... म्हणून चिकनपेक्षा अंडी झाली महाग

    • Author, देवीना गुप्ता
    • Role, बीबीसी मराठीसाठी

कोंबडी आधी का अंडं? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना हैराण करतं. मात्र तूर्तास देशभरात अंड्यांच्या किमतींनी चिकनला मागे टाकलं आहे. अनेकांच्या न्याहरी आणि भोजनाचा अविभाज्य घटक असलेल्या अंड्याच्या किमती वाढल्यानं सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गेल्या 15 दिवसात अंड्यांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्यानं त्यांची नोंद चैनीच्या वस्तूंमध्ये झाली आहे.

गृहिणी असलेल्या दीपा यांना अंड्यांच्या महागाईचा फटका बसतो आहे. "अंडी आमच्या न्याहरीचा अविभाज्य घटक आहे. लहान मुलांना प्रथिनांच्या पुरवठ्यासाठी अंडी महत्त्वाची असतात. प्रत्येकी 5 या दरानं अंडी मिळतात. मात्र आता एका अंड्यासाठी 7 रुपये मोजावे लागतात. घरातला प्रत्येकजण दोन अंडी खातो. पण आता आम्ही एकच अंडं खातो", असं दीपा यांनी सांगितलं.

राजधानी दिल्लीतल्या मध्यवर्ती कनॉट प्लेस परिसरात नरसिंग यांचं अंड्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांचं दुकान आहे. 35 वर्षीय नरसिंग यांच्या दुकानात मिळणारं बटर ऑम्लेट लोकप्रिय आहे. ग्राहकांना यासाठी 30 रुपये द्यावे लागतात. मात्र गेल्या आठवड्यापासून या डिशची किंमत 35 रुपये झाली आहे.

अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. मी काय करू? मला माझ्या पदार्थांचे दर वाढवण्यावाचून पर्याय नाही असं नरसिंग यांनी सांगितलं.

नरसिंग डिलरकडून तीन क्रेट अंडी खरेदी करतात. प्रत्येक क्रेटमध्ये 30 अंडी असतात. त्यासाठी नरसिंग दीडशे रुपये खर्च करत. मात्र आता त्यांना 180 रुपये द्यावे लागतात.

दिल्लीत अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या व्यवसायातील प्रमुख मानव कुमार यांनी अंड्यांची किंमत वाढण्यामागचं कारण सांगितलं. एकूण अंड्यांच्या संख्येत घट झाली आहे.

दिल्ली शहरात दिवसाला साधारण दहा लाख अंड्यांची आवश्यकता असते. मात्र पोल्ट्री फार्मकडून होणारा पुरवठा अत्यंत कमी आहे.

कोंबड्यांचं प्रमुख खाद्य असलेल्या मक्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पोल्ट्री फार्म्सना एक किलो मक्यासाठी 32 रुपये द्यावे लागतात.

याआधी एका किलोसाठी 22 रुपये द्यावे लागत. थेट दहा रुपयांनी किमती वाढल्यानं अंड्यांचं उत्पादनच थांबलं आहे. त्यांच्याकरता कोंबडी विकणं सोपं आहे असं डच फार्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी मानव कुमार यांनी सांगितलं.

योगायोग म्हणजे सध्या अंड्यांची किंमत चिकनपेक्षा जास्त झाली आहे. भारतीय बाजारात दोन प्रकारची अंडी मिळतात. ब्रॉइलर अंडं साधारण प्रत्येकी सात रुपयांना मिळतं तर देशी अंडी प्रत्येकी 12 रुपयांना उपलब्ध असतं.

एक किलो चिकनची किंमत 270 रुपये आहे तर 30 देशी अंड्यांच्या एका क्रेटसाठी 360 रुपये मोजावे लागत आहेत. घाऊक विक्री करणाऱ्या दुकानदारांनी अंड्यांची साठवणूक केल्यानं अंड्यांच्या किमती झपाट्यानं वाढल्या आहेत असं बोललं जात आहे. मात्र घाऊक विक्रेत्यांचं म्हणणं वेगळं आहे.

"अंडी हा नाशवंत पदार्थ आहे. त्याची साठवणूक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अंड्यांचा मुख्य पुरवठा हरियाणातून होतो आणि या प्रक्रियेत असंख्य मध्यस्थ असतात."

"हे मध्यस्थ त्यांचा वाटा घेतात. मध्यस्थांनी वाट्याची रक्कम वाढवली तर आम्हालाच ही रक्कम द्यावी लागते. आम्हाला मिळणारा नफा अगदी तुटपुंजा आहे. मध्यस्थच बहुतांशी नफा स्वत:कडे ओढून घेतात. पोल्ट्रीवाल्यांना प्रत्येक अंड्यासाठी जेमतेम 50 पैसे एवढी मामुली रक्कम मिळते," असं अंड्यांच्या घाऊक व्यापाराचा खानदानी व्यवसाय असलेल्या नूरजेहान यांनी सांगितलं.

"अंडी साठवण्यासाठी आवश्यक असलेली कोल्ड स्टोरेजची सुविधा अपुऱ्या प्रमाणात आहेत. अंडं कोल्ड स्टोरेज अर्थात फ्रीजमध्ये 20 दिवस टिकू शकतं मात्र कोल्ड स्टोरेज यंत्रणा नीट नसल्याने अनेक अंडी प्रवासादरम्यानच खराब होतात," असंही त्यांनी सांगितलं.

तुम्ही हे पाहिलं आहे का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)