कोहिनूर हिऱ्यासह या 9 अनमोल भारतीय वस्तू ब्रिटनकडून परत मिळणं शक्य आहे?

कोहिनूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोहिनूर
    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बहुचर्चित कोहिनूरसह अब्जावधी डॉलर्सएवढ्या मूल्याच्या भारतीय कलाकृती परत कराव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. ही मागणी पूर्ण होऊ शकेल का?

मागच्या आठवड्यात लंडनमध्ये टिपू सुलतानच्या तलवारीचा आणि आणखी काही कलाकृतींचा लिलाव झाला आणि 142 कोटी रुपयांची रक्कम उभी राहिली.

ब्रिटनमध्ये मूळच्या भारतीय कलाकृतींचा मोठा खजिना आहे. तो परत मिळावा यासाठी भारत सरकारकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत.

आधीच्या सरकारांनीसुद्धा ही मागणी लावून धरली होती. आता मोदी सरकारसुद्धा प्रयत्न करत आहे. भारतीय वारसा परत मिळवण्यासाठी भारत सरकारपुढे काय काय आव्हानं आहेत आणि ब्रिटीश सरकार कधीकाळी लुटलेला हा अनमोल ठेवा परत देणार का याविषयी बीबीसीचे प्रतिनिधी झुबैर अहमद यांचा हा स्पेशल रिपोर्ट...

हॉलोकॉस्ट सर्व्हावर्स अर्थात हिटलरने केलेल्या नरसंहारातून वाचलेले ज्यू लोक नेहमी एक गोष्ट बोलून दाखवतात. नाझी जर्मनीने केवळ ज्यूंची कत्तल केली नाही तर त्यांच्या हजारो बहुमोल कलाकृतीही लुटून नेल्या.

हा भीषण नरसंहार रोखू शकलो नाही म्हणून युरोप हळहळत असतानाच दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर लगेच अमेरिकेने ज्यूंच्या कलाकृती त्यांना परत देण्याबाबत हालचाली सुरू केल्या.

अमेरिकी सैन्याच्या मदतीने अंदाजे सात लाख कलाकृतींची ओळख पटवण्यात आली आणि त्या जिथून लुटून आणल्या होत्या त्या त्या देशात पाठवण्यात आल्या. या कलाकृतींचे मालक बहुतांश ज्यू लोक होते.

कलाकृती परत देण्याची ही मोहीम इथेच थांबली नाही. पुढे युरोपीय देशांनी 1985 साली सामूहिकरीत्या ज्यूंकडून लुटलेल्या कलाकृती ओळख पटवून त्यांना परत देण्याचं काम औपचारिकरीत्या सुरू केलं आणि पुढे 1998 मध्ये याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक सामंजस्य करारही झाला, ज्यावर 39 देशांनी स्वाक्षरी केल्या.

कोहिनूर, इतिहास, भारत, ब्रिटन

फोटो स्रोत, Getty Images

पण मध्ययुगात आशिया आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांना गुलामगिरीत ढकलणाऱ्या युरोपीय देशांनी त्यांच्याकडून लुटलेली संपत्ती त्यांना परत देण्यासाठी कुठलीही हालचाल सुरू केल्याचं दिसत नाही.

सध्याच्या काळात संपूर्ण युरोपात वसाहतवादाविरोधातील विचारांची लाट आहे. मध्ययुगापासून आजपर्यंत स्वतंत्र देशांवर ताबा मिळवून लोकांना गुलाम बनवणं आणि त्यांच्या बहुमूल्य कलाकृती लुटणं हा गंभीर अपराध असल्याची जाणीव जोर पकडत आहे.

या गुन्ह्याचा सर्वांत मोठा फटका भारताला बसला आहे. प्रथम, ब्रिटनच्या ईस्ट इंडिया कंपनीने आणि 1857 च्या उठावानंतर ब्रिटिश राजवटीने भारतातील मौल्यवान कलाकृती, चित्रं, कापड, शिल्पं, हिरे आणि जडजवाहिर लुटले किंवा जबरदस्तीने ताब्यात घेतले.

यापैकी काही वस्तू त्यांना भेटवस्तू म्हणून देण्यात आली होती आणि काही करारानुसार ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतल्या.

ब्रिटीश साम्राज्यवादाच्या काळाची भारतात 'अंधार युग' म्हणून आठवण काढली जाते.

डॉक्टर सुवरोकमल दत्ता
फोटो कॅप्शन, डॉक्टर सुवरोकमल दत्ता

दिल्लीतील उजव्या विचारसरणीचे डॉक्टर सुवरोकमल दत्ता बीबीसीशी संभाषणात याविषयी भावुक होऊन म्हणतात की, ब्रिटनच्या जुन्या गुन्ह्यांचं प्रायश्चित करण्याची वेळ आता आली आहे.

