प्री-एक्लाम्पसिया : गरोदरपणात आई आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण करणारा गूढ आजार

    • Author, डेव्हिड कॉक्स
    • Role, बीबीसी न्यूज

महिलांचं आरोग्य हा आजही जगभरात चिंतेचा विषय आहे.

महिलांच्या फक्त आरोग्याकडेच दुर्लक्ष केलं जातं असं नव्हे, तर त्यांच्याशी निगडीत, विशेषत: गरोदरपणाची निगडीत आजारांवर उपचार किंवा औषध शोधण्यासाठी संशोधनाला देखील आवश्यक निधी उपलब्ध होताना दिसत नाही.

प्री-एक्लाम्पसिया हा आजार त्याचंच एक उदाहरण आहे. गरोदर महिला आणि गर्भातील बाळाच्या जीवाला धोका निर्माण करणारा हा गंभीर आजार आहे.

हा आजार नेमका काय असतो, त्याची लक्षणं काय, सध्या त्यावर उपलब्ध असलेले उपचार आणि या आजारावर जगभरात होत असलेलं संशोधन याचा आढावा हा लेख.

एका गंभीर अशा या आजारामुळं किंवा आरोग्याच्या एका विशिष्ट स्थितीमुळे दरवर्षी 70 हजारांहून अधिक मातांचा मृत्यू होतो. मात्र, त्यामागचं कारण वैज्ञानिकांना हुलकावणी देतं आहे.

धक्कादायक वास्तव

अ‍ॅलिसन फेलिक्स या अमेरिकन अ‍ॅथलीट आहेत. एक खेळाडू म्हणून अ‍ॅलिसन फेलिक्स यांच्या करिअरला यशाची झळाळी आहे. त्यांनी 7 ऑलिम्पिक सुवर्णपदकं आणि 14 जागतिक चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.

खेळाडू म्हणून आपलं करिअर जितकं सुरळीत होतं, तितकीच गर्भधारणा देखील सुरळीतपणे होईल, असं त्यांनी गृहीत धरलं होतं.

याबद्दल फेलिक्स म्हणाल्या, "संपूर्ण आयुष्यभर मी माझ्या शरीराची उत्तम काळजी घेतली आहे. कारण खेळाडू म्हणून माझं शरीर हेच माझं साधन होतं. माझ्या शरीरानं मला कधीही निराश केलं नाही, अपयशी ठरू दिलं नाही."

"मी यासाठी प्रशिक्षण घेतलं आहे आणि उत्तम कामगिरीसाठी मी माझ्या शरीरावर जोर दिला आहे, ताण दिला आहे. माझ्या शरीरानंदेखील मला नेहमीच साथ दिली आहे. मी नेहमीच उत्तम कामगिरी करून दाखवली आहे," असं त्या पुढे म्हणाल्या

"त्यामुळेच मला वाटत होतं की, गर्भारपणानंतर मी नैसर्गिकरित्या छानपणे बाळाला जन्म देईन. त्यासाठी मी हिप्नोबर्थिंग आणि यासारख्या अनेक गोष्टींची तयारी केली होती." असं त्यांनी सांगितलं.

(हिप्नोबर्थिंग म्हणजे बाळाला जन्म देत असताना होणाऱ्या वेदना सहन करण्यासाठीची पद्धत. प्रसूतीच्या वेदनांवर नियंत्रण ठेवता यावं, त्या अधिक सहजपणे हाताळता याव्यात यासाठी ही पद्धत वापरली जाते.)

मात्र, 32 आठवड्यांच्या गर्भवती असताना फेलिक्स यांनी जेव्हा नियमित तपासणी केली तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण फेलिक्स यांना सांगण्यात आलं की, त्यांना गंभीर स्वरुपाचा प्री-एक्लाम्पसिया (pre-eclampsia) आहे.

या आजारात रक्तदाबाची पातळी अतिशय उच्च आणि धोकादायक होते. त्यानं अवयवांची हानी होते. त्यामुळं फेलिक्स यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगण्यात आलं.

दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांना त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया (C-Section) करावी लागली. कॅमरिन या त्यांच्या मुलीचा दोन महिने आधी अकाली जन्म झाला. त्यामुळं कॅमरिनला पहिला एक महिना नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागात ठेवावं लागलं होतं.

(डिस्क्लेमर: या लेखात विचलित करू शकणारी माहिती आहे.)

