राज ठाकरे आणि मनसेचं 'नवनिर्माण' ठाण्यातून होईल का?

    • Author, रवींद्र मांजरेकर/अभिजीत कांबळे
    • Role, बीबीसी मराठी

एरवी शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील तलावपाळीला ठाणेकरांची झुंबड उडालेली असते ती मौजमजेसाठी. पण कालच्या शनिवारी, राज ठाकरे यांच्या सभेमुळे हा भाग मनसैनिकांनी गजबजलेला होता.

सभेला झालेली गर्दी आणि राज यांचं भाषण यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली, ती आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी राज यांनी ठाण्याचीच का निवड केली असेल याचीच.

ही काही पहिली वेळ नाही ठाण्याला पसंती देण्याची. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर, स्वतःचा पक्ष स्थापन करण्यासाठी राज्याचा दौरा करण्याचं राज यांनी ठरवलं.

तेव्हा या दौऱ्याची सुरुवात त्यांनी ठाण्यापासूनच केली होती.

ठाण्यात आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी हा दौरा सुरू केला आणि तिथून ते नाशिकला रवाना झाले.

अलीकडच्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टानं घातलेल्या दहीहंडीच्या उंचीच्या मर्यादेला आव्हान दिलं.

ही उंची पाळू नका, असं म्हणत त्यांनी पोलिसांना आव्हान दिलं. तेव्हा पोलीस केसेस अंगावर घेत उंचीची मर्यादा मोडली ती ठाण्यातल्या मनसैनिकांनी.

त्यानंतर फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेनं रान पेटवायला सुरुवात केलं, तेव्हा मोठी प्रतिक्रिया उमटली ती ठाण्यात.

ठाणे स्टेशनच्या बाहेर फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी दमदाटी केली आणि त्यांचे स्टॉल्स उधळून लावले.

दुकानांच्या पाट्या मराठीत करण्याचं आंदोलन असो किंवा खारेगाव टोलनाक्याचं आंदोलन असो सगळीकडे ठाण्याच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना हात दिला.

ठाणंच का?

"राज ठाकरे ठाण्याकडे विशेष लक्ष देत आहेत याचं कारण ठाणं हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. ठाणे शहर कॉस्मोपॉलिटन झालेलं असलं, तरी या शहरावर मराठी माणसाची घट्ट पकड आहे," असं निरीक्षण 'ठाणे वैभव'चे संपादक मिलिंद बल्लाळ नोंदवतात.

"याशिवाय मुंबईपाठोपाठ ठाणेकरांना राज ठाकरे यांचे वलय चांगलंच ठाऊक आहे. टोलसारख्या आंदोलनात ठाणे शहर हाच केंद्रबिंदू राहिलेला आहे," असं बल्लाळ सांगतात.

"ठाण्यात मनसेला कायम चांगला प्रतिसाद मिळत राहिला आहे. पण संघटनात्मक बांधणी, चुकीचे उमेदवार, निवडणुकीच्या काळात राज ठाकरेंनी पुरेसं लक्ष न देणं या तीन कारणांमुळे निवडणुकीत यश मिळालं नाही, असंही बल्लाळ सांगतात.

ठाण्यात मनसेचे जास्तीत जास्त आठच नगरसेवक निवडून आलेले आहेत. किंबहुना कल्याण-डोंबिवलीत त्यांचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत.

सेनेसमोर मनसेला टिकाव लागेल?

"ठाणे शहरामध्ये यश मिळण्यासाठी मनसेसमोर सर्वांत मोठी अडचण आहे ती आहे शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीची. अगदी आनंद दिघे यांच्यापासून ते आजच्या एकनाथ शिंदेपर्यंत शिवसेना संघटनात्मक पातळीवर अगदी मजबूत राहिलेली आहे", असं विश्लेषण 'लोकमत'चे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान मांडतात.

"मनसेची ही बाजू कमकुवत आहे. राज्यातल्या इतर भागांप्रमाणेच ठाण्यातही मनसे संघटनात्मक पातळीवर हवी तशी ताकद निर्माण करू शकलेली नाही," असं संदीप प्रधान सांगतात.

"राज ठाकरेंच्या बाबतीत आणखी एक विषय अडचणीचा आहे, तो म्हणजे त्यांच्या मराठीच्या मुद्द्याचा. राज ठाकरे आजही बाळासाहेब ठाकरेंनी जे मुद्दे उपस्थित केले तेच मुद्दे उपस्थित करत आहेत."

