प्रेस रिव्ह्यू: तिहेरी तलाक: राज्यसभेत काँग्रेसनं वाट रोखली

तात्काळ तिहेरी तलाकवर बंदी घालणाऱ्या विधेयकाला लोकसभेत काँग्रेसनं सहमती दिली, पण राज्यसभेत मात्र काँग्रेसनं या विधेयकाला खोडा घातल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. त्यातच अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्यामुळे या विधेयकाचं भविष्य टांगणीला लागलं आहे. काँग्रेसच्या या खेळीमुळे भाजपची अडचण झाली, मात्र त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपनं केली आहे.

काँग्रेसच्या या विरोधाबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले, "काँग्रेसनं लोकसभेत दिलेला पाठिंबा म्हणजे केवळ ढोंग होते, खोटारडेपणा होता. मुस्लीम महिलांवरील शतकानुशतकांचा अंधार दूर करण्याची संधी काँग्रेसच्या विरोधामुळे प्रत्यक्षात आली नाही."

यावर बोलताना काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद यांनी सांगितलं की, "पतीला तुरुंगात टाकल्यानंतर महिलेला केंद्र सरकारनं निर्वाह भत्ता देण्याची आमची मागणी आहे, पण मोदी सरकार त्याला तयार नाही."

गोव्यात मिग विमानानं घेतला पेट

भारतीय नौदलाच्या 'विक्रमादित्य' या युध्दनौकेवर कार्यरत असलेल्या एका 'मिग 29 के' या लढाऊ विमानाला बुधवारी गोवा विमानतळावर अपघात होऊन ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं वृत्त 'सकाळ' नं दिलं आहे.

या अपघातात विमानाला आग लागली, मात्र वैमानिक बचावला आहे.

संरक्षण खात्यानं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

लढाऊ विमानाला अपघात झाल्यानं दाबोळी विमानतळावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती.

इस्राईलबरोबरचा करार रद्द

संरक्षण मंत्रालयानं इस्राईलच्या राफेल कंपनीकडून 'अँटी टँक मिसाईल'चा खरेदी करार रद्द केल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'नं दिलं आहे.

राफेल या कंपनीनं यासंबंधी माहिती दिली आहे. हा करार 3520 कोटींचा होता.

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या भारत दौऱ्याआधी हा करार रद्द करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'आप'कडून राज्यसभेचे उमेदवार ठरले

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार 'आप'चे ज्येष्ठ नेते संजय सिंह, सनदी लेखापाल एन डी गुप्ता आणि काँग्रेसचे माजी नेते आणि उद्योगपती संजय गुप्ता यांना आम आदमी पार्टीतर्फे राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाली आहे.

'आप'चे नेते कुमार विश्वास राज्यसभेसाठी इच्छूक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. अरविंद केजरीवाल यांच्या निर्णयाविरोधात 'सत्य' बोलल्यामुळे ही शिक्षा मिळाल्याचं वक्तव्य विश्वास यांनी केलं आहे.

चीनचा अरुणाचलमध्ये रस्तेबांधणीचा प्रयत्न

डोकलाम वाद संपुष्टात आल्यानंतर भारताच्या हद्दीत चीन सैनिक घुसवण्याचा प्रयत्न करणार नाही ही अपेक्षा फोल ठरली आहे.

चिनी सैनिकांनी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस रस्ते उभारण्याच्या सामग्रीसह सियांग जिल्ह्यातील गावापर्यंत मजल मारल्याचं वृत्त 'लोकमत'नं दिलं आहे.

चीनी सैनिकांनी माघार घेतली असली तरी अरुणाचलचं अस्तित्व मान्य करण्याला चीननं नकार दिला आहे.

अरुणाचल हा भारताचा भाग आहे हे चीन मान्य करण्यास तयार नाही, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)