तोपर्यंत फेलिक्स यांना पायाला सूज येणं आणि त्यांच्या गर्भातील बाळाच्या बाबतीत काहीतरी गडबड असल्याची काही चिन्हं दिसत होती.

"मला या गोष्टींचा फारसा धोका जाणवला नाही किंवा भीती वाटली नाही. मात्र मला कळालं की माझ्या शरीरातून प्रोटीन बाहेर पडत आहेत आणि माझा रक्तदाब वाढत आहे. ही फारच भयानक गोष्ट होती," असं त्या सांगतात.

कॅमरिन आता पाच वर्षांची झाली आहे. फेलिक्स यांना मात्र या गोष्टीची अत्यंत बारकाईनं जाणीव आहे. कारण त्यांच्या संपर्कातील काही जणांचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाला होता.

एप्रिल 2023 मध्ये त्यांच्या संघामधील दीर्घकाळापासूनच्या सहकारी टोरी बोवी यांचा प्री-एक्लाम्पसियामुळे (pre-eclampsia) उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे बाळाला जन्म देत असताना मृत्यू झाला होता.

टोरी यांनी 100 मीटर चॅम्पियनशिप जिंकलेली होती आणि रिओ 2016 ऑलिम्पिकमध्ये रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. वयाच्या फक्त 32 व्या वर्षी टोरी यांचा अकाली मृत्यू झाला होता.

फेलिक्स म्हणतात, "अनेक रिले स्पर्धांत आम्ही एकाच संघात होतो. धावण्याच्या स्पर्धांमध्ये आम्ही एकमेकांच्या प्रतिस्पर्धी देखील होतो. टोरी यांचा मृत्यू खूपच धक्कादायक होता.

"ज्या व्यक्तीबरोबर मी इतका काळ घालवला होता, त्या व्यक्तीचं, सहकाऱ्याचं अकाली जाणं खरोखरंच खूपच हादरवून टाकणारं, उदध्वस्त करणारं होतं."

एक प्राणघातक गूढ उकलताना...

प्री-एक्लाम्पसियामुळे जगभरात दरवर्षी 70 हजारांहून अधिक मातांचा मृत्यू होतो, तर 5 लाख अर्भकं आईच्या पोटातच दगावतात. अतिशय उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळ फीट येणं किंवा स्ट्रोक येणं यामुळे अनेकांचा मृत्यू होतो.

गरोदरपणाच्या काळात कोणतीही चेतावणी न मिळता कधीही हे घडू शकतं. काही महिलांमध्ये गर्भारपणाच्या 34 आठवड्यांपूर्वीच प्री-एक्लाम्पसिया होऊ शकतो. तर काही महिलांमध्ये नंतरच्या टप्प्यात हा आजार होतो.

बाळाला जन्म दिल्यानंतरच्या सहा आठवड्यांमध्येही काही महिलांना प्री-एक्लाम्पसिया होतो. त्याला पोस्टपार्टम प्री-एक्लाम्पसिया म्हणतात.

हा आजार का होतो? याबद्दल वैज्ञानिकांनी काही कारणं शोधून काढली आहेत. गर्भाशयात सुरू झालेल्या मोठ्या प्रमाणातील सूज येण्यानं आईचं शरीर आणि अर्भक यांच्यातील नाजूक संवादामध्ये व्यत्यय निर्माण होतो.

विशेषतः गर्भाशयातील रक्तवाहिन्यांचा आकार बदलून प्लेसेंटा (placenta) तयार होण्यावर त्याचा परिणाम होतो. प्लेसेंटा हा अवयव गर्भाशयातील अर्भकाला आवश्यक असणारं पोषण आणि ऑक्सिजन पुरवण्यासाठी तयार होतो.

प्लेसेंटा मधील रक्ताचा प्रवाह अनियमित झाल्यामुळे आईच्या रक्दाबाचं नियमन करण्याच्या प्रक्रियेवरच याचा परिणाम होतो किंवा त्यात हस्तक्षेप होतो. त्यातून हळूहळू उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते आणि नंतर त्याची परिणती प्री-एक्लाम्पसियामध्ये होते.

"महिला जेव्हा गर्भवती होते, तेव्हा बाळाला आणि प्लेसेंटाला रक्तपुरवठा करण्यासाठी तिच्या ह्रदयाला अधिक काम करावं लागतं. ह्रदयावर अधिक ताण येतो," असं इयान विल्किनसन म्हणतात.

