प्रेस रिव्ह्यू : बाळासाहेबांच्या भेटीमुळे सोनिया गांधी होत्या नाराज - प्रणब मुखर्जी

प्रणब मुखर्जी यांच्या नुकत्याच आलेल्या 'द कोअलिशन इयर्स' पुस्तकात अनेक खुलासे करण्यात आले आहेत.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यानं सोनिया गांधी नाराज झाल्या होत्या असं त्यांनी पुस्तकात लिहीलं आहे. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्याच पुढाकाराने आपण बाळासाहेबांची भेट घेतली होती. असं प्रणब मुखर्जी यांनी लिहीलं आहे. तेव्हा बाळासाहेबांनी मराठा टायगरचा बंगाल टायगरला पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं.

आधार कार्ड नसल्यानं मुलीचा भुकबळी

आधार कार्ड नसल्यामुळे झारखंडमधल्या सिमडेगामध्ये 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. सहा महिन्यापूर्वी मुलीच्या कुटुंबाचं रेशन कार्ड आधारशी लिंक नसल्यानं रद्द करण्यात आलं होतं.

यामुळे मुलगी आठ दिवसापासून उपाशी होती. 28 सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला. जनसत्ता या दैनिकानं हे वृत्त दिलं आहे.

मुलीचं कुटुंब रेशन घेण्यासाठी सरकारी दुकानात गेल्यावर, रेशन कार्ड आधारशी लिंक नसल्यानं रेशन मिळणार नाही असं त्यांना सांगितलं जात होतं.

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी झारखंड सरकारनं आधार कार्ड अनिवार्य केलं आहे.

झारखंड आणि राजस्थानातील अनेक कुटुंबाना आधारशी संबंधित कारणं सांगून रेशन दिलं जात नाही, असं या वृत्तात लिहीण्यात आलं आहे.

भाजपची श्रीमंती वाढली

सत्ताधारी भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. 2015-16 या वर्षात भाजपची संपत्ती 894 कोटी रुपये एवढी होती.

भाजपखालोखाल काँग्रेस हा क्रमांक दोनचा श्रीमंत पक्ष आहे. 2015-16 या वर्षात काँग्रेसची संपत्ती 759 कोटी इतकी होती. सोमवारी एडीआर म्हणजेच असोशिएसन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं यासंबंधीचा अहवाल जारी केला आहे.

2004-05 ते 2015-2016 या अकरा वर्षांत राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केलेल्या संपत्तीवर हा अहवाल आधारित आहे.

यानुसार गेल्या अकरा वर्षात भाजपच्या राखीव निधीत 700 टक्क्यांनी तर काँग्रेसच्या राखीव निधीत 169 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं हे वृत्त दिलं आहे.

मनुष्यबळ विकास मंत्र्यांची तंबी

शिकवणीच्या नावाखाली खासगी क्लासेस विद्यार्थ्यांना गुलामासारखी वागणूक देत आहेत, असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

आयआयटी किंवा इतर प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळावा, म्हणून विद्यार्थी खासगी क्लास लावतात.

पण, तिथं त्यांना गुलामासारखी वागणूक दिली जाते. तसंच खासगी क्लासवरचं अवलंबित्व दिवसेंदिवस वाढत असल्यानं शाळा आणि कॉलेजामधील शिक्षणाचा दर्जा घसरत आहे, असं बातमीत नमूद केलं आहे.

इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रानं हे वृत्त दिलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)