You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दृश्यांमध्ये पाहा : ओखी वादळामुळे असा बसला गोव्याच्या बीचेसना तडाखा
- Author, मनस्विनी प्रभुणे-नायक/ मुश्ताक खान
- Role, बीबीसी मराठीसाठी
'ओखी वादळा'चा तडाखा गोव्यासह कोकण किनारपट्टी आणि मुंबईला बसला आहे. यामुळे गोवा आणि कोकण किनारपट्टीवर पर्यटन व्यवसायाचं मोठं नुकसान झालं आहे.
गेले तीन दिवस गोव्यातल्या हवामानात सतत बदलत होत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील छोटी रेस्टॉरंट म्हणजेच शॅक्सचं नुकसान झालं आहे.
उत्तर गोव्यात मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, केरी तर दक्षिण गोव्यातल्या पाळोळे, काणकोण, कोळंब, तळपण, गालजीबाग या किनाऱ्यांवर पाण्याची पातळी वाढली होती.
केरी-पेडणे भागात काही शॅक्समधून वस्तू वाहून गेल्या आहेत.
गेल्या रविवारी पौर्णिमा होती त्यात चक्रीवादळ आल्यानं पाण्याची पातळी वाढली होती. गोव्यात सध्या पर्यटनाचा हंगाम असल्यामुळे अनेक विदेशी पर्यटक गोव्यात सुट्टीसाठी आले आहेत.
समुद्र किनाऱ्यावरील सर्व पर्यटकांची सोय जवळच्याच परशुराम टेकडीवर करण्यात आली. पर्यटकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
वादळामळे ऐन हंगामाच्या काळात गोव्यातले समुद्र किनारे ओस पडू लागले आहेत. डिसेंबर महिन्यात अनेक परदेशी पर्यटक मुद्दाम गोव्यात तळ ठोकून असतात. यानिमित्तानं संगीत रजनीचे कार्यक्रम समुद्र किनारी आयोजित केले जातात. वादळाचं वातावरण पाहता आता हे सर्व कार्यक्रम रद्द होऊ लागले आहेत.
त्सुनामी आली होती तेव्हा देखील गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर एवढं नुकसान झालं नव्हतं तेवढं आता ओखी चक्रीवादळामुळे झालं आहे, असं इथल्या काही शॅक्स मालकांनी सांगितलं.
चक्रीवादळामुळे मच्छिमारांना गेले दोन दिवस खोल समुद्रात मच्छिमारी करायला जात आलेले नाही. याचा परिणाम पणजीतल्या मासळी बाजारावर झालेला दिसून आला.
अनेक शॅक्समध्ये माशांचे पदार्थ मिळत नाही आहेत.
गोव्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनाऱ्यांना ओखी वादळाचा फटका बसला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनाऱ्यांवर छोट्या व्यापाऱ्यांच्या राहुट्या आणि दुकानं वादळात मोडून पडली आहेत. त्यामुळे ऐन डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीसच पर्यटनाला उतरती कळा लागल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
पर्यटनासह रत्नागिरी जिल्ह्यातल्या मासेमारी व्यवसायालाही फटका बसला आहे. मच्छिमारांच्या सगळ्या बोटी गेल्या दोन-तीन दिवसांपासून किनाऱ्यावर उभ्या आहेत.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)