ते केंब्रिज विद्यापीठात क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट आणि थेरेपेटिक्सचे प्राध्यापक आहेत. युकेमधील लोकांमधील प्री-एक्लाम्पसियावर अभ्यास करणाऱ्या गटाचे प्रमुख आहेत. या अभ्यासाला पॉपी (POPPY)म्हणतात. म्हणजे प्रीकन्सेप्शन टू पोस्ट-पार्टम स्टडी ऑफ कार्डिमेटाबोलिक हेल्थ इन प्रिमिग्रॅव्हिड प्रेग्नेन्सी.

ते पुढे सांगतात की, "या आजारात माता ह्रदयातून दर मिनिटाला करत असलेला रक्तपुरवठा सर्वसामान्य गरोदरपणापेक्षा दीडपट किंवा दुप्पट अधिक असतो."

ज्या महिलांना आधीपासून ऑटोइम्यून आजार असतात, ज्यांचं वय 40 पेक्षा अधिक असतं आणि ज्या महिलांचा बॉडी मास इंडेक्स अधिक असतो म्हणजे स्थूलपणा अधिक असतो अशांना अधिक धोका असतो.

कारण त्या महिला अशा शारीरिक स्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत. त्याचबरोबर अशा परिस्थितीत त्या महिलेच्या शरीरावर गरोदरपणाचा मोठा ताण येऊन त्याचे विपरित परिणाम होतात.

मात्र, असं जरी असलं तरी काही महिलांनाच कोणतीही चेतावणी किंवा इशारा न देता प्री-एक्लाम्पसिया हा आजार का होतो? आणि इतर महिलांमध्ये तो का होत नाही? याबद्दल अजूनही बरंच गूढ आहे.

विशेषतः कृष्णवर्णीय महिलांमध्ये याचं प्रमाण 60 टक्के अधिक आहे. या महिलांमध्ये प्री-एक्लाम्पसिया गंभीर स्वरुपात होण्याची शक्यता अधिक असते.

काही संशोधकांना वाटतं की कृष्णवर्णीय महिलांमध्ये हा आजारा होण्यामागे चांगलं पोषण न मिळणं आणि आरोग्यविमा उपलब्ध नसणं ही कारण असू शकतात.

"हा एक संरचनात्मक वंशवाद आहे. जिथे काही विशिष्ट रुग्णांना आणि समुदायांना सुरूवातीच्या टप्प्यातील तपासण्या, उपचार उपलब्ध नसतात. प्रामुख्यानं त्यांना त्यांची आरोग्यसेवा कुठून मिळते हे त्यामागचं कारण असतं," असं गरिमा शर्मा म्हणतात.

त्या व्हर्जिनियातील फेअरफॅक्स येथील इनोव्हा हेल्थ सिस्टम या आरोग्य क्षेत्रातील कंपनीत कार्डिओ-ऑबस्टेट्रिक्स आणि कार्डिओव्हास्क्युलर वुमन्स हेल्थच्या संचालिका आहेत.

गरिमा शर्मा म्हणतात की, यातून सुरुवातीलाच ही स्थिती का निर्माण होते? हे स्पष्ट होत नाही.

प्री-एक्लॅम्पसिया हा आजार नेमका कोणाला होऊ शकतो? यासंदर्भात मूल्यमापन करण्यासाठी डॉक्टर अजूनही वय, वांशिकता आणि वैद्यकीय पार्श्वभूमी यासारख्या निदानाशी संबंधित जोखीम घटकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत.

मात्र, या घटकांच्या जोरावर करण्यात आलेल्या अंदाजांमध्ये अचूकता नाही.

गरिमा शर्मा म्हणतात, "या वैद्यकीय जोखमीच्या घटकांची स्वत:चीच संवदेनशीलता अत्यंत कमी आहे."

मात्र, आता नवीन आणि सुधारित निदान पद्धती किंवा चाचण्या उपलब्ध होण्यास सुरूवात झाली असताना वैज्ञानिक लवकरच या आजारासंदर्भात अधिक प्रकाश टाकू शकतील. या आजाराचा धोका कोणाला आणि का असतो याबद्दल चित्र अधिक स्पष्ट होऊ शकेल.

प्री-एक्लाम्पसियाचा अंदाज वर्तवणं किती अवघड?

