मटण विक्रेता ते युट्यूबर बनलेल्या 'राजा'ला 'बिझनेस मॉडेल' असं सापडलं..

    • Author, विवेक आनंद
    • Role, बीबीसी तमीळ

कोरोना साथीच्या काळात आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी अनेकांनी दुहेरी उत्पन्नाचा पर्याय स्वीकारला होता.

काहींना त्यात यश आलं तर काहींचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

मदुरैचे रहिवासी असलेले बुहारी राजा यांनीही असे प्रयत्न केले. खरं तर राजा हे मूळचे इंजिनिअर. एकीकडे कोरोना साथ आणि दुसरीकडे कामाचा कंटाळा आल्याने परदेशातील नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला होता.

कोरोना काळात बुहारी राजा यांना आपला परंपरागत व्यवसाय असलेल्या मटण विक्रीच्या कामाची जबाबदारी स्वीकारावी लागली.

पण काही वेगळं करण्याच्या प्रेरणेने त्यांनी युट्यूबर मटण विक्रेता म्हणून एक नवी ओळख मिळवली आहे. यादरम्यान त्यांचा प्रवास कसा राहिला. त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागलं, अखेर युट्यूबवरून कमाई करण्यासाठीचं बिझनेस मॉडेल त्यांना कसं गवसलं?

आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण मिळवू, राजा यांची कहाणी वाचू त्यांच्याच शब्दांत –

नोकरी, आर्थिक विवंचना आणि नैराश्य

ते 2020 चं वर्ष होतं. आखाती देशात नोकरीला जाऊन मला 2 वर्षे उलटली होती.

मला पुन्हा घरी परतण्याचे वेध लागले होते. खरं तर अशी परिस्थिती चार वर्षांपूर्वीही आली होती.

चार वर्षांपूर्वी माझी आखाती देशातली ही नोकरी सोडून मी माझं स्वप्न असलेल्या सिनेमात करिअर करण्यासाठी निघून आलो होतो.

विवाहित असूनही नोकरी सोडण्याचा निर्णय धोक्याचा होता. पण पैशाचा विचार न करता मी नोकरी सोडली. या काळात एके ठिकाणी मी सहायक दिग्दर्शक म्हणून कामालाही जाऊ लागलो.

पण माझ्या त्या निर्णयामुळे माझ्या कुटुंबाला प्रचंड त्रास सहन करावा लागला. आपल्याला खरंच पैशांची खूप गरज आहे, हे मला त्यावेळी लक्षात आलं.

त्यामुळे मी माझ्या दिग्दर्शकाला न सांगता ती नोकरीही सोडली, पुन्हा आखाती देशात जाऊन पूर्वीची नोकरी जॉईन केली.

कामात माझं मन लागत नव्हतं. पण आधीची चूक पुन्हा करायची नाही, असं मी ठरवलेलं होतं.

मी दुसरी नोकरीही पाहू लागलो. पण मला समाधानकारक नोकरी भेटत नव्हती. पैशाचा प्रश्नही होताच.

तेवढ्यात मला मी शूट केलेला एक जुना व्हीडिओ आठवला. 2015 मध्ये मी एका सेक्स वर्करची मुलाखत घेतली होती. तिने त्या मुलाखतीत सांगितलेली माहिती माझ्यासाठी प्रचंड धक्कादायक होती.

पण त्यावेळी माझ्याकडे पुरेशी संसाधने किंवा एडिटिंग सॉफ्टवेअर विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने मी मुलाखत योग्यरित्या एडीट करू शकत नव्हतो. पण 2020 पर्यंत ते काम माझ्या आवाक्यात आलं.

मी एक युट्यूब चॅनेल बनवलं आणइ तो व्हीडिओ एडीट करून त्या चॅनेलवर टाकून दिला.

व्हीडिओ फारसा चालला नाही, पण मला त्या कामात मजा आली.

एकीकडे, 2020 मध्ये कोरोना साथीचा आव्हानात्मक काळ सुरू असताना कुटुंबीयांपासून दूर असल्याच्या भावनेने मी दुःखी झालो.

मायदेशी परतण्याची ओढ मला लागली होती. मी तीन महिन्यांचा पगार वाचवला. हा पगार मला तामीळनाडूत सहा महिने पुरेल, इतका होता. शिवाय, माझ्या कुटुंबीयांचं मटण विक्रीचं दुकान आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून मी 2021 च्या मार्च महिन्यात मदुरैला परतलो.

मी घरी आलो खरा, पण पुन्हा मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना, या विचाराने मला छळणं सुरू केलं.

घरी परतल्यानंतरची आव्हाने

खरं तर, मला कामातून ब्रेकही हवा होता. गेल्या दोन वर्षांत मी एकही सुटी न घेता काम केलेलं होतं.

त्यामुळे मी दोन महिने विश्रांती घेतली. पण हे दिवस लगेच उडून गेले.

कोरोना लॉकडाऊनमुळे देशात अनेक निर्बंध लागू झाले होते. मटण विक्रीच्या दुकानांवरही निर्बंध होते. लोकांच्या पैसे खर्च करण्याच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम पाहायला मिळत होता.