ते म्हणतात, "जर ब्रिटनने आजपर्यंत लुटलेल्या भारतीय कलाकृती आणि अनमोल वारसा परत केला नाही, तर गुलामगिरी, वसाहतवाद, लुटमार, मजुरी आणि नरसंहार यांची आपण पाठराखण करतो असं जगासमोर जाहीर करावं. आपला काळा इतिहास पुसून टाकण्याची यापेक्षा चांगली संधी ब्रिटनला मिळणार नाही. आता नाही तर कधीच नाही."

जगभरातील सार्वजनिक संग्रहालये आणि खाजगी संग्रहांमधून चोरलेल्या आणि तस्करी केलेल्या प्राचीन कलाकृती भारतात परत आणण्यासाठी 'इंडिया प्राइड प्रोजेक्ट' एक छोटीशी नागरी चळवळ सुरू झालेली आहे.

चेन्नईच्या एस. विजयकुमार आणि सिंगापूरस्थित सार्वजनिक धोरण विशेषज्ञ अनुराग सक्सेना यांनी 2013 मध्ये ही चळवळ किंवा मोहीम सुरू केली.

अनुराग सक्सेना

अनुराग सक्सेना सांगतात, "तुम्ही हडप केलेल्या देशाला तोपर्यंत पूर्ण स्वातंत्र्य देत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून लुटलेली संपत्ती त्या देशाला परत करत नाही. भारतातून लुटलेल्या वस्तूंची औपचारिक स्वरूपाची यादी तयार केलेली नाही आणि या लुटलेल्या वस्तूंच्या मूल्याचा नेमका अंदाजही लावता येणं शक्य नाही."

आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की, त्यांच्या विभागात अशी कुठली यादी उपलब्ध नाही. पण अशा लुटलेल्या वस्तूंची संख्या हजारांत आहे.

एका अंदाजानुसार ब्रिटनने भारतातून लुटलेल्या कलाकृतींची संख्या 30 हजारांहून अधिक आहे. या कलाकृती अमूल्य आणि दुर्मीळ आहेत. यांची किंमत ठरवता येणार नाही, असाही एक सर्वसाधारण समज आहे.

डॉ. दत्ता सांगतात, "हा भारताचा राष्ट्रीय वारसा आहे आणि आमच्या संस्कृतीशी जोडलेला आहे."

ब्रिटनमध्ये कुठल्या भारतीय कलाकृती आहेत?

भारताला आपला हा सांस्कृतिक वारसा देशात परत आणणं शक्य आहे का? या महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळण्याअगोदर भारताच्या कोणकोणत्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आणि बहुमोल वस्तू ब्रिटनमध्ये आहेत ते पाहूया.

1. कोहिनूर हिरा

सर्वांत प्रसिद्ध आणि बहुमोल असा भारतीय ठेवा म्हणजे कोहिनूर हिरा. सध्या हा हिरा ब्रिटीश क्राउन ज्वेल्सचा भाग आहे. सन 1849 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने एका लढाईत हा जिंकून घेतला होता आणि नंतर इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाला भेट दिला होता.

कोहिनूरचा इतिहास आणि पार्श्वभूमी

परिचय:

कोहिनूर हिरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जगातील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोहिनूर हिऱ्याने शतकानुशतके लोकांच्या मनावर मोहिनी घातली आहे.

या मोहक हिऱ्याविषयीचं आकर्षण आणि कुतूहल आजही कमी झालेलं नाही. भारताचं म्हणणं आहे की, कोहिनूरचं खरं घर भारतच आहे तर इंग्लंडचे लोक ते आपण मिळवलेली मालमत्ता असल्याचं समजतात.

उत्पत्ती आणि प्रारंभिक इतिहास:

कोहिनूर हिऱ्याची उत्पत्ती नेमकी कशी झाली हे गूढ आहे. भारतात गोलकोंडा प्रदेशातील कोल्लूर खाणीत उत्खनन करताना हा हिरा सापडला असं मानलं जातं. हिर्‍याचा सर्वांत जुना ऐतिहासिक दस्तावेज इ.स. 1306 चा काकतिया राजवंशाच्या काळातला आहे.

कोहिनूर

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राजवंशातलं स्थानांतर आणि स्थानांतरामुळे झालेला बदल

हा हिरा एका राजवंशाकडून दुसऱ्या राजवंशात जात राहिला. त्यामुळे दक्षिण आशियातल्या वेगवेगळ्या राज्यांतून कोहिनूरचा प्रवास सुरू राहिला.

