You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्राऊंड रिपोर्ट : कठुआतल्या बलात्कारानंतर धार्मिक दरी अधिकच रुंदावली
- Author, फैसल मोहम्मद अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी, कठुआ (जम्मूहून)
कुठआतल्या या गावातलं हे घर आता रिकामं झालं आहे. चूल विझली आहे, दरवाजावरील कुलूपावर लाल दोऱ्यातला हिरवा तावीज बांधून ठेवण्यात आला आहे. कदाचित, या तावीजकडून घराचं रक्षण व्हावं यासाठीच तो दारावर बांधला असावा. मात्र, तो तिचं रक्षण करू नाही शकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ वर्षांच्या त्या मुलीला मंदिराच्या गाभाऱ्यात कैद करण्यात आलं होतं. या गाभाऱ्यातच तिच्यावर आठवडाभर सामूहिक बलात्कार करण्यात आला. इतक्या वेळा की, गळा दाबून मारून टाकण्याच्या काही मिनिटं आधीसुद्धा तिच्यावर बलात्कार झाला होता. तिचा मृत्यू झाल्यावर मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला.
१० जानेवारीला ती गायब झाल्यापासून १७ जानेवारीला तिचा गळा दाबून मृत्यू होईपर्यंत तिला वारंवार गुंगीचं औषध देण्यात आलं होतं. या दरम्यानच, आरोपींपैकी एकानं आपल्या नातेवाईकाला उत्तर प्रदेशातून 'मजा घ्यायची असेल तर ये' असं सांगून बोलावलं. ही सगळीच माहिती न्यायालयात सादर करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आली आहे.
क्राईम ब्रँचवर विश्वास नाही?
पण, ही गोष्ट इथवरच थांबली नाही. एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या या प्रकरणात हिंदू-मुस्लीम वादानं शिरकाव केला आहे. इथून जवळच्याच एका बाजारात हिंदू महिलांचा एक गट १३ दिवसांपासून उपोषणाला बसला आहे. या घटनेचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोकडे (CBI) सोपवावा अशी या महिलांची प्रमुख मागणी आहे.
पिंपळाच्या मोठ्या झाडाखाली उपोषणाला बसलेल्या या महिलांजवळच बसलेले एक माजी सरपंच सांगतात की, "क्राईम ब्रांचच्या तपासावर आमचा विश्वास नाही." नवेद पीरजादा आणि इफ्तिखार वानी यांना तपास पथकात सहभागी करून घेतल्यामुळे ही मागणी केल्याचं ते सांगतात.
नवेद पीरजादा जम्मू-काश्मीर क्राईम ब्रँचमध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर आहेत. पण, हा सगळा तपास वरिष्ठ पोलीस अधीक्षक रमेश जल्ला यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
जेव्हा मी उपोषणाला बसलेल्या महिलांना सांगितलं की, तपास पथकाचे प्रमुख तर काश्मीरी पंडित आहेत. तेव्हा त्या महिलांपैकी एक असलेल्या मधू यांनी रागात उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, "त्यांना (रमेश जल्ला) काही माहीत नसतं. सगळे निर्णय घेऊन झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत गोष्ट पोहोचते."
आरोपीला वाचवण्यासाठी तिरंग्याचा वापर
जम्मू-काश्मीरचे पोलीस प्रमुख एसपी वैद्य याबाबत सांगतात, "जर इथले पोलीस दहशतवाद्यांसोबत लढू शकतात तर ते या प्रकरणाचा छडा लावू शकत नाहीत का?"
याबाबत एका काश्मिरी तरुणानं आम्हाला सांगितलं की, "जेव्हा हेच पोलीस कट्टरतावाद्यांशी लढतात तेव्हा ते सगळ्यांना ठीक वाटतं. पण, जम्मूच्या एका भागात झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात मात्र पोलिसांवर हे लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत."
पण, मुख्य आरोपी सांजी रामचे काका बिशनदास शर्मा यांचं मत मात्र वेगळंच आहे. शर्मा सांगतात की, "त्यांच्या पुतण्याला आणि इतरांना बकरवालांचे नेते तालिब हुसेन यांच्या सांगण्यावरून फसवण्यात आलं आहे."
