प्री-इक्लाम्पसिया : गरोदर महिला आणि अर्भकाच्या जीवाला धोका निर्माण करणारा हा आजार काय आहे?

    • Author, नंदिनी वेल्लास्वामी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

प्री-इक्लाम्पसिया ही अशी समस्या आहे जिचं योग्यरित्या निरीक्षण केलं नाही तर ती अनेक गर्भवती महिलांवर परिणाम करते आणि प्राणघातक ठरू शकते. पण त्यामागचं कारण आणि पूर्णपणे रोखण्यासाठी योग्य उपाय मात्र अद्याप समोर आलेले नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरातील 2-8% गर्भवतींंना प्री-इक्लाम्पसियाचा त्रास होतो. दरवर्षी सुमारे 46,000 गर्भवतींचा आणि सुमारे 50,000 नवजात अर्भकांचा यामुळं मृत्यू होतो.

आशियामध्ये सुमारे 10% माता मृत्यूंसाठी प्री-इक्लाम्पसिया जबाबदार आहे.

"गरोदरपणात मृत्यूचं प्रमुख कारण म्हणजे प्री-इक्लाम्पसिया आहे. तर दुसरं कारण रक्तस्त्राव आहे," असं प्रसूतीतज्ज्ञ उमायल सांगतात.

हे का होतं? त्याची लक्षणं काय आहेत? आणि ते कसं नियंत्रित करावं, जाणून घेऊयात.

प्री-इक्लाम्पसिया म्हणजे काय?

"ही एक अशी समस्या आहे जी 20 व्या आठवड्यात किंवा त्यानंतरच्या काळात गर्भवती महिलांमध्ये निर्माण होऊ शकते. प्रत्येक गर्भवती महिलेसाठी याची कारणं वेगवेगळी असतात", असं स्त्रीरोगतज्ज्ञ उमायल म्हणतात.

प्रसूतीतज्ज्ञ शांती रवींद्रनाथ यांच्या मते, आधुनिक विज्ञानानं याची इतर काही कारणं शोधून काढली आहेत.

"सध्याच्या अभ्यासातून असं दिसून येतं की, फॉलिक ॲसिड आणि कॅल्शियमसारख्या पोषक घटकांची कमतरता हे देखील याचं कारण असू शकतं," असं शांती रवींद्रनाथ म्हणतात.

प्री-इक्लाम्पसियाचा धोका कोणाला जास्त आहे?

डॉ. शांती रवींद्रनाथ यांनी यामागची कारणं सांगितली आहेत.

  • ज्या महिला खूप कमी वयात आणि जास्त वयात (30 वर्षांपेक्षा जास्त वयात) गर्भवती होतात.
  • पहिल्या गर्भधारणेत असं होण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही एकाच पार्टनरमुळं पुन्हा गर्भवती होता तेव्हा ही समस्या सहसा दुसऱ्या गर्भधारणेत होत नाही. परंतु, जर तुम्ही दुसऱ्या पार्टनरमुळं गर्भवती झालात, तर ही समस्या होण्याची शक्यता असते.
  • लठ्ठपणा
  • ज्या लोकांना आधीपासूनच उच्च रक्तदाब आहे किंवा अनुवांशिकदृष्ट्या उच्च रक्तदाब होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, डॉ. उमायल यांच्या मते काही इतर कारणं देखील आहेत.

डॉ. उमायल म्हणतात, "मधुमेह, ताणतणाव, कामाशी संबंधित ताण, झोपेची कमतरता आणि एकापेक्षा जास्त गर्भधारणा ही देखील प्री-इक्लाम्पसियाची कारणं आहेत."

लक्षणं

याची लक्षणं काही लक्षणं इथे दिली आहेत.

  • वजनात अवाजवी वाढ
  • डोकेदुखी
  • चक्कर
  • पायांना सूज येणे
  • ओटीपोटावरील त्वचेचा रंग बदलणे
  • गर्भाशयात सूज येणे
  • मूत्रमार्गात सूज येणे
  • युरीनमध्ये प्रोटीन म्हणजेच प्रथिने (प्रोटीनुरिया) आढळून येणे
  • युरीनमध्ये बदल जाणवणे

मात्र प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसणारी लक्षणं वेगवेगळी असू शकतात.

यामुळे कोणत्या समस्या उद्भवतात?

इक्लाम्पसिया सौम्यदेखील असतो. पण, जेव्हा इक्लाम्पसिया गंभीर किंवा तीव्र स्वरूपात होतो, तेव्हा गर्भवती महिलेच्या अंतर्गत अवयवांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असं डॉ. उमायल सांगतात.

"याचा परिणाम यकृत आणि मूत्रपिंडांवर होतो. लघवीमध्ये युरिया आणि क्रिएटिनिनची पातळी वाढते आणि दृष्टी अंधुक होणं, मेंदूला नुकसान होण्याची देखील शक्यता असते."

गर्भाशयातील बाळावर काय परिणाम होऊ शकतो?

डॉ. शांती रवींद्रनाथ सांगतात की यात प्रामुख्याने खालील परिणाम दिसू शकतात.

  • गर्भवती महिलेच्या अम्नीओटिक सॅकमध्ये पाण्याची (अ‍ॅम्नीओटिक द्रवपदार्थ) कमतरता असू शकते.
  • यामुळे बाळाच्या वाढीस उशीर लागू शकतो, यात बाळाच्या वजनात घट होण्याचीही शक्यता असते.
  • प्लेसेंटाद्वारे बाळाला पोषक घटकांचा पुरवठा कमी होऊ शकतो.

प्री-इक्लाम्पसियाचं निदान कसं केलं जातं?

प्री-इक्लाम्पसिया केवळ 20 व्या आठवड्यात केलेल्या स्कॅन आणि रक्तदाब तपासणी यासारख्या मूलभूत चाचण्यांद्वारेच शोधला जाऊ शकतो.

यासाठी रक्तदाबाचं नियमित निरीक्षण करणं आवश्यक आहे.

डॉ. उमायल सांगतात की, " गर्भवती महिलांसाठी 110/70 ही सामान्य रक्तदाब पातळी समजली जाते. त्यामुळे, जर रक्तदाब 140/90 पर्यंत वाढला तर गरोदर महिलेला प्री-एक्लाम्पसिया होण्याचा धोका असतो.

हे कसं नियंत्रित करावं?

"हे पूर्णपणे टाळण्याचा कोणताही मार्ग नाही. मात्र, जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. ही समस्या प्लेसेंटाद्वारे होत असल्यानं, परिस्थितीच्या तीव्रतेनुसार बाळाला शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्याचा सल्ला दिला जातो."

"त्यानंतर, प्लेसेंटा काढून टाकला, तर समस्येची तीव्रता कमी होते. बाळाला गर्भाशयात असताना रक्तदाब कमी होणं चांगलं नाही. गंभीर परिस्थितीत, आईचा जीव सर्वात महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवून आपण त्याकडं लक्ष दिलं पाहिजे," असं डॉ. उमायल सांगतात.

उमायल यांनी हे नियंत्रित करण्यासाठी काही उपाय देखील सुचवलेत.

  • गरोदरपणात वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवावं.
  • फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियमच्या कमतरतेकडे लक्ष ठेवावं.
  • आहारात मीठाचा वापर कमी करावा.
  • पुरेशी विश्रांती घ्यावी.
  • आई आणि बाळाकडे बारीक लक्ष ठेवावं.

डॉ. उमायल म्हणतात, "जास्त जोखीम असलेल्या लोकांना कमी डोसच्या अ‍ॅस्पिरिनच्या गोळ्या दिल्या जातात."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.