सुरुवातीला काकतीय राजघराण्यात असलेला हा हिरा एकाकडून दुसऱ्याकडे जात जात दिल्ली सल्तनतपर्यंत पोहोचला आणि मग मुघल साम्राज्यापर्यंत पोहोचला.

मुघल बादशाह बाबरने आपल्या आठवणींमध्ये या हिऱ्याचा उल्लेख केलेला आहे. हा हिरा अखंड असताना त्याचं वजन 186 कॅरेट असल्याचं मानलं जातं. त्यानंतर म्हणे हा हिरा तासला गेला आणि पैलू पाडण्यासाठी तो तोडलाही गेला. त्यानंतर या तासून पैलू पाडलेल्या हिऱ्याचं वजन घटलं आणि सध्याच्या स्वरूपात 105.6 कॅरेट इतकं झालं.

ब्रिटिशांचं अधिग्रहण आणि वाद

18 व्या आणि 19 व्या शतकात भारतीय उपखंडात अनेक राज्यांनी सत्ता प्रस्थापित करताना बरेच संघर्ष केले. या काळात या भूमीत अनेक युद्ध झाली. या सगळ्या अशांत काळात आणि उलथापालथीदरम्यानही कोहिनूर हिऱ्याने वसाहतवाद्यांचं लक्ष वेधून घेतलं.

इ.स.1849 मध्ये, दुसऱ्या अँग्लो-शीख युद्धात ब्रिटिशांच्या विजयानंतर, लाहोरच्या तहाअंतर्गत हा हिरा युद्धातील लुटीचा भाग झाला आणि इंग्रजांकडे गेला. अशा पद्धतीने कोहिनूर ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपवला गेला.

शाही खजिना आणि प्रदर्शन:

ब्रिटीश अधिकाऱ्यांनी 1850 मध्ये राणी व्हिक्टोरियाला कोहिनूर भेट दिला. तेव्हापासून तो टॉवर ऑफ लंडनमध्ये आहे आणि ब्रिटीश क्राउन ज्वेल्स या खजिन्यात प्रदर्शनाला ठेवण्यात आला आहे.

मालकीचा वाद आणि मागण्या:

कोहिनूर हिऱ्याची खरी मालकी कुणाची हा वादाचा विषय ठरला आहे. सत्तेत येणाऱ्या वेगवेगळ्या भारतीय सरकारांतर्फे आणि अनेक व्यक्तींच्या माध्यमातूनही कोहिनूर हिरा भारताला परत करण्याची मागणी सातत्याने होत आहे.

वसाहतवादाच्या काळात हा हिरा दबावतंत्राचा वापर करून हिरावून घेण्यात आला त्यामुळे हिऱ्यावर खरा हक्क भारताचा आहे, असा युक्तिवाद भारतातर्फे केला जात आहे.

कोहिनूर

फोटो स्रोत, Getty Images

हिऱ्याचा जागतिक प्रभाव

कोहिनूर हिऱ्याच्या मालकी हक्काच्या वादापलीकडे या हिऱ्याचं दुर्मीळ असणं आणि त्याचं कल्पनातीत लखलखीत तेज यामुळे हा हिरा आंतरराष्ट्रीय पातळीवर आकर्षणाचा विषय ठरला आहे. फारसी भाषेत कोहिनूरचा अर्थ आहे प्रकाशाचा पर्वत.

वारसा आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन:

अलिकडच्या वर्षांत भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात कोहिनूर हिऱ्याच्या भवितव्याबाबत चर्चा झाली आहे.

काही जणांनी या वादावर तडजोड म्हणून एका सामायिक व्यवस्थेचा प्रस्ताव मांडला.

ब्रिटिश क्राउन ज्वेल्सच्या प्रदर्शनाव्यतिरिक्तच्या उर्वरित काळात हिरा भारतात प्रदर्शित केला जाऊ शकेल. यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळेल आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व मान्य होईल.

2. सुल्तानगंज बुद्ध

ही एक वैशिष्ट्यपूर्ण भारतीय कलाकृती आहे. इसवी सनाच्या आठव्या शतकातली बुद्धाची कांस्य प्रतिमा आहे. सध्या लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही मूर्ती ठेवलेली आहे.

3. अमरावती स्तूप पॅनेल

लंडनच्या ब्रिटीश म्युझियममध्ये अमरावती स्तूप नावाने प्राचीन दगडी पॅनेल्सचा एक दुर्मीळ संग्रह आहे. भारतातल्या सर्वांत महत्त्वाच्या बुद्घध स्थळांपैकी तो एक आहे. भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रसंग या दगडी पट्टीवर कोरण्यात आलेले आहेत.