कर्करोग किंवा गंभीर संसर्गजन्य आजारांवर उपचार करताना पुढील विश्लेषणासाठी तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांच्या शरीरातील ऊतींची बायोप्सी करू शकतात. मात्र गर्भवती महिलांच्या गर्भाशयात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी असा कोणताही सोपा मार्ग उपलब्ध नाही.

"आपण नियमितपणे गर्भवती महिलांच्या प्लासेंटामधून नमुना घेऊ शकत नाही. कारण यामुळं बाळ दगावण्याचा धोका खरोखरच खूप वाढतो. प्राण्यांना प्री-एक्लाम्पसियाचा आजार होत नाही. त्यामुळे यासाठी प्राण्यांवर अभ्यास करून उदाहरणार्थ उंदरांच्या अभ्यासावर आधारित मॉडेल तयार करणं खूपच कठीण आहे," असं लाना मॅकक्लेमेंट्स म्हणतात. त्या सिडनीतील तंत्रज्ञान विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहे.

त्याऐवजी शरीरात काहीतरी चुकीचं होतं आहे हे जाणून घेण्यासाठी संशोधकांना रक्तातील विशिष्ट घटकांच्या अनियमित पातळ्या लक्षात घेण्याचा प्रयत्न करावा लागला.

काही अभ्यासांमधून असं आढळून आलं की, गर्भाशयात सूजेची उच्च पातळी असणाऱ्या महिलांमध्ये अनियमित झालेल्या रक्त पुरवठ्याला प्रतिसाद देताना प्लासेंटाच्या पेशी एका प्रथिनाची निर्मिती करतात. त्याला सोल्युबल एफएमस सारखं टायरोसिन किनेस 1 (sFlt-1)प्रथिन म्हणतात.

एकदा हे प्रोटीन रक्तप्रवाहात आलं की, त्याच्या जास्तीच्या पातळीचा शरीरावर घातक परिणाम होतो. यामुळे आई आणि गर्भामधील अडथळ्याची शक्यता वाढते.

ज्या रुग्णांना प्री-एक्लॅम्पसिया आजार होतो त्यांच्यात या प्रोटीनची पातळी नेहमीच्या पातळीपेक्षा 100 पटींनी अधिक वाढलेली असते, असं क्रेग मेलो म्हणतात.

ते युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेचुसेट्स मेडिकल स्कूलमध्ये जीवशास्त्रज्ञ आहेत. त्यांना 2006 मध्ये शरीरविज्ञान किंव औषधासाठी नोबेल पुरस्कारानं सह-सन्मानित करण्यात आलं होतं.

"त्यामुळे प्री-एक्लाम्पसियामुळे अवयव निकामी होऊ शकणाऱ्या धोक्यापूर्वीचं निदान म्हणून वापरलं जाऊ शकतं," असं क्रेग पुढे सांगतात.

थर्मो फिशर सायन्टिफिक ही जैव विज्ञान आणि वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे.

मागील वर्षी या कंपनीला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून (US FDA) प्री-एक्लाम्पसियासाठीच्या नवीन निदान पद्धतीसाठी मंजूरी मिळाली होती.

या प्रक्रियेमुळे प्री-एक्लाम्पसियासारख्या गंभीर आजारांचं निदान किंवा त्यावर उपचार करण्यासाठीच्या वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी मदत होते.

याबाबतीत ही निदान पद्धती इतर प्रथिनांच्या कमी पातळीच्या तुलनेत sFlt-1 च्या वाढलेल्या पातळ्यांचा शोध घेते, ज्यातून प्लासेंटाची सर्वसामान्य वाढ दिसते.

वैद्यकीयदृष्ट्या या चाचणीचा वापर उच्च रक्तदाबाची लक्षणं असलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या गरोदर महिलेला पुढील दोन आठवड्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा प्री-एक्लाम्पसिया होऊ शकतो याचा चटकन अंदाज वर्तवण्यासाठी केला जाणार आहे.

2022 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात याची परिणामकारकता पाहण्यात आली आहे. त्यामध्ये 18 विविध हॉस्पिटलमधील 700 हून महिलांचा अभ्यास करण्यात आला होता.

ज्यामध्ये चाचणीत आजार झाल्याचं निदान झालेल्या रुग्णांना अधिक देखरेखेखाली ठेवता आलं होतं आणि त्यांचा आजार बळावण्याआधीच त्यांची अधिक काळजी घेणं शक्य झालं होतं.

