पाहा व्हीडिओ : ब्रम्हपुत्रेला पाणी किती? चीनच्या लपवेगिरीने आसामला पुराचा धोका वाढतोय!
- Author, नवीन सिंग खडका
- Role, बीबीसी पर्यावरण प्रतिनिधी, आसाम
ब्रम्हपुत्रा नदी, जी इशान्य भारतासाठी जीवनाचं स्रोत आहे, कधीही रौद्र रूप धारण करू शकते. तसं तर सरकार अशा नदीत येणाऱ्या संभाव्य पुराचा धोक्यावर लक्ष ठेवून असते. पण या नदीची चीनमधल्या पात्रात पातळी किती, हे चीन भारताला सांगत नसल्याने हा धोका वाढला आहे. त्यामुळे आसाममधल्या स्थानिक लोकांनी आणि अधिकाऱ्यांनी आपली भीती बीबीसीकडे व्यक्त केली आहे.
द्विपक्षीय करारानुसार बीजिंगकडून पुराची वेळोवेळी माहिती मिळत होती. तरीही वेळोवेळी आलेल्या पुरानं आसाममध्ये थैमान घातलं. आता तर चीनकडून मिळणारी माहिती बंद झाल्याने पुराची भीती कित्येक पटींनी वाढली आहे.
आशियातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीचा उगम चीन नियंत्रित तिबेटमध्ये होतो. ही नदी भारतातून वाहत पुढे बांगलादेशमधून बंगालच्या उपसागराला मिळते.
जलऊर्जा केंद्रांच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं माहिती देता येत नसल्याचं चीननं सप्टेंबरमध्येच कळवलं आहे.
चीनचा प्रतिसाद नाही
सध्याची स्थिती काय आहे याविषयी माहिती बीबीसीनं मागितली. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
डोकलामच्या प्रश्नावरून दोन महिने चीन आणि भारत यांच्यात वाद शिगेला पोहोचला असतानाच चीननं ब्रह्मपुत्रेविषयी ही भूमिका घेतली.
ब्रह्मपुत्रेला येणाऱ्या पुरामुळे दर पावसाळ्यात आसाममध्ये हजारो लोक विस्थापित होतात. यावर्षी पुरानं राज्यात सुमारे 500 लोकांचा बळी घेतला.
घर राहील का?
"या नदीमुळे मी आतापर्यंत पाच वेळा विस्थापित झालो आहे," आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील भव्य नदीपात्र दाखवत बिमती हजारिका यांनी बीबीसीला सांगितलं.

"दरवेळी आम्हाला नवीन जागेत हलवतात. पुढे ती जागाही पाण्याखाली जाते. यापूर्वीची चारही गावं आजही पाण्याखाली आहेत. आता तर सध्या राहात असलेल्या गावालाही धोका आहे," असं 60 वर्षीय बिमती सांगतात.
बिमती तात्पुरत्या झोपडीत राहात आहेत. बांबूच्या आधारे उभारण्यात आलेल्या या झोपडीत त्यांच्या पाठोपाठ आम्ही गेलो.
"नदीच्या पुरानं माझं जगणं मुश्किल केलं आहे. आता पूर आला तर कुठे जावं लागेल ते माहिती नाही. पण लवकरच बाडबिस्तरा हलवावा लागेल हे नक्की," असं बिमती म्हणाल्या.
पुढे काय?
आसामच्या वायव्येला असणाऱ्या अनेक गावांची हीच स्थिती आहे.
गावातली मोठी माणसं वारंवार येणाऱ्या पुरामुळे बदलाव्या लागलेल्या गावांच्या खुणा दाखवतात. तर, तरुणांना मात्र वर्तमानाबरोबर भविष्याचीही चिंता सतावते आहे.