कोहिनूर, इतिहास

फोटो स्रोत, Getty Images

3. टिपू सुलतानची तलवार

ही तलवार लंडनमध्ये खासगी संग्रहाचा भाग आहे. पण भारताच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक वारशातील महत्त्वाची वस्तू आहे.

4. शिवाजी महाराजांची तलवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकप्रिय तीन तलवारींची नावं होती - तुळजा, भवानी आणि जगदंबा.

ब्रिटीश राजघराण्याच्या मालकीच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये त्यातल्या तलवारी आहेत असं म्हणतात.

महाराष्ट्र सरकारने या तलवारी परत मिळाव्यात म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.

5. टिपू सुलतानचा वाघ

हे एक प्रसिद्ध यांत्रिक खेळणं आहे. यामध्ये एका ब्रिटीश सैनिकाला वाघ मारतोय असं दाखवण्यात आलं आहे. म्हैसूर राज्याचा शासक टिपू सुलतानसाठी हे खेळणं बनवण्यात आलं होतं. सद्या पॉव्हिन कॅसलमध्ये ही कलाकृती ठेवलेली आहे.

6. अमरावती रेलिंग

ब्रिटीश संग्रहालयात अमरावती स्तूपाबरोबर संगमरवरी नक्षीदार रेलिंगचाही समावेश आहे. इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकातलं हे काम आहे. गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित दृश्य यामध्ये कोरलेली आहेत.

7.पंजाबच्या महाराजांचा मुकुट

शीख साम्राज्याचे अंतिम राजे रणजीत सिंग यांचा मुकुट यूकेच्या रॉयल कलेक्शन ट्रस्टमध्ये आहे. या मुकुटात बरेच हिरे आणि अन्य रत्न जडवलेली आहेत.

कोहिनूर, इतिहास

फोटो स्रोत, Getty Images

8. चोल साम्राज्याच्या कांस्य प्रतिमा

दक्षिण भारतातल्या चोल साम्राज्याच्या राजघराण्यातील कांस्य प्रतिमा ब्रिटीश संग्रहालयात आहेत. इसवीसनाच्या 9 ते 13 व्या शतकादरम्यानच्या या मूर्ती देवदेवता आणि संतमहात्म्यांच्या आहेत.

9.'बनी ठनी' पेंटिंग

लंडनच्या नॅशनल गॅलरीत बनी-ठनी नावाने प्रसिद्ध राजस्थानी मिनिएचर पेंटिंग आहे. 18व्या शतकातल्या या पेटिंगमध्ये राजस्थानच्या किशनगढ दरबारातली एक महिला दाखवलेली आहे.

याशिवाय अनेक मौल्यवान कलाकृती आणि वस्तू ब्रिटनच्या ताब्यात आहेत. या सगळ्या गोष्टी चार पद्धतीच्या कस्टडीमध्ये आहेत.

संग्रहालय, युनिव्हर्सिटी लायब्ररी, खासगी मालमत्ता आणि ब्रिटीश क्राउन ज्वेल या चार ठिकाणी त्या वस्तू विखुरलेल्या आहेत.

डॉ. दत्ता म्हणतात, "भारतातून लुटलेल्या वस्तूंची संख्या कमीत कमी 25 ते 30 हजारांच्या आसपास असेल. याहून कदाचित अधिकच असतील. कारण अजूनपर्यंत या सगळ्या लुटीच्या मालाची औपचारिक गणती केली गेलेली नाही."

भारताच्या कलाकृती देशात परत कशा येणार?

भारताच्या सध्याच्या आणि याअगोदरच्या अनेक सरकारांनी ब्रिटीश अधिकाऱ्यांकडे कोहिनूर आणि इतर कलाकृती परत द्याव्यात अशी मागणी केलेली होती. पण अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही.

इंग्लंडचं वृत्तपत्र 'द टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, मोदी सरकार कोहिनूर हिरा आणि अन्य बहुमोल वस्तू परत मिळवण्यासाठी राजकीय व्यूहरचना आखत आहे.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार कोहिनूरसारखा वादग्रस्त हिरा भारतात परत आणणं जवळपास अशक्य आहे.

हर्ष त्रिवेदी सुप्रीम कोर्टाचे वरीष्ठ वकील आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतापुढे दोन मुख्य आव्हानं उभी ठाकण्याची शक्यता आहे.