"मराठी तरुणांना रिक्षा-टॅक्सी चालवण्यात किंवा फेरीवाला म्हणून व्यवसाय करण्यामध्ये रस नाही. त्याला इतर व्यवसाय किंवा नोकऱ्यांमध्येही रस आहे. बदललेली परिस्थिती, मुद्दे राज ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हवं," असं प्रधान यांना वाटतं.

संघटनात्मक पातळीवर राजकीय पक्षाला अगदी बूथ पातळीपासून पक्षाची बांधणी करावी लागते. राज ठाकरे यांनी अशा प्रकारची बांधणी केलेली नाही, असं मत संदीप प्रधान व्यक्त करतात.

"जिथे अशी बांधणी केली होती तिथे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपयशानंतर बांधणी विस्कळीत झाली आहे. ती बांधणी त्यांना नव्यानं करावी लागेल. केवळ सभा किंवा आंदोलनाने ठाणे आणि इतर शहरांमध्ये त्यांना यश मिळणार नाही. तर संघटनात्मक बांधणी केली तरच त्यांना यश मिळू शकेल", असा मुद्दाही प्रधान मांडतात.

राज ठाकरे सेनेचा कित्ता गिरवत आहेत?

शिवसेनेला पहिलं यश मिळालं ते ठाण्यातच. '80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण' अशी विचारसरणी सांगत नगरपालिकेचा कारभार हातात आल्यानं शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला.

या वाढलेल्या आत्मविश्वासाच्या फायदा शिवसेनेला मुंबईत झाला. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्यासाठी ठाण्याचं विशेष महत्त्व होतं.

त्यांनी ठाण्यातील एका सभेत तर ठाकरे यांनी ठाणेकरांचे अक्षरशः दंडवत घालून आभार मानले होते.

ठाणेकरांनीही शिवसेनेला भरभरून दिलं. अलीकडेच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वत्र भाजपची सरशी होत असताना ठाण्यानं मात्र शिवसेनेलाच पुन्हा स्पष्ट कौल दिला.

त्यामुळेच सेनेच्या सगळ्या सभांमध्ये आणि चौकाचौकांत 'शिवसेनेचं ठाणे ठाण्याची शिवसेना' हे गाणं हमखास वाजवलं जातं.

कोणत्याही निवडणूक प्रचाराची सांगता मुंबईत होत असली, तरी त्याच्या आदल्या दिवशीची सभा ठाण्याच्या सेंट्रल मैदानात होत असे.

शिवसेना प्रमुखांनी सुरू केलेली ही प्रथा आता उद्धव ठाकरे यांच्या काळातही सुरू आहे. फक्त सभेचं ठिकाण बदललं आहे.

मराठीबहुल लोकसंख्या हे ठाण्याचं वैशिष्ट्य असल्यानं तिथे मनसेला आपल्या भूमिका तपासून पाहता येतात.

किंबहुना ठाणे शहरातील मराठी माणसाचा टक्का मुंबईपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ठाणं मनसेसाठी अधिक महत्त्वाचं ठरतं. हाच टक्का कमी होत असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.

मनसेने ठाण्यातले नेते अभिजित पानसे म्हणतात, "राज ठाकरे गेल्या काही काळापासून ज्या धोक्याचा उल्लेख करत आहेत तो लोंढ्याचा धोका याच भागात जास्त आहे. ठाणे जिल्ह्यात नगरपालिकांच्या सर्वाधिक महानगरपालिका झाल्या आहेत. याचाच अर्थ या भागाची लोकसंख्या वेगानं वाढते आहे. ही गंभीर समस्या आहे."

"त्यामुळेच लोकांना सर्तक करणं आवश्यक आहे. म्हणून ठाण्यात सभा घेतली आणि त्याला मिळालेला प्रतिसाद सगळ्यांनी पाहिला," असंही पानसे म्हणाले.

लोकसभेची निवडणूक आता दीड वर्षावर आली आहे आणि विधानसभेची दोन वर्षावर.

पण राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेऊन आतापासूनच वातावरण तापवलं आहे.

त्यामुळे ठाण्यात मुख्यतः शिवसेना विरुद्ध मनसे अशी राजकीय लढाई आतापासूनच सुरू होईल, अशी शक्यता दिसत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)