दसरा : मोहन भागवत यांच्या भाषणातील 3 मुद्दे आणि त्यांचे राजकीय अर्थ

    • Author, प्रविण सिंधू
    • Role, बीबीसी मराठी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसऱ्यानिमित्त नागपुरात संघ मुख्यालयात केलेल्या भाषणाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. याचं कारण त्यांनी बांगलादेशच्या राजकीय अस्थिरतेची तुलना भारताशी केलीय. तसंच, इतर मुद्द्यांवरही भाष्य केलंय.

मोहन भागवत यांनी या भाषणात ‘बांगलादेशमधील हिंसाचाराप्रमाणे भारतात परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न’, ‘बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचार’ आणि ‘पश्चिम बंगालमधील आर. जी. कर रुग्णालयातील महिला डॉक्टरवरील अत्याचार’ या मुद्द्यांवर भाष्य केलं.

मोहन भागवत यांच्या या वक्तव्यांचे अर्थ काय, हे बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषकांशी बोलून जाणून घेतलं.

'भारतात बांगलादेशप्रमाणे परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न'

दीड महिन्यांपूर्वी बांगलादेशात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेचा मुद्दा मोहन भागवत यांच्या भाषणात प्रामुख्यानं दिसून आला. भारतात बांगलादेशप्रमाणे परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं.

‘डीप स्टेट’, ‘वोकिजम’, ‘कल्चरल मार्क्सिस्ट’ असे शब्द सध्या चर्चेत आहेत आणि हे सर्वच सांस्कृतिक परंपरांचे घोषित शत्रू असल्याचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. ते म्हणाले की, सांस्कृतिक मूल्ये, परंपरा आणि जे काही उदात्त किंवा मंगल मानले जाते, त्याचा संपूर्ण नाश हा या समूहाच्या कार्याचा भाग आहे.

मोहन भागवत यासंबंधी पुढे म्हणाले की, “समाजात अन्यायाची भावना निर्माण होते. असंतोषाला हवा देऊन तो घटक समाजाच्या इतर घटकांपेक्षा वेगळा आणि व्यवस्थेविरुद्ध आक्रमक बनवला जातो. व्यवस्था, कायदा, शासन, प्रशासन इत्यादींबद्दल अविश्वास आणि द्वेष वाढवून अराजकता आणि भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. त्यामुळे त्या देशावर वर्चस्व प्रस्थापित करणे सोपे जाते.

"तथाकथित 'अरब स्प्रिंग'पासून शेजारच्या बांगलादेशात नुकत्याच घडलेल्या घटनांपर्यंत हीच पद्धत अवलंबलेली दिसली. आपण भारतभर अशाच प्रकारचे दुष्ट प्रयत्न पाहत आहोत."

मोहन भागवत यांना विधानातून नेमकं काय अभिप्रेत आहे आणि या वक्तव्याचे अर्थ काय, यासंबंधी आम्ही ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांच्याकडून जाणून घेतलं.

राजेंद्र साठे म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मार्क्सवाद्यांवरची टीका कायमच ‘कल्चरल मार्क्सिजम’ वरूनच होत असते. भारतातली संस्कृती ‘हिंदू संस्कृती’ असल्यानं त्याला छेद देण्याचा प्रयत्न ‘कल्चरल मार्क्सिजम’द्वारे केला जात असल्याचा संघाचा कायमच आरोप आहे.

या कल्चरल मार्क्सिजममध्ये स्त्रीवादही (फेमिनिजम) येतो, आधुनिक विचारांचा स्वीकार करणंही येतं आणि देवाला-धर्माला त्यागणंही येतं. भागवत यांच्या या विधानाला 'डॉग व्हिसल' म्हणतात. म्हणजे, अशी शिळ वाजवायची, जी सांकेतिक खूण असते. त्यातून संघाच्या अनुयायांना आता कुणावर हल्ला करायचा हे कळतं."

ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे यांनी मोहन भागवत यांच्या ‘बाह्यशक्तीं’च्या या वक्तव्याचा अर्थ लावताना मोदी सरकारने स्वयंसेवी संस्थावर केलेल्या कारवाईचा उल्लेख केला.