"पहिलं आव्हान - अत्यंत गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया. चोरीच्या कलाकृती परत मिळवण्यासाठीची प्रक्रिया खूप किचकट असू शकते आणि अनेक अधिकार क्षेत्र आणि बऱ्याच ठिकाणच्या कायदेशीर प्रक्रियांचा समावेश असू शकतो. भारताला अनेक कायदेशीर अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये स्वामीत्व हक्क सिद्ध करावा लागतो आणि या कलाकृती चोरीच्या आहेत किंवा अवैधरीत्या त्या हिरावून घेण्यात आल्या आहेत हे सिद्ध करावं लागेल."

"दुसरं आव्हान आहे राजकीय आणि व्यूहरचनात्मक धोरण. दोन देशांमधले राजनैतिक संबंध हे राजकीय मुत्सद्देगिरीचे असतात आणि ते धोरणात्मक रीतीने सांधावे लागतात. विशेषतः वसाहतवादी शासनकाळात या कलाकृती ताब्यात घेण्यात आल्याने हे अधिक अवघड काम आहे. कारण वसाहतवादी देश आणि पारतंत्र्यातील देश यांच्यात ऐतिहासिक तणाव आणि अनेक न सुटलेले प्रश्न स्वातंत्र्यानंतही कायम असतात", असं त्रिवेदी स्पष्ट करतात.

भारतीय कलाकृती

फोटो स्रोत, Getty Images

कायदेशीर दृष्टिकोनातून असं वाटतं की, भारताने किमान कोहिनूरच्या बाबतीत तरी जवळपास हार मानलेली आहे.

2016 मध्ये एका भारतीय नागरिकाने सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करून भारत सरकारने कोहिनूर भारतात आणावा यासाठी आग्रह धरला होता. या प्रकरणाच्या सुनावणीत भारत सरकारने कोहिनूर हा ब्रिटीश मालमत्तेचा भाग झाल्याचं मान्य केलं आणि आपले हात वर केले होते.

कोहिनूर हिरा भारत आणि ब्रिटनच्या एकमेकांशी जोडलेल्या इतिहासाची साक्ष आहे. कोहिनूरच्या अद्वितीय सौंदर्याच्या कथा जगभरात सगळ्यांनाच मोहित करतात. भारतीयांसाठी हा संवेदनशील मुद्दा आहे.

कोहिनूर हिरा आणि इतर भारतीय बहुमोल ठेवा भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकार नक्कीच प्रयत्न करेल, अशी आशा देशवासीयांना आहे, असं मोदींच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे.

डॉ. दत्ता म्हणतात, "यापूर्वीच्या भारत सरकारकडे अशी अवघड कामगिरी करण्यासाठीचं धाडस आणि इच्छाशक्ती नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता आमच्याकडे शक्तिशाली आणि राष्ट्रवादी प्रेरणेचं सरकार आहे. त्यामुळे आता भारतीयांची मोदी सरकारकडून मोठी अपेक्षा आहे."

पण हे साधण्यासाठी भारताला पुरावे आणि दस्तावेज गोळा करून ब्रिटीश न्यायालयाचे दरवाजे ठोठावायला लागणार आहेत.

लंडनचे ब्रिटीश कायदेपंडित सरोश जइवाला यांच्या मते, "ब्रिटीश कायद्यानुसार या वस्तू आणि कलाकृतींवर आपलाच हक्क आहे हे भारत ब्रिटीश न्यायालयातच सिद्ध करेल तेव्हाच या वस्तू त्यांना परत नेता येतील. भारताला कोर्टात हे दाखवावं लागेल की कलाकृतींची मालकी आपल्याकडे आहे, जे खूप कठीण काम असेल आणि त्यासाठी खणखणीत पुरावे आवश्यक असतील."

नटराज परत मिळवला हा आशेचा किरण?

हे काम सोपं नसलं तरी एक आशेचा किरण दसित आहे. ब्रिटीश कोर्टात भारताला एका अगदी गुंतागुंतीच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण खटल्यात यश मिळालं आहे आणि याचं श्रेय सरोश जइवाला यांना आहे.

तमिळनाडूच्या एका मंदिरातून ब्रिटनमध्ये पोहोचलेल्या नटराजाच्या एका मूर्तीबद्दलचं हे प्रकरण कोर्टात होतं.

सरोश जइवाला यांनीच यासंबंधी सविस्तर माहिती दिली.

"भारतातून तस्करी करून ही मूर्ती ब्रिटनमध्ये पोहोचली. जइवाला अँड कंपनी या माझ्या फर्मने तामिळनाडू सरकारसाठी काम केलं होतं आणि भारतात ही मूर्ती परत नेण्यात आम्हाला यश मिळालं. भारतीय कायद्यातल्या एका अनोख्या कल्पनेच्या आधारे आम्हाला यश मिळालं. कल्पना अशी होती की, नटराजाची मूर्ती ही एक पूज्य मूर्ती आहे, तिला हिंदू कायद्यानुसार कायदेशीर अस्तित्व आहे आणि म्हणून ती तामिळनाडूमधील मंदिरात आपल्या घरी परत जाण्यासाठी न्यायिक व्यक्ती म्हणून दावा करूच शकते."