"चीनच्या निर्णयाची माहिती आम्हाला बातम्या वाचून समजली. तेव्हापासून आम्ही चिंतेत आहोत," असं संदीप गोगोई हा कॉलेजकुमार सांगितो.
चीनकडून माहिती मिळत असतानाही पुराचा फटका बसत होताच, पण किमान लोकांचं स्थलांतर करण्यास तरी वेळ मिळायचा. आता तशी माहिती मिळाली नाही तर काय होईल? गावं आणि लोक कोणीही सुरक्षित राहू शकणार नाही, असंही संदीप म्हणतो.
बांगलादेशला माहिती मिळते
दिल्ली आणि बीजिंग यांच्यात ब्रह्मपुत्रेच्या पाण्याविषयी माहिती देण्याबाबत करार झालेला आहे. 15 मे ते 15 ऑक्टोबर या काळात माहिती देणं अपेक्षित आहे.
यावर्षी, आतापर्यंत चीनकडून कोणतीही माहिती आलेली नाही, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ऑगस्ट महिन्यात दिली होती. काही आठवड्यांनी चीनच्या अधिकाऱ्यांनीही माहिती दिली नसल्याचं स्पष्ट केलं.
गेल्या वर्षी आलेल्या पुराचा जलविद्युत केंद्राला फटका बसला होता. त्याची दुरुस्ती आणि नूतनीकरण सुरू असल्यानं माहिती गोळा केलेली नसल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुंग यांनी सप्टेंबरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं.
नूतनीकरणाच्या कामाच्या प्रगतीवर माहिती देणं अवलंबून असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली होती.
बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार, चीन ब्रह्मपुत्रेच्या पाण्याविषयी माहिती बांगलादेशला नियमित देत आहे. बांगलादेशलाही या नदीच्या पुराचा दरवर्षी फटका बसतो.
आसाम सरकार चिंतेत
ब्रह्मपुत्रेच्या वरच्या पात्रात काय सुरू असतं ते चीन कधीच खुलेपणानं सांगत नाही, असं आसाममधील आमदार अशोक सिंघल यांनी सांगितलं.

सिंघल 'ब्रह्मपुत्रा वाचवा' ही मोहीम चालवतात. तिबेटमध्ये, नदीच्या वरच्या पात्रात जाऊ देण्याची परवानगी अनेकदा मागूनही मिळत नसल्याचं सिंघल म्हणतात.
ते या नदीस यारलुंग झांग्बो म्हणतात. चीननं या नदीवर अनेक धरणं बांधलेली आहेत.
आम्ही पाणी थांबवत नाही आणि वळवतही नाही. खालच्या भागात असलेल्या देशांच्या हिताला बाधा येईल असं आम्ही काही करत नाही, असं चीनचं म्हणणं आहे.
पण, आसामचे अर्थ आणि आरोग्य मंत्री हिमंता सर्मा यांनी मात्र सरकारला चिंता सतावू लागल्याचं म्हटलं आहे.
पूर्वी एक किंवा दोनदा पूर येत असे. या वर्षी, चीननं माहिती न दिल्याच्या पार्श्वभूमीवर, पाऊस पडत नसतानाही, चारवेळा पूर आल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर हे सारं घडत असल्याचंही सर्मा निदर्शनास आणून देतात. चीनकडून माहिती मागवण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे, असंही ते म्हणाले.
भारताचे प्रयत्न अपुरे
आसाममधील शास्त्रज्ञांना भारताचे प्रयत्न पुरेसे वाटत नाहीत. "आपण चीन आणि भारताच्या सीमेवर स्वतंत्र यंत्रणा उभी करून माहिती गोळा करू शकतो. तसंच, उपग्रहाकडून माहिती घेता येईल. पण असं नाही", गुवाहाटी विद्यापीठातील ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ प्रा. बी. पी. बोहरा यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Johnny Haglund / Getty Images
शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी, राजकारणी यांच्यात चर्चा होत नाही. हीसुद्धा अडचण असल्याचं बोहरा म्हणाले.
ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याबाबत भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांना वेळोवेळी त्रास सहन करावा लागतो. त्याच्याकडे चीन लक्ष देत नसल्याचा या देशांचा आरोप आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