तालिब हुसेनशी वैर का आहे? असा प्रश्न विचारताच त्यामागचं मूळ कारण सांगू शकत नाही, असं ते म्हणाले. कारण, 'तेव्हा लष्कराच्या नोकरीसाठी ते बाहेर होते'.
या प्रकरणानंतर या हिंदूबहुल क्षेत्रात हिंदू एकता मंच नावाची जुनी संगटना पुन्हा सक्रिय झाली आहे. या संस्थेच्या बॅनरखाली लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली असून यातल्या अनेकांच्या हातात तेव्हा तिरंगाही होता. त्यामुळे बलात्कारातील आरोपीला वाचवण्यासाठी भारताच्या झेंड्याचा वापर झाल्याच्या मुद्द्यावरून माध्यमांमधील काही जणांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत.
कठुआ आणि दादरी इथे झालेल्या अखलाक बीफ प्रकरणाला आता एकसारखाच रंग सोशल मीडियावर दिला जात आहे. कारण, अखलाकच्या हत्येतील आरोपीच्या मृत्यूनंतर त्याला मोदी सरकारच्या एका मंत्र्यासमोर तिरंग्यात लपेटलं होतं.
हा वाद जमिनीशी जोडला आहे का?
पोलिसांनी तयार केलेल्या चार्जशीटनुसार, मुख्य आरोपी सांजी राम हा बकरवाल समुदाय या भागात स्थायिक होण्याच्या विरोधात होता. तसंच, पीडितेच्या परिवाराला जमीन विकण्याच्या मुद्द्यावरूनही एक प्रकरण हायकोर्टात दाखल आहे.
या रसाना गावात सध्या तीन बकरवाल परिवार येऊन स्थायिक झाले आहेत. जवळच्या इतर गावात आणि जिल्ह्यांमध्ये बकरवाल आणि गुज्जर समुदायाचे लोक आता स्थायिक होऊ लागले आहेत. गाई-गुरांना चारून चरितार्थ चालवणारे हे लोक मुस्लीम आहेत. तर, असाच व्यवसाय करून चरितार्थ चालवणारा एक गुराखी समाज हिंदू धर्माशी निगडीत असून तो 'गद्दी' समुदाय म्हणून ओळखला जातो.
बिशनदास शर्मा सांगतात, "आम्ही बकरवाल आणि गुज्जर समुदायाच्या लोकांना चरण्यासाठी जमीन देत नाही. फक्त गद्दी समुदायाच्या लोकांनाच जमीन देतो."
पीडितेचं गाव आणि कठुआमध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की, ज्या दिवशी पीडितेच्या मृत्यूचा चौथा दिवस होता तेव्हा गावात शेकडो मुस्लीम आले. ते पाकिस्तान जिंदाबाद आणि भारत मुर्दाबादच्या घोषणा देत होते.
'जिथे शत्रूच नाहीत तिथे निर्माण केले जात आहेत'
या प्रकरणाचं वर्णन करताना डाव्या विचारसरणीचे एक गृहस्थ सांगतात, "जिथे कोणी शत्रूच नाहीत तिथे हे असे शत्रू निर्माण केले जात आहेत."
तर, जम्मूमध्ये कायद्याचा अभ्यास करणारे कठुआमधले रहिवासी धीरज बिस्मिल सांगतात, "जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पूर्वीपासून असलेली दरी या प्रकरणानंतर अजून खोल झाली आहे. ही राजकीय दरी आता सामाजिक मुद्द्यांमध्येही दिसू लागली आहे."
2008मध्ये अमरनाथमध्ये झालेल्या संघर्षानंतर हिंदू-मुस्लीम दरी वाढण्यास सुरुवात झाली, असंही धीरज सांगतात. ही दरी पुढील काळात वाढणारच असून याबरोबरच लक्षणीय बाब म्हणजे इथल्या भाजपच्या जागाही वाढीस लागल्या आहेत. जे आता जम्मू-काश्मीरच्या सत्तेत सहभागी आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)