नटराज

फोटो स्रोत, Getty Images

नटराजाची ही मूर्ती 1976 मध्ये तामिळनाडूच्या तंजावुर जिल्ह्यातल्या पाथुर गावात अरिल थिरु विश्वनाथ मंदिरातून चोरीला गेली होती. तस्करी मार्गाने तिची विक्री झाली आणि ती इंग्लंडला पोहोचली. आता ही मूर्ती भारतात पुन्हा त्याच मंदिराकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

गेल्या 9 वर्षांत 240 प्राचीन कलाकृतींचा तपास लावून त्या भारतात परत आणण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच सांगितलं.

त्यांच्या मते, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2014 पर्यंत फक्त 20 कलाकृती भारतात आणण्यात आल्या होत्या.

भारतीय सांस्कृतिक कलाकृतींची तस्करी बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. राजधानी दिल्लीत आंतरराष्ट्रीय संग्रहालयाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतासारख्या प्राचीन संस्कृती असलेल्या देशांना शेकडो वर्षं याच पद्धतीच्या मुद्द्यांसाठी लढावं लागतं.

बहुमोल मूर्ती परत आणण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

भारत हा प्राचीन मंदिरांचा देश आहे. या मंदिरांमधल्या दुर्मीळ आणि बहुमोल मूर्ती आणि इतर वस्तू चोरून आणि तस्करी करून बाहेरच्या देशात पाठवण्याचा उद्योग वर्षानुवर्षं सुरू आहे.

दोन सर्वसामान्य व्यक्तींनी या मूर्ती परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या मूर्ती कधी काळी हिंदू, बौद्ध किंवा जैन धर्मीयांच्या मंदिरांच्या मालकीच्या होत्या.

भारतीय कलाकृती

फोटो स्रोत, Getty Images

विजय कुमार आणि अनुराग सक्सेना यांनी 2013 मध्ये पहिल्यांदा या मोहिमेला सुरुवात केली आणि हॅशटॅग #BringOurGodsHome या अंतर्गत (https://twitter.com/IndiaPrideProj) कामाला इंडिया प्राइड प्रोजेक्ट असं नाव देण्यात आलं.

विजय कुमार यांचं म्हणणं आहे की, त्यांनी अनेक वस्तू भारतात परत आणल्या आहेत. उदाहणार्थ - न्यू साउथ वेल्सच्या आर्ट गॅलरीत होता तो वृद्धाचलम अर्धनारीश्वर, ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रीय संग्रहालयात होता तो श्रीपुरंतन नटराज, लंडनमध्ये होता तो नालंदा बुद्ध, लंडनमधूनच ब्रह्मा, ब्राह्मणीच्या मूर्ती, एशिया सोसायटी न्यूयॉर्कमधून पुन्नैनल्लुर नटराज, बॉल स्टेट म्युझियममध्ये होती ती अलिंगना मूर्ती तिरुपंबपुरम इत्यादी.

कलाकृती परत मिळवण्यासाठी काय सोय आहे?

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर, चोरी झालेल्या कलाकृती परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रोफेसर मॅनिलिओ फ्रिगो, सांस्कृतिक कलाकृतींचे तज्ज्ञ आणि युरोपमधील बोनेली एर्डेच्या कला आणि सांस्कृतिक फोकस टीमचे सदस्य आहेत. ते म्हणतात की, तत्त्वतः या गोष्टींसाठी लागू होणारे दोन मुख्य बहुराष्ट्रीय करार आहेत.

भारतीय कलाकृती

फोटो स्रोत, Getty Images

पहिलं आहे 1954 चं हेग कन्व्हेन्शन. युद्धाच्या दरम्यान लूट झालेल्या संपत्तीशी संबंधित हा आंतरराष्ट्रीय करार आहे.

प्रोफेसर मॅनिलिओ फ्रिगो यांच्या म्हणण्याप्रमाणे, "हा करार केवळ सांस्कृतिक मालमत्तेचे म्हणजे-वास्तुकला, ऐतिहासिक वास्तू, पुरातत्व स्थळं, कलाकृती, हस्तलिखितं, पुस्तकं आणि ऐतिहासिक किंवा पुरातत्वीय महत्त्वाच्या इतर वस्तू यांचं संरक्षण करतो असं नाही तर लष्करी-व्याप्त प्रदेशातून चोरलेली सांस्कृतिक मालमत्ता परत करण्याचं दायित्व देखील निश्चित करतो.

