You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मराठी आणि गुजरात्यांमधील ऋणानुबंध काही झालं तरी उसवणार नाहीत'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात घेतलेल्या जाहीर सभेत मुंबईतल्या गुजराती भाषिकांवर जोरदार हल्ला चढवला.
त्या पार्श्वभूमीवर, जन्मानं मराठी असलेल्या, पण गेल्या आठ पिढ्यांपासून गुजरातमध्ये राहात असलेल्या प्रशांत दयाळ यांनी राज ठाकरेंना एक खुलं पत्र लिहिलं होतं. (खुलं पत्र इथे वाचा)
बीबीसी मराठीनं हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यात काहींनी प्रशांत दयाळ यांना खुलं पत्र लिहिलं, तर काहींनी बीबीसी मराठीलाच धारेवर धरलं.
मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेतल्या या काही निवडक प्रतिक्रिया :
संतोष कौदरे म्हणतात, "जसं गुजरातमध्ये तुम्ही गुजराती संस्कृती, अस्मिता जपली, तसंच महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी जपली पाहिजे."
तर "गुजरातमध्ये जाऊन मराठी माणसानं मतदारसंघ नाही बनवले. तिथल्या संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न नाही केला," असं मत प्रतिक कदम यांनी व्यक्त केलं आहे.
"महाराष्ट्रात राहून हिंदी आणि इंग्रजी या भाषेतून सगळे व्यवहार होत असतील तर महाराष्ट्रात मराठीचं अस्तित्व आहे कुठे?" असा सवाल महेंद्र शिगवण यांनी उपस्थित केला आहे.
"गुजरातमध्ये राहणार्या मराठी माणसानं कधीच माज दाखवला नाही. मात्र मुंबईत येऊन काही गुजरात्यांनी मराठी माणसाला टाचेखाली दाबण्याचे प्रयत्न आधीपासूनच केले आहेत," असा आरोप मनाली गुप्ते यांनी केला आहे.
तर सिद्धांत साळगावकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत प्रशांत दयाळ यांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. ते म्हणतात...
प्रिया सामंत यांनी प्रशांत दयाळ यांच्या खुल्या पत्रावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्या म्हणतात, "आम्ही मांसाहारी आहोत म्हणून आम्हाला नाकारणं हे कुठून आलं?"
पराग बुटाला यांनी, "मराठी आणि गुजरात्यांमधील ऋणानुबंध काही झाले तरी उसवणार नाहीत", असं मत व्यक्त केलं आहे.
तसंच, "बहुसंख्य प्रेमविवाह हे मराठी आणि गुजराती यांच्यामध्ये होतात तेवढे कोणत्याही दोन भाषिकांमध्ये होत नाहीत", असंही त्यांनी नमूद केलं आहे.
मंगेश चुणेकर यांनी मराठी माणसाला आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी का लढावं लागत, याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
"शाकाहारी आणि मांसाहारीचा हा प्रश्न आता दहा वर्षं झाली निर्माण झाला आहे. याआधी असं नव्हतं, मराठी गुजराती एकत्र सर्व सण साजरे करत होते. मग आताच असं का?"असा प्रश्न रोशन गावंड यांनीही प्रशांत दयाळ यांना केला आहे.
"गुजराती लोकांना मुंबईतून कोण बाहेर काढत आहे? आमच्या राज्यात आमची भाषा पाहिजे असं म्हणणं म्हणजे इतरांना बाहेर काढणं असा अपप्रचार का करता? महाराष्ट्रमध्ये स्थानिक मराठी माणसाचा अधिकार आहे", असं विनायक वरूते यांनी म्हटलं आहे.
अमोल राणे यांनी तर प्रशांत यांना गुजराती भाषेत प्रतिक्रिया दिली आहे.
प्रदीप जगताप यांनीही प्रशांत दयाळ यांच्या पत्रावर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात, "ज्याप्रमाणे तुम्ही गुजराती मातीमध्ये समरस झाला आहात त्याप्रमाणे मराठी मातीशी प्रामाणिक असलेल्या गुजराती माणसाचं स्वागतच आहे."
"पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही. आपण जर मुंबईत आलात तर आवर्जून मीरा-भाईंदरला भेट द्या तुमच्या लगेचच लक्षात येईल की इथले लोक गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलतात. आपण मराठी बोललो तर येत नाही असं सांगतात. मग मला सांगा जसे तुम्ही तिथे राहता तसं गुजरात्यांनी इथं रहायला नको का?"
या आणि अशा प्रकारच्या शेकडो कॉमेंट्स या विषयावर आल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)