नवीन निदान पद्धतीमुळे अनेकांचे जीव वाचतील असा विचार केला जात असताना, ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये माता-अर्भक आरोग्याच्या प्राध्यापक असलेल्या सिंडी अँडरसन यांना वाटतं की, अजूनही याबाबतीत अधिक प्रगत किंवा अत्याधुनिक निदान पद्धतीची आवश्यकता आहे.

त्या पद्धतीद्वारे गरोदरपणात खूपच सुरूवातीच्या टप्प्यात प्री-एक्लाम्पसियाचं निदान करता येऊ शकेल.

जर प्लेसेंटा पूर्णपणे विकसित झालेला नसेल आणि प्री-एक्लाम्पसियाचे तात्पुरते संकेत ओळखता आले तर या आजाराला आटोक्यात आणणं किंवा तो टाळणं कदाचित शक्य होऊ शकेल.

"नऊ आठवड्यानंतर प्लेसेंटाची वाढ झालेली असते. त्यामुळं आपण ही लक्षणं आधीच्या टप्प्यात पाहू शकतो का? आणि उपचारांच्या साहाय्यानं हा आजार रोखू शकतो का? किंवा तो बरा करू शकतो का?" असं अंडरसन म्हणतात.

यासाठी प्रयत्न करताना आणि ते शक्य करण्यासाठी वैज्ञानिकांचा एक गट एका नव्या तंत्रज्ञानाकडं वळत आहे. मागील काही वर्षांमध्ये हे तंत्रज्ञान वेगानं विकसित झालं आहे.

या बातम्याही वाचा:

प्लेसेंटा ऑन-अ-चिप

सिडनीतील एका प्रयोगशाळेत मॅकक्लेमेंट्स आणि त्यांची टीम नैसर्गिक ऊतींसारखी रचना तयार करण्यासाठी विशिष्ट द्रवाच्या साहाय्यानं जोडलेल्या प्लेसेंटाच्या जिवंत पेशींचे थर एकत्र करण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहेत.

मानवी शरीराच्या बाहेर प्री-एक्लामसियाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये होणाऱ्या काही प्रक्रियांचं एक मॉडेल तयार करण्याची त्यांची कल्पना आहे. याप्रकारचे प्रयत्न याआधी कधीही करण्यात आले नव्हते.

या टीमनं या तंत्रज्ञानाला प्रेमानं "प्लेसेंटा ऑन अ चिप" (placenta on-a-chip) असं खास नाव दिलं आहे.

मॅकक्लेमेंट्स म्हणतात, "प्री-एक्लामसियाच्या स्थितीत मानवी प्लेसेंटामध्ये जे काही घडतं त्याचीच नक्कल करणारे हे मॉडेल विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे."

"उदाहरणार्थ, आम्ही पहिल्या त्रैमासिकापासून ट्रोफोब्लास्टचा वापर केला आहे. ट्रोफोब्लास्ट म्हणजे प्लेसेंटाच्या निर्मितीला दिशा देणाऱ्या पेशींचे थर.

त्या पुढे म्हणतात, "इन्फ्लेमेशन, ऑक्सिडेटिव्ह तणाव, ऑक्सिजनची कमतरता आणि रक्तपेशांचा मर्यादित विकास होणं, यासारख्या या गरोदरपणात प्री-एक्लाम्पसियाच्या आधी निर्माण होणाऱ्या स्थितीमध्ये नेमकं काय होतं हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे."

मॅकक्लेमेंट्स यांच्या मते, या संशोधनातून एक दिवस, नवीन गरोदर मातांसाठी भविष्यात करायच्या रक्तचाचण्यांसाठीचा आधार बनतील असे काही जैविक संकेत मिळतील अशा आशा आहे.

मात्र त्याचबरोबर प्री-एक्लाम्पसियाचे अधिक वास्तववादी मॉडेल असल्यास संशोधकांना संभाव्य उपचार पद्धतींची चाचणी घेणं सोपं होऊ शकतं. या मॉडेलमुळे या आजारावर उपचार करण्याचा मार्ग बदलू शकतो.

