे काही शहरांमधला वीज पुरवठा खंडीत झाला असल्याचं सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं.

उत्तर प्रदेश सरकारच्या मते केवळ आगऱ्यातच 36 लोकांचा वादळ आणि जोरदार पावसाच्या फटक्यामुळे मृत्यू झाला आहे.

तर राजस्थानात धुळीच्या वादळामुळे काही घरांमध्ये आग लागल्याचे प्रकारही घडले. राजस्थानात वादळामुळे बाधित झालेल्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याचं भरतपूर विभागाचे आयुक्त सुबीर कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

दिल्लीस्थित भारतीय हवामान विभागाचे महासंचालक के. जे. राजू यांनी बीबीसीला याबाबत अधिक माहिती दिली.

राजू सांगतात की, "वादळ आणि जोराच्या पावसामुळे पश्चिमेकडील समुद्रावरून वाहणारी हवा प्रभावित झाली. त्यामुळे राजस्थानात कोरडं हवामान असल्याने वाळूची वादळं उठली. तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वातावरणात आर्द्रता असल्याने वादळासह पाऊसही पडला."

हवामान विभागाचे राजू म्हणतात की, "या महिन्यात अशी वादळं येणं स्वाभाविक आहे. जेव्हा उष्णता वाढीस लागते तेव्हा पश्चिमेकडील महासागरावरून येणारी थंड हवा या उष्णतेचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करते. या वेळी वादळं, जोरदार पाऊस आणि विजा चमकण्याचे किंवा ढगफुटीसारखे प्रकार घडतात. भारतात असे प्रकार नियमित घडत असतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)