प्रेस रिव्ह्यू: संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे, समर्थकांची मागणी

फोटो स्रोत, Raju Sanadi
भीमा कोरेगाव हिंसाचाराची आपला काहीही संबंध नाही असं शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी सांगलीमध्ये केली, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.
भिडे यांच्या समर्थनात सांगतील आज रॅली काढण्यात आली. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेशी भिडे गुरुजींचा काहीही संबंध नाही. भिडे गुरुजींवर दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा.
खोटे आरोप करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची चौकशी करावी. तसंच महाराष्ट्र बंदमध्ये तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशा मागण्या या रॅलीतून करण्यात आल्या.
'500 रुपयांमध्ये देशभरातील आधारधारकांची माहिती'
500 रुपयांमध्ये देशभरातील सर्व आधारधारकांची माहिती मिळवता येऊ शकते, असं वृत्त द ट्रिब्युननं दिलं आहे. यासंदर्भातला त्यांचा इनव्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पैशांच्या मोबदल्यात देशभरातील 1 अब्ज लोकांची माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती ट्रिब्युनच्या हाती लागली. यातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी ट्रिब्युननं त्या एजंटशी संपर्क साधला.
तेव्हा 500 रुपयांमध्ये एक पासवर्ड आणि लॉगिन आयडी मिळाला. त्या द्वारे तुम्ही सर्व आधारधारकांची माहिती मिळवू शकता असं ट्रिब्युननं म्हटलं आहे.

दरम्यान, आधारकार्डाचे व्यवस्थापन करणारी संस्था UIDAIनं हा दावा फेटाळून लावला आहे. "लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर फक्त नाव आणि इतर माहिती मिळू शकते पण आधारधारकांची बायोमेट्रिक माहिती मिळत नाही," असं UIDAI नं म्हटलं आहे.
वसंत डावखरे यांचं निधन

फोटो स्रोत, facebook/supriya sule
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं 4 जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. मुंबईतील 'बॉम्बे हॉस्पिटल'मध्ये त्यांचं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते.
1986 साली त्यांनी ठाणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे 1987 साली ते ठाण्याचे महापौरही झाले. नंतर ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले होते.
"डावखरे साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्वाच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाची व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे," असं राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं निधन
ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं गुरुवारी (4 जानेवारी) निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.
'संगीतकार आर. डी. बर्मन यांच्यासोबत काम केलेल्या उल्हास बापट यांना 'पंचमदां'चा (आर. डी. बर्मन) उजवा हात म्हणूनही संबोधलं जायचं. बापट यांनी अनेक चित्रपटासाठी संतूरवादन केलं होतं.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