अशा स्थितीत हाताला दुसरं कामही मला मिळत नव्हतं. या सगळ्या गोष्टींमुळे मी चुकीच्या वेळी नोकरी सोडली, याचा मला पश्चाताप होण्यास सुरूवात झाली.

पण कुटुंबाला आर्थिक हातभार देण्यासाठी काही निर्णय घेण्याची मला गरज होती. दरम्यान, मी कुटुंबाचा पारंपारिक व्यवसाय असलेल्या मटणविक्री दुकानात काम करू लागलो.

'चप्पल दुरुस्ती करणाऱ्याने मार्ग दाखवला'

एके दिवशी मी मदुरैच्या पेरियार बस स्टँडवर बसलो होतो. लॉकडाऊन निर्बंध शिथिल होण्याची वेळ संपत आली होती. शहर पुन्हा निर्मनुष्य होऊ लागलं.

त्यावेळी मला एक चप्पल दुरुस्ती करणारा चर्चसमोर बराच वेळ बसलेला दिसला.

मी त्याचं दोन तास निरीक्षण केलं. नंतर मी त्याच्याशी जाऊन बोललो.

मी त्याला विचारलं, “तुम्ही इतका वेळ इथे का बसला आहात, लोक इथे येतील का?”

तो म्हणाला, “नवीन चप्पल 500-600 रुपयांना मिळते. पण लोकांकडे ते खरेदी करण्यासाठी पैसे आहेत का, कारण चप्पल फाटली तर ते नवी विकत घेणार नाहीत. ते दुरुस्त करूनच वापरतील, त्यामुळे त्यांची मदत करण्यासाठी मी इथे कायम बसून आहे.”

त्या चप्पल दुरुस्तीकर्त्याच्या बोलण्यातून मला एक आशेचा किरण दिसला.

लोकांची फारशी गर्दी नसतानाही हा व्यक्ती इथे बसून राहतो. मग आपण का चिकाटीने काम करू शकत नाही, असं मला त्यावेळी वाटलं.

माझ्या हातात एक आयफोन होता. मी तो दुबईमध्ये विकत घेतलेला होता. आयफोनमध्ये एक चांगले चांगले अप होते. त्यातून मी एडिटिंगही करू शकत होतो. त्याच्या मदतीने काम करण्याचा मी निर्णय घेतला.

मी तत्काळ त्या चप्पल दुरुस्त करणाऱ्यांची मुलाखत घेतली. माझ्या चॅनेलवर ती अपलोड केली. भारतात परतल्यानंतर तो माझा पहिला व्हीडिओ होता.

हे चॅनेल पैसे कमावून देईल की नाही, मला कल्पना नव्हती. पण कोणते व्हीडिओ बनवावेत, याचा मला अंदाज आला.

मी मटण दुकानात काम करत असताना अनेकजण मी करत असलेलं काम पाहायचे. मी कशा प्रकारे मटण कापतो, हे पाहण्यात लोकांना रस असायचा. माझे मित्रही मला अनेकवेळा त्याबाबत विचारत असत.

म्हणजे, इतर लोक करतात, त्या कामामध्ये लोकांना रस असतो. ते काम कशा प्रकारे केलं जातं, ते लोक पाहतात, हे मला लक्षात आलं.

त्यामुळे सर्वसाधारण काम करणारे लोक कशा प्रकारचं आयुष्य जगतात, त्याबद्दल मी व्हीडिओ करू लागलो. त्यासाठी प्रवास करून फिरत शोधही घेऊ लागलो. इथेच बुहारी जंक्शन चॅनेलचा जन्म झाला.

'जाहिरातीसाठी 200 रुपये मिळण्याची मारामार'

मी माझ्या जवळच्या काही लोकांना ही कल्पना सांगितली. हे लोक का बघतील, असं त्यांनी विचारलं. काहींनी म्हटलं की उगाच यामध्ये वेळ वाया घालू नकोस.

पण लोकांसोबतच्या चर्चेतून मला एक लक्षात आलं की हे काम पूर्ण वेळ करण्यात सध्यातरी कोणताच फायदा नाही.

हे पॅशन म्हणून ठिक असलं तरी हे काम एक सेकंड इन्कम म्हणून करणं मी सुरू केलं. मी मटण दुकानात काम करणं सोडलं नाही.

पुढच्या काही महिन्यांत लॉकडाऊन उठवण्यात आला. मी मटण दुकानात सकाळी 4 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत काम करायचो. नंतर जेवण करून रात्री दहा वाजेपर्यंत व्हीडिओ बनवण्याचं काम मी करू लागलो.

लोकांना भेटणं, त्यांची कहाणी जाणून घेणं, योग्य वाटल्यास व्हीडिओ बनवणं, ते एडीट करणं, असं सगळं सुरू होतं.

पैशाची समस्या होती. पण कमीत कमी संसाधनांमध्ये मी माझं काम करायचो.