"गरोदरपणात प्री-एक्लाम्पसिया झालेल्या तीनपैकी दोन महिलांचा ह्रदयविकाराचा झटका आणि ह्दय, रक्तवाहिन्यांच्या गंभीर आजारानं अकाली मृत्यू होईल. म्हणून गर्भधारणेदरम्यान आणि गरोदरपणानंतर हा गंभीर आजार टाळण्यासाठीच्या नवीन उपचार पद्धती शोधण्याची खरोखरंच गरज आहे," असं मॅकक्लेमेंट्स म्हणतात

आजपर्यंत प्री-एक्लाम्पसियाचा गंभीर धोका असलेल्या गर्भवती महिलांना सुचवण्यात आलेली उपचार पद्धती म्हणजे 12 आठवड्यांपासून बाळाचा जन्म होईपर्यंत अस्पिरिनचा हलका डोस घेणं.

विविध अभ्यासांमधून असं आढळून आलं आहे की, 16 व्या आठवड्याआधी अ‍ॅस्पिरिन घेण्यास सुरुवात करणाऱ्या अंदाजे 60 टक्के महिलांमध्ये प्री-एक्लाम्पसियाची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत.

मात्र, असं असूनही 40 टक्के रुग्णांना हा आजार होण्याचा धोका राहतोच. त्याचबरोबर जे याप्रकारचा उपचार घेत नाहीत त्यांनाही हा धोका असतोच. कारण या रुग्णांच्या डॉक्टर्सना त्यांना प्री-एक्लाम्पसियाचा धोका आहे असं वाटत नसतं.

"अनेक असे रुग्ण असतात ज्यांना हे उपचार मिळत नाहीत आणि त्यांच्याबरोबर या आजाराची चर्चा देखील केली जात नाही," असं अँड्र्यू शेनन म्हणतात. ते लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये ऑबस्टेट्रिक्सचे प्राध्यापक आहेत.

मॅकक्लेमेंट्स याबद्दल सांगतात की, गरोदर महिलांसाठी सुरक्षित असणाऱ्या, सध्या अस्तित्वात असणाऱ्या किंवा सोडून देण्यात आलेल्या औषधांच्या वापराच्या नवीन पद्धतीमध्ये प्री-एक्लाम्पसियावर करण्यात आलेल्या उपचारांमध्ये सुधारणा करण्याची मोठी क्षमता आहे.

बायोप्रिटिंगं केलेल्या प्लेसेंटाच्या पेशींवर अशा औषधांची चाचणी करून ही प्रक्रिया अधिक गतीमान केली जाऊ शकते.

अपचन, ह्रदयात जळजळ होणे, पोटातील अल्सर्स वर जगभरात प्रोटोन पम्प इनहिबिटर्स (Proton pump inhibitors) या विशिष्ट प्रकारातील औषधांचा वापर केला जातो. प्री-एक्लाम्पसियाच्या सुरूवातीच्या टप्प्यांना चालना देणाऱ्या काही हानिकारक इन्फ्लेमेशन प्रक्रियांना रोखण्यास किंवा त्या उलटवण्यासाठी ही औषधं सक्षम असण्याची शक्यता आहे.

संशोधकांनी असंही सुचवलं आहे की, रक्ताच्या एका आजारावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी इक्युलिझुमॅब या मोनोक्लोनल अँटिबॉडीचा जर गरोदरपणाच्या सुरूवातीलाच वापर करण्यात आला तर कदाचित प्री-एक्लाम्पसियाची वाढ होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो.

मॅकक्लेमेंट्स म्हणतात, "सध्या आम्ही मधुमेहासाठी वापरण्यात येणाऱ्या मेटफॉर्मिन या औषधाचा वापर करत आहोत. हे औषध एक संभाव्य उपचार म्हणून पुढे येतं आहे."

ते पुढे सांगतात, "एक रंजक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की मेटफॉर्मिनमुळे प्री-एक्लाम्पसियाच्या सुरूवातीच्या टप्प्यात बाळाची प्रसूती होण्यास विलंब होतो. त्यामुळे त्यातून संभाव्य रित्या अकाली जन्म टाळता येऊ शकतो."

या आजाराला हाताळण्याची आणखी एक पद्धत म्हणजे प्लेसेंटामध्ये sFlt1 ची निर्मिती रोखून या आजाराची वाढ रोखण्याचा प्रयत्न करणं. गेल्या वर्षी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (US FDA) CBP-4888 या नवीन तपासणी औषधाला मंजूरी दिली.

