You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लक्ष लागत नाही, भरपूर गोष्टी विसरता? आलिया भट्टला असलेला ADHD आजार काय आहे?
- Author, स्नेहा
- Role, बीबीसी हिंदी
हल्ली एके ठिकाणी लक्ष केंद्रित होत नाही, एका बैठकीत पुस्तकं वाचली जात नाहीत, मोबाइल खूप वेळ पाहिला तर एकाग्रता कमी होते अशा तक्रारी सतत आपल्या कानावर येत असतात. त्यामुळे एक वेगळ्या काळजीने समाजमनाला घेरलं आहे. ही समस्या समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना भेडसावत आहे.
अगदी अभिनेत्री आलिया भट्टलासुद्धा ही समस्या आहे. या समस्येचं नाव आहे अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर (ADD). नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने ही माहिती दिली आहे.
तिच्या या मुलाखतीनंतर या आजाराची खूप चर्चा होत आहे.
अल्यूर या अमेरिकन मासिकाशी बोलताना आलिया तिच्या लग्नाच्या मेकअपविषयी सांगत होती. तेव्हा ती म्हणाली की, तिच्या मेकअप आर्टिस्टने तिचा मेकअप करण्यासाठी दोन तास मागितले होते. पण तिने नकार दिला.
तिचं म्हणणं होतं की, 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ती या खुर्चीवर बसू शकत नाही.
हे थोडं आपल्यासारखंच वाटतंय ना? आता ही बातमी अजिबात लक्ष विचलित होऊ न देता वाचण्याचा प्रयत्न करा.
एडीडी (ADD) म्हणजे काय?
एडीडी म्हणजे अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर. म्हणजे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होणं. या आजारात कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष देण्यासाठी किंवा दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रचंड त्रास होतो.
तज्ज्ञांच्या मते, हा त्रास जन्मतःच असतो. त्यामुळे आयुष्यात मध्येच तो उद्भवतो किंवा विशिष्ट सवयींमुळे तो होतो असं याच्याबाबतीत नसतं.
ही समस्या सामान्यत: लहान मुलांमध्ये असते. पण काही प्रौढ लोकांमध्येसुद्धा ही समस्या दिसते.
मनोविकार तज्ज्ञ डॉ. पूजाशिवम जेटली म्हणतात, “जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा ती आपल्या डोक्यात ठेवतो. एडीडीच्या रुग्णांमध्ये ते होत नाही. कारण ते धरुन ठेवण्याची क्षमता त्यांच्यात नसते. काही गोष्टी ते धरुन ठेवतात आणि काही सुटतात.
या लोकांमध्ये मज्जातंतूंचं जाळं वेगळ्या प्रकारचं असतं, असं त्या सांगतात.
1987 मध्ये एडीडी मध्ये एच म्हणजे हायपर ॲक्टिव्ह हा शब्द जोडला होता. त्यामुळे आता त्याला 'अटेंशन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर' असंही म्हणतात.
वर्ल्ड फेडरेशन ऑफ एडीएचडीने दिलेल्या माहितीनुसार ही समस्या 2.5 टक्के प्रौढ लोकांमध्ये असते
एडीएचडीचे तीन प्रकार असतात.
- लक्ष न लागणं- विसराळूपणा, लक्ष केंद्रित करायला त्रास, स्वत:ला नीटनेटकं ठेवण्यात समस्या.
- अतिसक्रियता- हा आजार असलेल्या लोकांना एका ठिकाणी स्थिर राहायला त्रास होतो. ते लोकांना वारंवार टोकतात, त्यांना धोक्याची जाणीव नसते.
- दोन्ही लक्षणं- काही लोकांमध्ये दोन्ही लक्षणं दिसतात.
डॉ. जेटली सांगतात की, या आजाराचा सामना करणाऱ्या काही लोकांमध्ये असंही दिसलं आहे की त्यांना वेळेची जाणीव राहत नाही. विशेषत: लहान मुलांमध्ये हे दिसतं. म्हणजे जर ही मुलं अर्धा तास खेळत असतील तर त्यांना कळतच नाही की किती वेळ झाला.
अशा परिस्थितीत पालक म्हणतात की, “ त्यांचं मूल चंचल आहे. लक्ष लागत नाही. ते निष्काळजी आहे.... भारतात आतापर्यंत याविषयी फारशी चर्चा होत नाही. खरंतर या आजारात मुलाला अनेक समस्या येत असतात. मात्र लोकांना ते कळत नाही.” डॉ.जेटली पुढे म्हणतात.
लक्षणं आणि उपचार काय?
डॉ.जेटली म्हणतात की, "लहानपणापासूनच ही समस्या आहे असं वाटत असेल तर त्यांनी प्रशिक्षित मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. त्याच्या काही चाचण्याही असतात. त्यात रेटिंग दिलं जातं."
'त्यासाठी काही औषधंही असतात. मात्र स्वीकार हा रोगाबद्दल सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असल्याचं', त्या सांगतात.
हा आजार असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी येतात. कोणाला अडचणी येत असतील तर मनोविकारतज्ज्ञांच्या मदतीने कामाचं आणि पर्यायाने इतर गोष्टींचं योग्य नियोजन करावं शकतील जेणेकरून वैयक्तिक आयुष्यावर त्याचा परिणाम होणार नाही.
आलिया भट्टने तिच्या मुलाखतीत काय म्हटलं?
आलिया भट्टने अमेरिकेतील अल्यूर या मासिकाला मुलाखत दिली आहे. त्यात तिनं अगदी लहानपणापासून ते करिअरपर्यंत विविध गोष्टींवर भाष्य केलं आहे.
त्या मुलाखतीत तिने मेकअप आणि सौंदर्य या विषयावर बोलताना म्हणाली की, मेकअपबद्दल वगैरे तिला असं वाटतं की, तो लवकरात लवकर व्हावा. त्याच्यावर जास्त वेळ घालवायला नको.
पुढे ती म्हणते, “मला एडीडी आहे. मेकअपमध्ये फार वेळ घालवण्यात मला रस नाही. जे करायचं आहे ते लवकरात लवकर व्हावं.”
“माझ्या लग्नाच्या दिवशी माझा मेकअप आर्टिस्ट पुनीत मला म्हणाला की, आलिया, तुम्हाला यावेळी मला तुमचे दोन तास हवे आहेत. मी त्याला सांगितलं, हे शक्य नाही. विशेषत: लग्नाच्या दिवशी तर अजिबात नाही. कारण मला निवांत राहायचं आहे,” असं आलिया सांगते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)