विवेक देशपांडे म्हणाले, "बाहेरच्या देशातील शक्ती भारतातील लोकांच्या भावना भडकवतात, असं ते म्हणत आहेत. याचा संबंध अलिकडे मोदी सरकारने भारतातील अनेक स्वयंसेवी संस्थांवर (एनजीओ) ज्या कारवाया केल्या, त्याच्याशी आहे.

“सेंटर फॉर रिसर्च पॉलिसीपासून अनेक एनजीओंवर ही कारवाई झाली. कारण या संस्थांना बाहेरील लोक निधी देतात आणि त्यांच्याकडून भारतविरोधी कामं करून घेतात, असा संघ आणि मोदी सरकारचा दावा आहे. हेच मोहन भागवत सूचवत आहेत."

"जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय संस्था भारतातील विविध संस्थांना आर्थिक मदत करतात. ही मदत म्हणजे भारतातील विकासाला खिळ घालणं आहे, असा दावा संघ करतो. यावरून असं दिसतं की, मोदी सरकारने भारतातील अनेक स्वयंसेवी संस्थांवर केलेली कारवाई संघाच्या व्यापक अजेंड्याचा भाग म्हणून केली आहे. संघाने सांगितल्यानेच ही कारवाई केली आहे," असं मत देशपांडे व्यक्त करतात.

भागवत यांनी उल्लेख केलेल्या अरब स्प्रिंग आणि बांगलादेश आंदोलनावर बोलताना देशपांडे म्हणतात, "मोहन भागवत अरब स्प्रिंग आणि बांगलादेशातील घटनांचा उल्लेख करतात. मात्र, या दोन्ही घटनांचं जगात स्वागत झालं आहे. अरब स्प्रिंगची घटना तेथील एकाधिकारशाहीला आणि धार्मिक अतिरेकीपणाला विरोध म्हणून घडली. अरब स्प्रिंगचा उद्देश बऱ्याच अंशी लोकशाहीवादी होता. याचप्रमाणे बांगलादेशमध्येही झालेला उठावही लोकशाहीवादी होता."

"तो मुलतत्ववाद्यांचा आणि अमेरिकेचा कट होता हे खरं नाही. ती केवळ कॉन्स्पिरसी थेअरी आहे. संघाची संपूर्ण विचारधाराच कॉन्स्पिरसी थेअरीवर अवलंबून आहे. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीकडे त्याच दृष्टिकोनातून पाहतात. मुस्लीम, ख्रिश्चन आणि मार्क्सवादी यांच्यापासून हिंदू धर्मियांना धोका आहे, हा त्यांच्या मूळ विचाराचा गाभा आहे. हे स्वतः गोळवलकरांनी त्यांच्या 'बंच ऑफ थॉट्स' या पुस्तकात लिहिलं आहे. हेही त्या थेअरीचा भाग आहे," असं देशपांडे सांगतात.

बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ले

यासोबतच मोहन भागवतांनी बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.

मोहन भागवत म्हणाले, "बांगलादेशात नुकताच हिंसक सत्ताबदल झाला. तिथल्या हिंदू समाजावर कारण नसताना पाशवी अत्याचार करण्याची परंपरा पुन्हा एकदा दिसली. त्या अत्याचारांच्या निषेधार्थ तेथील हिंदू समाज यावेळी संघटित होऊन बचावासाठी घराबाहेर पडला. त्यामुळे काही प्रमाणात बचावला. पण जोपर्यंत हा अत्याचारी जिहादी स्वभाव तेथे आहे, तोपर्यंत तेथील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याक समाजाच्या डोक्यावर धोक्याची तलवार लटकत राहणार आहे."

"आता भारत नको म्हणून पाकिस्तानला आवताण देण्याची चर्चा आहे. अशा चर्चा घडवून भारतावर कोणकोणत्या देशांना दबाव आणायचा आहे, हे सांगण्याची गरज नाही. त्याची उपाययोजना हा शासनाचा विषय आहे,” असंही भागवत यांनी म्हटलं.

यावर राजेंद्र साठे म्हणाले, "बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान मोहम्मद युनूस आणि बांगलादेशमधील इतर महत्त्वाच्या नेत्यांनी भूमिका घेत बांगलादेशातील अल्पसंख्याकांचं संरक्षण करू, हे स्पष्ट केलंय. तसंच, अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.