हे औषध मॅसेच्युसेट्समधील कोमाचे बायोफार्मा (Comanche Biopharma)या कंपनीनं क्लिनिकल चाचण्यांमधील चाचण्या घेण्यासाठी विकसित केलं आहे. हे औषध हस्तक्षेप करणारा एका छोटा आरएनए (siRNA)म्हणून ओळखलं जातं.

हा जनुकाचा एक छोटा भाग असतो जो शरीराच्या विविध भागात अगदी अचूकपणे पाठवला जाऊ शकतो जिथे ते जनुकीय क्रियेचं आणि पेशींच्या कामाचं नियमन करू शकतात. या प्रक्रियेद्वारे विशिष्ट प्रथिनाच्या निर्मितीला रोखता येतं.

प्री-एक्लाम्पसिया या आजाराच्या बाबतीत हे प्रोटीन म्हणजे sFlt1.

मेलो म्हणतात, "या रेणूंच्या बाबतीतील एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांचं दीर्घायुष्य. याचा एक डोस सहा महिने ते एक वर्षभराच्या कालावधीसाठी पुरेसा ठरतो. त्यामुळे एकच डोस पुरेसा ठरू शकतो अशी आपण अपेक्षा करू शकतो."

मेलो कोमाचे बायोफार्मा कंपनीमध्ये वैज्ञानिक सल्लागार आहेत.

आतापर्यंत या कंपनीनं गरोदर राहू शकणाऱ्या महिलांमध्ये औषधाच्या सुरक्षिततेची चाचणी पूर्ण केली आहे. पुढच्या टप्प्यात प्री-एक्लाम्पसिया झालेल्या जवळपास 50 गरोदर महिलांवर पुढील चाचण्या करण्याचं त्यांचं उद्दिष्टं आहे.

त्यानंतरच्या टप्प्यात अमेरिका आणि युके, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, घाना, केनिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये या औषधाचा व्यापक अभ्यास केला जाणार आहे.

अ‍ॅलिसन ऑगस्ट कोमाचे बायोफार्मा या बायोफार्मास्युटीकल कंपनीत मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. त्या म्हणतात, "वेगवेगळ्या रंग किंवा वंशाच्या महिलांवर प्री-एक्लाम्पसियाचं वेगवेगळ्या स्वरुपाचं किंवा असमान ओझं असतं."

त्या पुढे म्हणतात, "त्यामुळे आम्ही जेव्हा अमेरिकेत या औषधाचा अभ्यास करतो तेव्हा आम्ही शिकागो, अलाबामा, सेंट लुईस सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी हा अभ्यास करतो. कारण या ठिकाणी प्री-एक्लाम्पसियाचं असमान ओझं आहे. कारण लोकसंख्येच्या या गटाला या औषधाची अत्यंत आवश्यकता आहे."

औषध किंवा उपचार पद्धतीतील प्रगतीमुळे मॅकक्लेमेंट्सना प्रोत्साहन मिळालं असलं तरी

त्यांना आशा आहे की समाजावर होणारा मोठा आणि अनेकदा दुर्लक्षिला जाणारा प्रभाव लक्षात घेऊन प्री-एक्लाम्पसियावर होणाऱ्या संशोधनासाठी भविष्यात आणखी गुंतवणूक केली जाईल.

प्री-एक्लाम्पसिया आणि महिलांच्या आरोग्याबाबत त्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडताना मॅकक्लेमेंट्स म्हणतात, "यासाठी प्री-एक्लामसिया आणि इतर गंभीर आजाराच्या संशोधनावर आणि उपचारावर होणाऱ्या खर्चांची तुलना करता येईल. जर तुम्ही कर्करोगासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विचार केलात तर महिलांच्या आरोग्यासाठी त्याच्या फक्त 1-2 टक्केच निधी दिला जातो आहे.

"पण शेवटी, आपल्या सर्वांचा जन्म गर्भधारणेतूनच झाला आहे. महिलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्या आहेत. मात्र त्याचबरोबर त्या उरलेल्या निम्म्या लोकसंख्येच्या म्हणजे पुरुषांच्या माता आहेत. आपल्याला ही गोष्ट माहित आहे की प्री-एक्लाम्पसिया झालेल्या मातेच्या पोटी जन्म झालेल्या बाळांच्या आरोग्यावर त्या गोष्टीचा दीर्घकालीन परिणाम होतो. त्यामुळेच या आजारावर उपाय शोधण्याची नितांत आवश्यकता आहे," असं मॅकक्लेमेंट्स म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)