सोशलः 'खिचडी न आवडणाऱ्यांना देशद्रोही म्हणणार नाही ना?'

खिचडी हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची खिचडी बनवली जाते. पण याच खिचडीवरून सोशल मीडियावरही चांगलीच खिचडी शिजताना दिसत आहे.

शुक्रवारपासून दिल्लीत भरणाऱ्या 'वर्ल्ड फूड इंडिया' या जागतिक खाद्यमेळ्यात भारतातर्फे 'खिचडी' हा अधिकृत प्रातिनिधिक पदार्थ म्हणून सादर केला जाणार आहे. त्यावरून ही चर्चा सुरू झाली.

बनवण्यासाठी सोपी आणि पोटभरीची अशी पौष्टिक खिचडी आता 'राष्ट्रीय भोजन'चा दर्जा देण्यावरून सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खिचडीला राष्ट्रीय भोजनाचा दर्जा देण्यात आलेला नसल्याचे खाद्य प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी स्पष्ट केलं आहे.

'राष्ट्रीय भोजनावरून अफवांची खूप खिचडी शिजली, हा पदार्थ फक्त वर्ल्ड फूड इंडियामध्ये सादर करण्यात येणार आहे' असं ट्वीट हरसिमरत कौर बादल यांनी केलं आहे.

सरकारच्या या घोषनेवरून सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहेत.

निमा पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी, "खिचडी न आवडणाऱ्यांना देशद्रोही म्हणणार नाहीत ना?" असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ही आपल्या ट्विटर अकाऊंटवर असंच काही म्हटलं आहे.

ते म्हणतात,"खिचडी माझं आवडतं खाद्य आहे. जर त्याला राष्ट्रीय भोजन म्हणून जाहीर केलं आणि कोणी ते खाण्यास नकार दिलं तर त्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला नाही ना नोंदवणार?"

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना 'देशातली किंवा राज्यातली कुठल्या ठिकाणची खिचडी तुम्हाला सगळ्यांच जास्त आवडते?' असा प्रश्न विचारला होता. त्यावर अनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत.

कुणी घरची खिचडी आवडते असं लिहिलं आहे, तर अनिल कुलकर्णींनी एनडीएची खिचडी आवडती असल्याचं लिहिलं आहे. वैभव आघोर अप्पाची खिडची आवडीची असं म्हणतात, तर योगेश चौधरी इस्कॉनची.

ट्विटरवर प्रत्युष मयंक यांनी म्हटलं की, विकासाची खिचडी तर बनली पण सिलेंडरच्या किमतीत ९४ रुपयांनी वाढ झाली तर जनता आपली खिचडी कशी शिजवेल?

तसंच, फेसबुकवर माधुरी खिचडीवरून चाललेल्या चर्चेला राजकीय ओंगळवाणेपणा म्हणतात.

"दिल्लीत शिजणारी राजकारणाची किंवा बिरबलाची खिचडी मला आवडते," असं धनंजय जोशींनी सांगितलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)