बांगलादेशची राज्यसंस्था आणि समाज धर्मनिरपेक्ष आहे हे संघाचं खरं दुखणं आहे. बांगलादेशची व्यवस्था इस्लामी असली असती, तर त्यांना त्यावर टीका करता आली असती. बांगलादेशातील हिंदू भारतात आले असते तर संघाला तेथील हिंदू कसे संकटात आहेत हे सांगता आले असते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. "

साठे पुढे म्हणतात की, "एकाचवेळी अनेक विरोधाभासी भूमिका घेणं हे संघ आणि भाजपाचं वैशिष्ट्य आहे. त्यातूनच ते म्हणतात की, बांगलादेशच्या सरकारने तेथील अल्पसंख्याकांची काळजी घेतली पाहिजे, अल्पसंख्याकांच्या मंदिरांचे संरक्षण केले पाहिजे. यावर भारताने बोललं पाहिजे.

“बांगलादेशच्या दृष्टीने विचार केला, तर भारत हा बाह्यशक्ती आहे. त्यांनी हिंदू म्हणून हस्तक्षेपाची मागणी करणं चूक ठरेल. जेव्हा भारतात मदरशांवर झेंडे लावले जातात, हल्ले होतात, गोहत्येच्या मुद्द्यावर मुस्लिमांना मारलं जातं, तेव्हा बांगलादेश किंवा मुस्लीम देशांनी काळजी व्यक्त केली, तर संघाला चालणार आहे का?"

दसऱ्यानिमित्त झालेल्या या भाषणात मोहन भागवतांनी अधिकाधिक भर बांगलादेशच्या राजकीय स्थितीवर दिला असला, तरी भारतातील मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केली आहेत. त्यातील एक मुद्दा पश्चिम बंगालमधील घटनेचा आहे.

पश्चिम बंगालमधील अत्याचार प्रकरण

मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालमध्ये आर. जी. कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारावर भाष्य केलं. ते म्हणाले की, कोलकात्याच्या आर.जी. कर रुग्णालयामध्ये घडलेली घटना ही संपूर्ण समाजाला कलंकित करणाऱ्या घटनांपैकी एक आहे.

मोहन भागवत म्हणाले, "एवढा गंभीर गुन्हा घडल्यानंतरही गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी काही लोकांकडून घृणास्पद प्रयत्न केले गेले. त्यातून गुन्हेगारी, राजकारण आणि दुष्कृती यांची सांगड आपल्याला कशी बिघडवत आहे, हेच दिसून येते."

भागवत यांच्या या विधानावर विवेक देशपांडे यांनी इतर अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख केला. तसंच, इतर प्रकरणांवर भागवत यांनी भाष्य न केल्याचा मुद्दा उपस्थित करत एकूणच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

विवेक देशपांडे म्हणाले, "मोहन भागवत आर.जी. कार रुग्णालयातील घटनेवर बोलतात, मात्र उत्तर प्रदेशमधील हाथरसच्या अत्याचाराची घटना घडली तेव्हा ते त्यावर एकही शब्द बोलत नाहीत. उलट ते त्यांच्या भाषणात मोघमपणे असं म्हणाले होते की, एवढ्या मोठ्या देशात अशा घटना घडतात, याचा अर्थ देशात खूप वाईट वातावरण आहे असा नाही.

"देशातील महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मोहन भागवत एकाही शब्दाने बोलले नाहीत. पश्चिम बंगालमधील आर.जी.कारमधील घटना स्पष्टपणे गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्या मूळ घटनेत राजकारण नाही, त्यात घटना घडल्यानंतर राजकारण आलं. मात्र, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी राजकीय नेता आहे. ब्रिजभूषण सिंह भाजपाचा संघविचाराचा नेता आहे. त्याचा संघ किंवा भाजपाशी संबंध नाही असं ते म्हणू शकत नाही."

"मोहन भागवत आरजीकर रुग्णालयातील घटनेचा उल्लेख करतात आणि देशाचा अभिमान असलेल्या महिला कुस्तीपटूंवर अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषणवर अवाक्षर काढत नाहीत. ही कुठली भारतीय संस्कृती आहे," असा प्रश्न देशपांडे यांनी भागवतांना विचारला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.