प्रेस रिव्ह्यू : जगभरात बोलबाला 'फेक न्यूज'चा!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 'फेक न्यूज' ही संकल्पना अनेकदा वापरली. गेल्या 12 महिन्यात या संकल्पनेचा वापर 365 टक्क्यांनी वाढ झाली.

'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, कॉलीन्स डिक्शनरीनं 'फेक न्यूज' हा जगभरात सर्वाधिक चर्चेत राहिलेला शब्द असल्याचं जाहीर केलं आहे.

युकेमध्यल्या शब्दकोश निर्माण करणाऱ्या या संस्थेनं, 'फेक न्यूज'ची, बातमीच्या नावाखाली असत्य, बऱ्याचदा सनसनाटी माहिती देणं अशी व्याख्या केली आहे.

गेल्या वर्षी ब्रेग्झिट हा सर्वाधिक चर्चेत राहिलेला शब्द होता.

डोनाल्ड ट्रंप यांनी, अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माध्यमांतील काही टीकात्मक बातम्यांवर भाष्य करताना 'फेक न्यूज ओव्हरटाइम' करत असल्याची टिपण्णी केली होती.

अर्थात, 'फेक न्यूज' ही संकल्पना वापरणारे ट्रंप हे एकमेव नेते नव्हते, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

ते पादचारी पूल तात्पुरतेच!

मुंबईत लष्कराकडून एलफिन्स्टन रोड, करी रोड, आंबिवली येथे बांधण्यात येणारे पादचारी पूल तात्पुरते स्वरुपाचे असतील असं वृत्त 'इंडियन एक्सप्रेस'नं दिलं आहे. मुख्य पूल बांधून होईपर्यंत हे पूल उपयोगी पडतील.

डोंगराळ भागात लष्कर अशाप्रकारचे पूल बांधतं. फांउन्डेशन आणि गर्डर तयार झाल्यावर अवघ्या काही दिवसात पूलाचे काम पूर्ण होईल. येत्या 15 दिवसात त्याचा आराखडा तयार होणार आहे.

ऊस दर आंदोलन शेतकऱ्यांच्याच मुळावर

"ऊसशेती काही उद्योगपतींची नाही, तर शेतकऱ्यांचीच आहे. दरासाठी ऊसतोड रोखण्याचा उद्योग करणारी मंडळी शेतकऱ्यांच्याच मुळावर उठली आहेत,"

अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सांगलीतल्या कुंडलमध्ये केली.

'लोकसत्ता'नं हे वृत्त दिलं आहे. शेतकऱ्याला ऊसशेतीतून हक्काचे पसे मिळतात. मात्र, या उत्पन्नाच्या मार्गात खोडा घालण्याचं काम काही मंडळी करत आहेत.

दुधात मिठाचा खडा टाकण्याचा हा उद्योग संबंधितांनी बंद करावा, असा सल्ला पवार यांनी दिला. कारण ऊसशेती ही शेतकऱ्यांची आहे. टाटा-बिर्लासारखे उद्योगपती ऊस पिकवीत नाहीत.

उसाची तोड रोखली तर यामध्ये शेतकऱ्याचेच नुकसान होणार आहे. हे शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलनाची दहशत निर्माण करणारे शेतकऱ्यांचच नुकसान करीत असून दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करू नये, असं पवार म्हणाले.

यशवंत सिन्हा गुजरात दौऱ्यावर

भाजपवर उघडपणे टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा 14 नोव्हेंबरपासून तीन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. एबीपी माझा डॉट इननं हे वृत्त दिलं आहे.

काँग्रेसशी संबंधित 'लोकशाही बचाओ अभियान' नावाच्या स्वयंसेवी संस्थेनं सिन्हा यांच्या दौऱ्याचं आयोजन केलं आहे.

त्यामुळे सिन्हा यांना गुजरातमध्ये आणण्यामागे काँग्रेसचीच खेळी असल्याचं म्हटलं जात आहे.

यशवंत सिन्हा गुजरात दौऱ्यात राजकोट, अहमदाबाद आणि सुरतमधील व्यापाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. जीएसटी आणि नोटाबंदीच्या मुद्द्यावरच सिन्हा अधिक भाष्य करण्याची शक्यता आहे.

ममता आणि उद्धव यांची मुंबईत भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईत भेट झाली. ही बातमी 'लोकमत'नं दिली आहे.

दक्षिण मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही भेट झाली. यावेळी सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. या बैठकीला युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हेखील उपस्थित होते.

भाजप आणि शिवसेनेचे बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर दोन राज्यातल्या या नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जातेय.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पण ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.

राहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक!

निर्भयाच्या आईनं त्यांच्या मुलाला वैमानिक बनण्यासाठी मदत केल्यानं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत.

'सकाळ'नं दिलेल्या वृत्तानुसार, निर्भयाची आई आशा देवी सांगितले की, अमन (नाव बदललेलं) हा आज फक्त राहुल गांधी यांच्यामुळेच वैमानिक होऊ शकला आहे.

निर्भयावर बलात्कार झाला, त्यावेळी अमन बारावीत शिकत होता.

त्याला या प्रकरणामुळे धक्का बसला होता. पण, राहुल गांधी यांनी सतत त्याची भेट घेऊन त्याला मानसिकदृष्ट्या सक्षम केलं. तसंच त्याचा शिक्षणाचा खर्चही उचलला.

शिक्षण झाल्यानंतर त्याला लष्करात भरती व्हायचे होतं. पण, राहुल गांधी यांनी त्याला वैमानिक होण्याचा सल्ला दिला.

त्याला 2013 मध्ये रायबरेलीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अकादमीमध्ये प्रवेश मिळाला. आता त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

राहुल यांच्यासह त्यांची बहिण प्रियांकाही अमनला सतत आत्मविश्वास देत होती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)