You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुजरात : हार्दिकच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचं पारडं जड?
गुजरात निवडणुका जेमतेम तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या असताना अखेर हार्दिक पटेल आणि काँग्रेस पक्षानं युती जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणुकांचं पारडं काँग्रेसच्या बाजूनं झुकेल का? याचा अंदाज घेण्यासाठी बीबीसी मराठीने काही पत्रकारांशी चर्चा केली.
फायदा म्हणजे निवडणुकीत विजय नाही
"हार्दिक पटेल यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे काँग्रेसला फायदा नक्कीच होईल. पण याचा अर्थ ते निवडणूक जिंकतील असा होत नाही" असं मत अहमदाबादमधले ज्येष्ठ पत्रकार राजीव शाह यांनी व्यक्त केलं.
तर पत्रकार शुभ्रा खाप्रे यांना मात्र बरोबर उलट वाटत आहे. त्याच्या मते "काँग्रेस आणि हार्दिक यांचं एकत्र येणं ही संधीसाधूपणाची युती आहे, त्यामागे कोणताही निर्धार नव्हता आणि त्यामुळे काँग्रेसला याचा फायदा होणार नाही."
"हार्दिक यांच्यात स्थैर्य नाही. ते मध्येच महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरेंना भेटले, त्यांच्या राजकीय विचारधारेला बैठक नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा या निवडणुकीत काँग्रेसला फारसा फायदा होणार नाही." असंही खाप्रे यांना वाटतं.
बीबीसी गुजरातीचे संपादक अंकुर जैन म्हणतात, "1995 नंतर काँग्रेसकडे 'मास अपील' असणारा नेता नव्हता. हार्दिक पटेल यांच्या रुपाने काँग्रेसला प्रचारासाठी तसा नेता मिळाला आहे. हार्दिकमुळे लोक आकर्षित होतील यात शंका नाही. पण त्याचं रुपांतर मतांमध्ये होईल की नाही ते आत्ताच सांगता येणार नाही."
विकासाचं राजकारण विरुद्ध जातींचं आरक्षण
हार्दिक पटेल गेली २ वर्षं पाटीदार आरक्षणासाठी गुजरात पालथं घालत आहेत. आरक्षणाच्या मागणीबाबत एकमत होईपर्यंत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यायचं टाळलं होतं. आता पाठिंबा जाहीर केल्यानंतर हे गणित बदलेल का? याबाबत आम्ही या पत्रकारांशी चर्चा केली.
राजीव शहा यांच्या मते आरक्षण हा भावनिक प्रश्न असला तरी तो या निवडणुकांमध्ये मोठा मुद्दा ठरणार नाही.
"पाटीदार आरक्षणामुळे इतर जातीसमूहांना असलेलं घटनात्मक आरक्षण धोक्यात येणार नाही हे ठसवणं काँग्रेसला गरजेचं आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते आरक्षणाच्या मुद्द्यावर हिरीरीनं प्रचार करण्याची शक्यता कमी आहे."
"भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेसला विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार करावा लागेल." असंही शाह म्हणाले.
त्याचवेळी अंकुर जैन मात्र सुरतच्या गणितांकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात, "सुरतमध्ये अनेक वर्षं भाजपचा जोर आहे. GST नंतर सुरतच्या व्यापारी वर्गाला फटका बसला. सुरतच्या व्यापारी वर्गात पाटीदार समाजाचा टक्का मोठा आहे. GST बद्दलचा असंतोष आणि पाटीदार आरक्षणाचा मुद्दा याचा वापर करून काँग्रेस आणि हार्दिक कदाचित भाजपपुढे आव्हान उभं करू शकतील."
पत्रकार शुभ्रा खाप्रे यांनीही आरक्षणाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याबाबत शंका उपस्थित केली. "आरक्षणाचं राजकारण हे उतावीळपणाचं द्योतक आहे आणि त्या एकाच मुद्द्यावर लढणाऱ्या हार्दिक पटेल यांना गुजराती जनता आपला नेता म्हणून स्विकारण्याची शक्यता कमी आहे." असंही त्या म्हणाल्या.
प्रश्न व्यापारी वर्गाचा
"व्यापार ही गुजरातची ओळख आहे. गुजराती मतदारांचा विचार केलात तर व्यापार आणि उद्योगाचे प्रश्न त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचे आहेत. म्हणूनच गुजरातसारख्या उद्यमशील राज्यात विकासाचा मुद्दा आरक्षणाच्या मुद्दापेक्षा वरचढ ठरतो." असं खाप्रे यांनी वाटतं.
तर "व्यापारी वर्गात GST बद्दल असंतोष आहे हे खरं आहे. पण त्याचा अर्थ त्यांना भाजपबद्दल राग आहे असा होत नाही." असं बीबीसी गुजरातीचे संपादक अंकुर जैन यांच म्हणणं आहे.
"पटेल हा मोठा जातीगट आहेच पण बहुसंख्य पटेल हे व्यापारी आहेत. GSTचा अनेक व्यापाऱ्यांना फटका बसलाय. त्यामुळे ते जातीय आरक्षणापेक्षा आर्थिक कार्यक्रमाकडे पाहून मत देतील. हार्दिकच्या येण्यानं काँग्रेसला आर्थिक कार्यक्रमासंदर्भात कोणतीच मदत झालेली नाही. काँग्रेसला स्वबळावर आर्थिक मुद्द्यांवर प्रचार करावा लागेल त्यामुळे त्या अर्थानं हार्दिकच्या येण्याचा त्यांना फायदा होणार नाही." असं मत शाह यांनी व्यक्त केलं.
'युवा' नेत्यांची युती?
"राहुल गांधींनी उत्तर प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादवांशी युती केली होती. पण त्याचा निकाल काय आला?" असा प्रश्न विचारत शुभ्रा खाप्रे म्हणतात की, आरक्षणाच्या अव्यवहार्य आश्वासनावर हार्दिक पटेल प्रादेशिक नेता म्हणून आपली प्रतिमा तयार करू शकतील असं वाटत नाही.
"हार्दिक व्यतिरिक्त दुसरे युवा नेते अल्पेश ठाकोर यांनी याआधीच काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. पटेल आरक्षणावर भर देऊन अल्पेशसारख्या दुसऱ्या युवा नेत्याला काँग्रेस दुखावू पाहणार नाही" असं शाह यांना वाटतं.
"तरुणांना हार्दिक पटेल यांच्या धाडसी आणि बोल्ड प्रतिमेबद्दल आकर्षण आहे. पण भाजपनं गुजराती तरुण वर्गात आणि विशेषकरून शहरी तरुणाईत आपला जम बसवलाय. त्याला शह देणं हार्दिक-राहुल या 'युवा' जोडगोळीसाठी आव्हान असणार आहे." असं अंकुर जैन सांगतात.
तुम्ही हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)