भारत आणि यूके हे दोन्ही देश या कराराचे पक्षकार आहेत. 1958 मध्ये भारताने आणि 2017 मध्ये यूकेने या करारावर स्वाक्षरी केली होती."

दुसरा बहुराष्ट्रीय करार म्हणजे युनेस्को (UNESCO) कन्व्हेन्शन.

सन 1970 मध्ये मंजूर झालेला हा करार शांततेच्या किंवा युद्धविरामानंतरच्या काळात लुटलेल्या मालाशी संबंधित आहे.

प्रोफेसर मॅनिलिओ फ्रिगो म्हणतात, "या सामंजस्य करारामुळे देशा-देशांमध्ये होणारी सांस्कृतिक मालमत्तेची अवैध तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करता येते. या कराराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे चोरी झालेल्या सांस्कृतिक मालमत्तेची परतफेड, जी आपल्या वस्तू परत आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण तरतूद आहे."

भारतीय कलाकृती

फोटो स्रोत, Getty Images

1970 च्या युनेस्को कनव्हेन्शनमध्ये राहिलेल्या काही त्रुटी दूर करण्यासाठी आणि चोरी किंवा अवैधरीत्या निर्यात केल्या गेलेल्या सांस्कृतिक वारशाच्या वस्तूंबद्दल आणखी स्पष्टता आणत 1995 मध्ये रोममध्ये आणखी एक करार करण्यात आला.

हा करार बेकायदेशीर सांस्कृतिक वस्तू बाळगणाऱ्या मालकांनापण लागू होतो. त्यामुळे सांस्कृतिक वस्तू ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी ती परत करणं आवश्यक आहे, त्यासाठी या कायद्याअंतर्गत दावा करून कालमर्यादासुद्धा निश्चित करता येते. सांस्कृतिक कलाकृती मिळविण्यासाठी काय प्रकारचे प्रयत्न आवश्यक आहेत तेही या रोम करारात स्पष्ट केलं आहे.

या आंतरराष्ट्रीय करारानुसार अमेरिकेने 23 सप्टेंबर 2021 रोजी इराक युद्धादरम्यान 2003 मध्ये चोरलेल्या जवळपास 17 हजारांहून अधिक कलाकृती इराकला परत केल्या.

पण हे सगळे आंतरराष्ट्रीय करार मध्ययुगात लुटलेल्या सांस्कृतिक कलाकृतींसाठी लागू होत नाहीत. याचा अर्थ आधुनिक भारतातून लुटलेल्या सांस्कृतिक कलाकृती परत मिळवण्यासाठीच या करारांतर्गत दावे करता येतात.

भारतावर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा ताबा होता आणि त्यानंतर ब्रिटीशराज आलं त्या वेळी देशातून लुटलेल्या संपत्ती आणि मौल्यवान चीजवस्तू या करारांच्या परिक्षेत्रात येतच नाहीत.

परत आणण्याचे कायदेशीर मार्ग बंद?

ब्रिटीश कायद्यात तज्ज्ञ असलेले वरीष्ठ वकील आणि कायदेपंडित सरोश जइवाला सांगतात, "भारतीय कलाकृती परत आणण्यासाठी कायदेशीर मार्ग आहे पण तो अत्यंत कठीण आहे. भारताला इच्छा असेल तर स्वामीत्वाचे पुरावे गोळा करून ब्रिटीश कोर्टात त्या कलाकृतींच्यासाठी दावा करू शकतो."

ते म्हणतात, "ब्रिटीश सरकार भारतीय कलाकृती परत देण्यासाठी राजी असेल तर ब्रिटनला त्यासाठी वेगळा कुठला कायदा करण्याची गरज नाही. ब्रिटीश न्यायालयाने तिथल्या सरकारला कोहिनूर भारताला परत करण्याचे आदेश दिले तर त्या देशाला आदेशाचं पालन करावंच लागेल."

या मुद्द्यांबाबतचे अभ्यासक, तज्ज्ञ आणि वरीष्ठ वकील रजत भारद्वाज यांच्या मते, भारत सरकारला कायदेशीर आणि मुत्सद्देगिरीचे दोन्ही मार्ग अवलंबावे लागतील.

"या कलाकृती भेट म्हणून देण्यात आल्या होत्या की लुटल्या गेल्या होत्या हे सिद्ध करणारे कुठलेही दस्तावेज उपलब्ध नसतील तर हा वादाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे भारत सरकार यावर प्रश्न उपस्थित करून कोहिनूर हिरा आणि अन्य वस्तू परत करण्याचा दावा करूच शकतो. त्यासाठी कायदेशीर उपाय, मुत्सद्देगिरी आणि जे शक्य होतील ते मार्ग अनुसरले पाहिजेत कारण ती आपल्या देशाची संपत्ती आहे."

