प्रेस रिव्ह्यू - गुजरातमध्ये भाजपचा हरणार : संजय काकडेंचा भाजपला घरचा आहेर

संजय काकडे

फोटो स्रोत, FACEBOOK/SANJAY KAKADE

फोटो कॅप्शन, संजय काकडे

सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. गुजरातमध्ये सर्वच एक्झिट पोल्सनी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार असल्याचं दर्शविलं आहे.

पण भाजप जिंकण्याच्या या शक्यतेला पुण्यात भाजपचे सहयोगी खासदार असलेले संजय काकडे यांनीच घरचा आहेर दिला आहे.

'लोकसत्ता'ने दिलेल्या वृत्तानुसार, "प्रस्थापितांच्या विरोधातील वातावरणामुळे भाजप गुजरात निवडणूक हरेल. तसंच अन्य पक्षांशी हातमिळवणी करूनही भाजपला तिथं सत्ता मिळवता येणार नाही, असा दावा काकडे यांनी केला आहे."

मुस्लीम समाजातील मतदारांची भाजपवर असलेली नाराजी, पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचं गुजरातकडे झालेलं दुर्लक्ष आणि हार्दिक पटेलची सेक्स सीडी चुकीच्या वेळी पुढे आणण्याचा प्रकार, यामुळे भाजप पराभूत होईल, असा दावा काकडे यांनी केला आहे.

2. डॉ. कोटणीस आंध्र-तेलंगणाच्या अभ्यासक्रमात

मूळ सोलापूरचे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये जाऊन युद्धात लढणाऱ्या सैनिकांची सेवासुश्रुशा केली होती. त्यांच्यामुळे कईक प्राण तेव्हा वाचले होते.

त्यांच्या या कार्यावर एक सिनेमा 'डॉ. कोटणीस की अमर कहानी' ही आला होता.

आणि आता या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानवतावादी डॉक्टरची माहिती आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या शालेय अभ्यासक्रमातून दिली जाणार आहे.

डॉ. कोटणीस

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, चीनच्या सैनिकांवर उपचार केल्यामुळे डॉ. कोटणीस आदरणीय आहेत.

'सकाळ'ने दिलेल्या बातमीनुसार, आठवीच्या वर्गासाठी असलेल्या 'कृतज्ञता' या पुस्तकाचा पहिलाच धडा डॉ. कोटणीसांवर आहे. त्यात त्यांच्या कार्याची माहिती, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या पोस्टरचाही समावेश आहे.

पण मूळचे सोलापूरचे आणि नंतर मुंबईतून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ. कोटणीसांचं कार्य महाराष्ट्रातच उपेक्षित राहिल्याचा उल्लेख या बातमीत आहे.

दरम्यान, चीनच्या सैनिकांवर उपचार केल्यामुळे त्यांना तिथे मानाचं स्थान आहे.

3. कल्याणमध्ये तरुणाची गोळ्या घालून हत्या

कल्याणमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

'एबीपी माझा' वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रियाज शेख राहत असलेल्या नेतिवलीच्या श्रीकृष्णनगर भागात एक हुक्का पार्लर सुरू होतं. या पार्लरच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गाड्यांची पार्किंग होत असल्याने रियाजने याला आक्षेप घेतला होता. यावरून रियाज आणि तिथल्या वाहनचालकांमध्ये वाद झाला होता.

नंतर या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. काही जणांनी रियाजला हाणामारी करून गोळ्या घालून त्याची हत्या केली.

या प्रकरणाची पोलिसांनी योग्य दखल न घेतल्याचा आरोप रियाजच्या कुटुंबीयांनी केला आहे.

4. झाकीर नाईकविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस नाहीच

वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकीर नाईक याला भारतात आणण्याच्या प्रयत्नांना तूर्तास खीळ बसली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) विनंतीसोबत आरोपपत्र सादर न केल्याने इंटरपोलने झाकीरला रेड कॉर्नर नोटीस बजावण्यास नकार दिला आहे, असं 'महाराष्ट्र टाइम्स'नं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

झाकीर नाईक

फोटो स्रोत, FACEBOOK/ ZAKIR NAIK

भारताने पाठवलेली किंवा त्यांच्याकडे असलेली झाकीरविषयीची माहिती त्यांच्या रेकॉर्डवरून हटवण्याची सूचनाही इंटरपोलने अन्य देशांच्या पोलीस यंत्रणांना केली आहे.

दरम्यान, आरोपपत्रासह नव्याने विनंती करणार असल्याचे NIAने म्हटल्याचा बातमीत उल्लेख आहे.

5. गुजरातमधील सहा मतदान केंद्रावर फेरमतदान

गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानात काही ठिकाणी त्रुटी आढळल्यावर निवडणूक आयोगाने तांत्रिक कारणं देत सहा मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत.

राहुल और मोदी

फोटो स्रोत, AFP/Getty Images

'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या बातमीनुसार, गुजरातमधील काही मतदान केंद्रांवर मॉक ड्रील म्हणजे मतदानापूर्वी केलेल्या अभ्यासाचा डेटा हवटण्याचं अधिकारी विसरले होते. त्यामुळे त्या मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे.

यामध्ये अहमदाबाद, बडोदा आणि बनासकाठा जिल्ह्यातील मतदान केंद्रांचा समावेश आहे.

तुम्ही हे वाचलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)