श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का झाले?

फोटो स्रोत, Twitter
- Author, भरत शर्मा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणाला मिळतो हा सन्मान?
श्रीदेवी यांचा जुदाई चित्रपट 28 फेब्रुवारी 1997 रोजी प्रदर्शित झाला होता. योगायोग म्हणजे 21 वर्षांनंतर 28 फेब्रुवारी 2018 रोजी जगाच्या रंगभूमीला त्यांनी अलविदा केला.
24 फेब्रुवारीला शनिवारी दुबईत श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर श्रीदेवी यांचं पार्थिव मंगळवारी भारतात आणण्यात आलं.
मंगळवारी रात्री अंधेरीच्या लोखंडवालामधल्या ग्रीन एकर्स बिल्डिंगमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव आणण्यात आलं. बुधवारी सकाळी त्यांचा अंतिम प्रवास सुरू झाला.
श्रीदेवी यांचं घर ते स्मशानभूमी हे अंतर पाच किलोमीटरचं आहे. या संपूर्ण परिसरात पोलीस आणि एसआरपीएफच्या जवानांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
तिरंग्यात लपेटून सन्मान

फोटो स्रोत, Expandable
श्रीदेवी यांच्या अंत्यप्रक्रियेदरम्यान एका गोष्टीने साऱ्यांचं लक्ष वेधलं. श्रीदेवी यांचं पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आलं होतं. कारण त्यांना शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात आला.
राजकीय सन्मानाचा अर्थ म्हणजे अंत्यसंस्कारांची प्रक्रिया राज्य सरकारद्वारा राबवली जाते. निधन झालेल्या व्यक्तीचं पार्थिव तिरंग्यात लपेटलं जातं आणि बंदुकीची सलामीही दिली जाते.
साधारणत: मोठ्या राजकीय नेत्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये पंतप्रधान, मंत्री तसंच घटनात्मकदृष्ट्या अतिविशिष्ट पदावरील व्यक्तींचा समावेश असतो. यासंदर्भातला निर्णय केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे घेतला जातो.
शासकीय इतमामातचा निर्णय कोण घेतं?

फोटो स्रोत, Expandable
अगदी सुरुवातीला ठराविक लोकांनाच शासकीय इतमामात निरोप दिला जात असे, मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
स्टेट फ्युनरल किंवा राजकीय सन्मान अर्थात शासकीय इतमामाबाबतचा निर्णय संबंधित व्यक्तीचं समाजाप्रती योगदान तसंच कर्तृत्व हे लक्षात घेऊन घेतला जातो.
माजी कायदे तज्ज्ञ आणि संसदीय व्यवहार मंत्री एम. सी. ननाइयाह यांनी रेडीफ संकेतस्थळाला याबाबत माहिती दिली. ते म्हणतात, "शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचा निर्णय सरकारच्या विवेकबुद्धीवर घेतला जातो."
व्यक्तीचं सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते. यासंदर्भात कठोर असा काही नियम नाही. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, सिनेमा क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यात येतो.
मुख्यमंत्र्यांचा निर्णय?
साधारणत: संबिधित राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेतात. निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याविषयीची माहिती दिली जाते. यामध्ये पोलीस कमिशनर, डेप्युटी पोलीस कमिशनर, पोलीस निरीक्षक यांचा समावेश असतो. या सगळ्या अधिकाऱ्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची जबाबदारी असते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेले महात्मा गांधी पहिले व्यक्ती होते.
यांच्याव्यतिरिक्त भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांना राजकीय सन्मानानं निरोप देण्यात आला होता.
अन्य कोणाला मिळाला सन्मान?
या राजकीय नेत्यांव्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांनाही शाही इतमामात अंतित निरोप देण्यात आला होता. त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. मात्र सामाजिक क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला होता.

फोटो स्रोत, Twitter
हजारो अनुयायी असलेल्या सत्यसाईबाबांना हा मान मिळाला होता. 2011 मध्ये सत्यसाईबाबांचं निधन झालं होतं.
गृह मंत्रालयात अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या एस. सी. श्रीवास्तव यांनी याबाबत बीबीसीला आणखी माहिती दिली. राज्य सरकार आपल्यावतीनं याबाबतचा निर्णय घेतं. कोणाला हा सन्मान द्यायचा हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार राज्य प्रशासनाला आहे.
हा सन्मान मिळणाऱ्या श्रीदेवी या चित्रपट क्षेत्रातील पहिल्याच आहेत का? असं विचारलं असता ते म्हणाले, "मला असं वाटत नाही. याआधी शशी कपूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले होते."
शशी कपूर यांनाही सन्मान
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं होतं. त्यांना हा सन्मान मिळाला होता. मात्र त्याआधी निधन झालेल्या राजेश खन्ना, विनोद खन्ना आणि शम्मी कपूर यांना हा सन्मान देण्यात आला नव्हता.
राज्य सरकारनं राजकीय सन्मान देण्याचा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात पाहायला मिळतात. केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्यास देशभरात प्रक्रिया राबवली जाते. अनेकवेळा राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.

फोटो स्रोत, AFP
केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर काय प्रक्रिया राबवली जाते?
- ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो. राष्ट्रध्वज किती दिवस या स्थितीत राहील याचा निर्णय फक्त राष्ट्रपती घेतात.
- सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येतं.
- पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात येतं.
- अंत्यसंस्कारावेळी बंदुकांची सलामी देण्यात येते.
पंतप्रधानपदी असताना निधन झालेल्या व्यक्तींना हा सन्मान देण्यात येतो. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांचा यात समावेश आहे.
हा सन्मान मिळणाऱ्या इतर व्यक्ती
राजीव गांधी
मोरारजी देसाई
चंद्रशेखर सिंह
ज्योती बसू
ई. के. मालॉन्ग
महात्मा गांधी
मदर तेरेसा
गंगुबाई हनगल
भीमसेन जोशी
बाळ ठाकरे
सरबजीत सिंह
मार्शल अर्जुन सिंह
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