मला एक लक्षात आलं की अशा व्हीडिओंमध्ये कंटेट खूपच जास्त महत्त्वाचा आहे. लोकांची भावना प्रामाणिकपणे दाखवली तर ते लोकांना आवडतं. त्याला कोणतंच तंत्रज्ञान अडवू शकत नाही.

दरम्यान, काही कंपन्यांच्या जाहिराती मला मिळाव्यात म्हणून मी प्रयत्न केले. पण प्रत्येकवेळी त्यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर, तुझे सबस्क्राईबर किती आहेत, व्ह्यू किती मिळतात, असे प्रश्न मला केले जायचे. जाहिरातीसाठी 200 रुपयेही देण्यास कुणी तयार नसत.

त्यामुळे, अखेर, मी अशा जाहिराती मिळवण्यासाठीचे प्रयत्न पूर्णपणे थांबवले.

मात्र, नंतर काही लोकांनी स्वतःहून माझे व्हीडिओ पाहून मला जाहिराती दिल्या.

कारण मी माझ्या चॅनेलवर अशा लोकांबद्दल चर्चा करायचो, ज्यांच्याविषयी प्रमुख माध्यमांकडून दुर्लक्ष झालेलं आहे.

दरम्यानच्या काळात मी मदुरैसह इतर अनेक शहरांत फिरलो. वेगवेगळ्या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांशी बोलून त्यांची कहाणी जाणून घेतली.

एक लोकगीत गायक, सिनेमागृह ऑपरेटर, मेकॅनिक, पंक्चर काढणारी महिला अशा एक ना अनेक व्यक्तीबाबत मी व्हीडिओ केले.

माझ्या चॅनेलला कमी व्ह्यूज असले तरी मी मुलाखत घेतलेल्या लोकांपर्यंत मदतीचे हात पोचत. कधी-कधी माझ्या चॅनेलवर आलेल्या लोकांशी बोलून मोठ्या वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या बातम्या केल्या.

लोक माझ्या चॅनेलवरचा व्हीडिओ पूर्णही पाहायचे नाहीत आणि मला संबंधितांचा नंबर मागत. त्याचं मला दुःख व्हायचं. पण संबंधित व्यक्तीला मदत मिळण्यासाठी मी त्यांचे नंबर लोकांना द्यायचो.

एकदा मी कोडाईकॅनलमध्ये आत्महत्या करणाऱ्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणाऱ्या एका व्यक्तीची मुलाखत घेतली.

आत्महत्येचे विचार मनात येणाऱ्या काही लोकांनी हा व्हीडिओ पाहिल्यानंतर त्यांचं मनपरिवर्तन होऊन पुन्हा जगण्याची आशा निर्माण झाल्याचं त्यांनी मला सांगितलं.

पक्षाघाताचा झटका बसलेल्या आईची सेवासुश्रुषा करणाऱ्या सहा मुलींचा मी व्हीडिओ केला होता. माझ्या व्हीडिओनंतर त्यांना मदत प्राप्त झाली.

‘अखेर, बिझनेस मॉडेल सापडलं’

मी युट्यूब चॅनेलमधून किती पैसे कमावलेत माहिती आहे?

पहिल्या सहा महिन्यांत आठ हजार रुपये.

मी विविध प्रकारच्या लोकांशी बोलून व्हीडिओ केले. पण एके दिवशी मनात विचार आला, आपण जे काम करतो, त्याचाच का व्हीडिओ करू नये.

त्यामुळे मी मटण कसं विकत घ्यावं, हे सविस्तर सांगणारा व्हीडिओ केला.

या व्हीडिओला चांगला प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर मी चिकन-मटण स्वच्छ कसं करावं, चांगलं मटण निवडावं कसं, बोनलेस मटण चांगलं की हाडांसोबतचं मटण चांगलं, अशा प्रकारचे काही व्हीडिओ केले.

माझ्या अशा व्हीडिओंना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. लोक माझ्या दुकानात येऊन मटणाबाबत मला विचारू लागले. विक्रीही वाढली. इथेच मला माझं बिझनेस मॉडेल सापडलं.

मटण विक्री वाढवण्यासाठी माझ्या चॅनेलवरचे व्हीडिओ मदतीचे ठरू लागले. वेगवेगळ्या ठिकाणचे लोक माझ्या व्हीडिओची दखल घेत दुकानी येऊ लागले. दुकानातून मिळणारं माझं उत्पन्न वाढलं.

यानंतर, लवकरच माझ्या चॅनेलने 1 कोटी व्ह्यू झाले. सबस्क्रायबरही वाढून 1 लाखांपुढे गेले.

गेल्या काही दिवसांपासून मला प्रति महिना दीड लाखांपर्यंत पैसे मिळू लागले आहेत. आता या क्षेत्रात आणखी काहीतरी मोठं करण्याची माझी इच्छा आहे.

आता चित्रपट क्षेत्रात काही करून दाखण्याचं स्वप्नही मला खुणावतंय. बाकी लोकांच्या आयुष्याशी संबंधित व्हीडिओ मी करत राहणारच आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)