भारतीय कलाकृती

फोटो स्रोत, Getty Images

भारद्वाज सांगतात की, भारत सरकारला जर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसकडे जायला लागलं तर तेही जायला हवं.

"कलाकृती लुटून नेल्या होत्या की त्या भेट म्हणून दिल्या गेल्या होत्या याचं विश्लेषण तथ्य, पुरावे, दस्तावेज यांनुसारच होऊ शकतं. तसं करून भारताने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या दरवाजात दाद मागायला हवी."

हळूहळू परिस्थिती बदलते आहे. युरोपच्या वसाहतवादी शक्तींना हे जाणवू लागलं आहे की, 'गुलाम' देशांतून लुटलेला माल त्यांना परत करायची वेळ आलेली आहे.

अनेक भूतपूर्व वसाहतवादी शक्तींनी कायदे बनवून त्यानुसार लुटीचा माल त्या त्या देशांना परत देण्याची तयारी केली आहे.

प्रोफेसर मॅनिलिओ फ्रिगो यांच्या मते, कलाकृती परत करण्यासाठी युरोपीय देशांना कायदे करणं आवश्यक आहे.

फ्रान्स, इटली, बेल्जियम आणि पोर्तुगाल अशा देशांनी ज्या परकीय कलाकृती सार्वजनिक संग्रहात आहेत त्यासाठी कायदा संमत करणं आवश्यक आहे. म्हणजे या कलाकृती त्या त्या देशांना परत करता येतील.

किमान ज्या देशांमध्ये संबंधित कलाकृती सार्वजनिक संग्रहालयांत आहेत (जसं फ्रान्स, इटली, बेल्जियम आणि पोर्तुगालमध्ये आहेत)त्या त्या देशांनी कलाकृती परत देण्यासाठी कायदे केले पाहिजेत. पण यूकेमध्ये तसं करून भागणार नाही. अद्याप तसा पुढाकार ब्रिटनसाठी कुणी घेतलेला नाही.

प्रोफेसर मॅनिलिओ फ्रिगो सांगतात, "माझ्या माहितीप्रमाणे, ब्रिटनने अद्याप यासंदर्भातला कुठलाही कायदा केलेला नाही. त्यामुळे कुठल्याही दाव्यासाठी त्या त्या खटल्याबरहुकूम निर्णय घ्यावा लागेल. इतर युरोपीय वसाहतवादी देशांप्रमाणे ब्रिटनने अद्याप ही मालमत्ता परत करण्याच्या दृष्टीने कायदेशीर तरतूद करण्यासाठी कुठलीही हालचाल केलेली नाही."

नैतिकतेचा प्रश्न

भारतातल्या अनेक तज्ज्ञांच्या मते, कलाकृती परत मिळवण्यासाठी कायदेशीर किंवा राजनैतिक मुद्द्यांच्या दृष्टीने याकडे पाहणं उचित नाही.

हा नैतिकतेचा मुद्दा आहे, असं काहींना वाटतं. जसं की अनुराग सक्सेना या भूतपूर्व वसाहतवादी शक्तींना उद्देशून सांगतात,

"तुम्ही आमचे जीव घेतलेत, आमच्या नैसर्गिक साधन संपत्तीही घेऊन गेलात, आमचा वारसाही नेलात. आतता तुम्ही आमचं आयुष्य परत देऊ शकत नाही, नैसर्गिक साधन संपत्तीही परत करण्यासारखी नाही. किमान आमचा सांस्कृतिक वारसा तर परत द्या."

कोहिनूर

फोटो स्रोत, POOL/TIM GRAHAM PICTURE LIBRARY/GETTY IMAGES

उजव्या विचारसरणीचे अभ्यासक आणि मोदी समर्थक डॉक्टर सुव्रोकमल दत्ता हेसुद्धा आमचा वापसा विनाशर्त परत केला पाहिजे असी मागणी करतात.

"अनेक युरोपीय देश आपल्या पूर्वीच्या वसाहतींमधून लुटलेला माल त्यांना परत देत आहेत. कारण त्यांना आपल्या तत्कालीन क्रूरतेच्या जाणीवेने लाज वाटत आहे. पण ब्रिटन असं काहीच करताना दिसत नाही.

ब्रिटनने पुढाकार घेऊन जर आमच्या भळभळत्या जखमांवर थोडी फुंकर घालायचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांनी दिलेल्या जखमांच्या भयानक आठवणी थोड्या प्रमाणात मिटवण्यात ते यशस्वी होतील. "

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)