You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आवाहन बरोबर, पण गरीब फेरीवाल्यांना मारहाण करुन समाजात तेढ निर्माण होईल त्याचं काय?'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर पुन्हा आपली भूमिका मांडली आहे. मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीत ठाकरे यांनी 'अनधिकृत फेरीवाल्यांकडून काहीही खरेदी करू नका' असं आवाहन केलं.
त्यांच्या या आवाहनानंतर मनसे, राज ठाकरे आणि फेरीवाल्यांचा प्रश्न यांच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करू लागले.
बीबीसी मराठीनं या मुद्द्यावर 'होऊ दे चर्चा'मध्ये राज यांच्या आवाहनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे व्यावहारिक आहे का, असा प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरादाखल सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी निवडक प्रतिक्रिया अशा आहेत.
राज ठाकरे यांच्या या आवाहनावर फेसबुकवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. याबाबत बोलताना ओंकार भागवत म्हणतात की, अनधिकृत फेरीवाल्यांकडून खरेदी न करणं हे बरोबर आहे.
याची सुरुवात आपल्यापासूनच प्रत्येकानं करावी. कठीण असलं तरी नियमित असं केल्यास त्याची प्रत्येकाला सवय होईल, असं ओंकार भागवत म्हणतात.
याबाबत अभिराम साठे यांनी आपलं मत मांडताना सांगितलं की, अधिकृत आणि अनधिकृत अशा कुठल्याच फेरीवाल्यांकडून खरेदी करणं टाळावं.
'फेरीवाले वाहनांच्या पार्किंगच्या जागा अडवतात. तसंच ते करही भरत नाहीत. त्यामुळे कर भरणाऱ्या वाहन चालकाला पार्किंग करता येत नाही. फेरीवाल्यांकडून खरेदी टाळावी', असं अभिराम साठे मांडतात.
सुहास भोंडे यांनी मनसेकडून फेरीवाल्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे. ते म्हणतात, "हा प्रश्न सरकारने सोडवावा. पण, बेकायदेशीररित्या गरिबांना मारहाण करणं योग्य नाही. आज आपण मारलं, उद्या ते मारतील. यातून समाजात केवळ तेढ निर्माण होईल. "
या मुद्द्यावर व्यक्त होताना वैभव गौरकर यांनी सिंगापूर सरकारनं अशाच एका प्रश्नावर काय तोडगा काढला याचं उदाहरण दिलं आहे.
एका च्युइंगममुळे तिथल्या मेट्रो सेवेत अडचणी आल्यानं त्या सराकारनं च्युइंगमवर बंदी आणली. चेंगराचेंगरीतील मृत्यूंना जबाबदार धरून फेरीवाल्यांवर बंदी आणली तर हरकत नसावी, असा त्यांचा सूर आहे.
आशिष पध्यार मात्र, फेरीवाल्यांची एक वेगळी बाजू मांडत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की, 'एखादी गोष्ट दुकानात महाग मिळत असेल तर फेरीवाल्यांकडे स्वस्तात मिळते.'
'जसे फेरीवाले सामान्य गिऱ्हाईकावर अवलंबून आहेत. तसे गिऱ्हाईकही फेरीवाल्यांवर अवलंबून असतात. अनेक जण दिवाळीचे कपडे फेरीवाल्यांकडूनच विकत घेतात', असंही ते लिहितात.
प्रथमेश पाटील यांनी आपलं मत मांडताना स्पष्ट केलं की, हे व्यवहार्य नसलं तरी असं करणं गरजेचं आहे. त्यामुळे राज यांच्या आवाहनाकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे.
कोणत्याही सरकाराने मंडयांचा प्रश्न सोडवलेला नाही, हा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केलेला आहे.
फेरीवाले कर न भरता व्यवसाय करतात याकडे लक्ष वेधून पराग बुटाला यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणतात की, फेरीवाले सर्व प्रकारचे कर बुडवून हानिकारक खाद्यपदार्थांची विक्री करतात आणि समांतर अर्थव्यवस्था चालवतात.
'ठाकरे यांचं हे आवाहन मान्य करताना सुरुवातीला थोडा त्रास होईल पण कधीतरी ही सुरुवात करावीच लागेल', असं मत अभिजीत वानखेडे यांनी मांडलं असून अनधिकृत फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करू नये, म्हणजे ही समस्या राहणार नाही, असंही वानखेडे म्हणाले.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)